बीड — परळी येथे खाजगी कामानिमित्त आलेल्या वर्धा जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा जेवताना घशात घास अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-परळी वैजनाथ मार्गावरील एका हॉटेलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र राजाराम गुजर (वय ५२, रा. आर्वी, जि. वर्धा) हे आष्टी येथे वर्धा जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते. खाजगी कामासाठी ते परळी परिसरात आले होते. दरम्यान, अंबाजोगाई-परळी वैजनाथ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असता अचानक त्यांच्या घशात घास अडकला.
घशात घास अडकल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. संबंधितांनी तातडीने त्यांना उपचारासाठी परळी शहरातील रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परळी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, श्वास कोंडल्याने तसेच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.




