Home Blog Page 18

तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास: पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या; पतीला 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा‌

0

बीड — बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलेल्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालय-२, बीड यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी पती सुरेश उर्फ चित्तेश्वर गुलाब राठोड याला भारतीय दंड संहिता कलम 304 (भाग-२) अंतर्गत दोषी ठरवत 5 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च 2023 रोजी रात्री गेवराई तालुक्यातील भेंडटकळी तांडा येथे कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नी सविता राठोड हिच्या डोक्यावर मोठा दगड मारून गंभीर दुखापत केली होती. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तलवाडा पोलीस ठाण्यात खून, छळ व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वैज्ञानिक पुरावे ठरले निर्णायक

या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरून जप्त केलेला रक्तरंजित दगड, रक्तमिश्रित माती, फुटलेल्या बांगड्या, रासायनिक विश्लेषण (सीए) अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी न्यायालयात सादर करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारे मृत्यू हा अपघाती नसून आरोपीच्या हल्ल्यामुळे झाल्याचे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले.

तपास आणि युक्तिवादाची न्यायालयाने घेतली दखल

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी केला. सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांनी प्रभावी युक्तिवाद करत परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर ठोसपणे मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला कलम 304 (भाग-2) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 302, 498-अ, 323, 506 सह 34 मधील आरोपांतून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व दोषसिद्धीची प्रक्रिया पार पडली. दोषसिद्धी कक्ष आणि तलवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही या खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सौरभ सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

0

केज (बीड) —  केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून घेतले जात असून, त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विलास घुले यांच्या पत्नी, भाऊ रमेश घुले आणि उमेश माने यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी तसेच हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

सौरभ सोनवणेच्या भूमिकेची चौकशीची मागणी

पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी घेतलेल्या पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. तसेच एसआयटी पथकाने सौरभ सोनवणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नसल्याने घुले कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सौरभ सोनवणे यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली आणि कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप घुले कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. मात्र या आरोपांबाबत तपास यंत्रणेकडून अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही.

२० जून रोजी झाला होता विलास घुले यांचा मृत्यू

२० जून रोजी केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले यांच्यावर एका टोळक्याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी केज पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत आंदोलकांशी संवाद साधला होता. आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आणि काही आरोपींना अटक झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

एसपींनी आंदोलनस्थळी यावे, अशी मागणी

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी येऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासोबतच रमेश घुले यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि एका महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तौहीद खान हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी सखोल चौकशीची केली विधिमंडळात मागणी

0

बीड जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्याची केली मागणी

कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी

मुंबई —  परळीतील मयत तौहीद खान हत्या प्रकरणी आज औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याबाबत सखोल तपास करण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.

तौहीद हा घरातील कर्ता असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी सरकारने विशेष आर्थिक मदत करावी. तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले असून बीड जिल्ह्यातील नवतरुण मुलांमध्ये वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी परळीतील मयत तौहीद खान हत्या प्रकरणी चर्चा केली असून, तौहीद खान कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत तात्पुरती आर्थिक मदत केली होती, तसेच त्यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

प्रकाश सोळंकेना मुस्लिम समाजाच्या न्यायाची अडचण की द्वेष?

दरम्यान धनंजय मुंडे यांनी मयत तौहीद खान प्रकरणी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला असता माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना बोलायला का दिले म्हणत हरकत घेतल्याने प्रकाश सोळंके यांना मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याची अडचण आहे का मुस्लिम समाजाचा द्वेष आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान तालुका सभापती यांनी मात्र प्रकाश सोळंके यांचे म्हणणे धुडकावून लावत, स्वतः अध्यक्षांनी मुंडेना बोलण्याची परवानगी दिली असल्याचे स्पष्ट केले.

तालखेड खून प्रकरणाचा १२ तासांत छडा; स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक

0

माजलगाव (बीड) — माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. मयत विकास दत्तात्रय वाघमोडे (वय ३३, रा. तालखेड) यांच्या खून प्रकरणात आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.
तालखेड गावातील विकास वाघमोडे यांचा मृतदेह २९ जून २०२६ रोजी त्यांच्या शेताजवळ आढळून आला होता. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २९३/२०२६, कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला होता. घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मयत विकास वाघमोडे यांचे काही दिवसांपूर्वी आदित्य बारवाळ याच्यासोबत वाद झाले होते. तसेच दोघांमध्ये झालेल्या भांडणातून आदित्यने विकासला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली.
यानंतर पोलिसांनी आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. विकास वाघमोडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास विकास यांचा पाठलाग करत त्यांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडवून हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून निघून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपी आदित्य बारवाळ याला पुढील कारवाईसाठी माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अज्ञात आरोपीचा शोध घेऊन अवघ्या १२ तासांत या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार रामोड, पोउपनि महेश विघ्ने, तसेच पोहेकॉ बप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते आणि चापोहेकॉ गणेश मराडे यांनी ही कामगिरी पार पाडली.

म्यानमार मध्ये ओलिस ठेवलेल्या बीडच्या तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा – धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

केंद्र सरकारच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका करण्याची मुंडेंची विनंती

तरुणांना फसवून मानवी तस्करी करणाऱ्या महाराष्ट्रातील एजंटांच्या जाळ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करा

मुंबई —  बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार – थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे.

बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून तब्बल ७००-८०० तरुण म्यानमार – थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नामक छळछावणीत ओलिस असून त्यांना शारीरिक यातना देऊन त्याच्याकडून सायबर गुन्हे घडवले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे, तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे थेट देशाच्या गुप्तचर विभागापर्यंत पोचले असून, आपला बचाव व सुटका होण्यासाठी ही सर्व तरुण प्राणांची बाजी लावत असून सध्या ते मृत्यूच्या दाढेत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्र सरकार तसेच विदेश मंत्रालयाची मदत घेऊन या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू करावेत तसेच मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे विणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीतील महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

माजलगावात तीन लाचखोर जालना एसीबीच्या जाळ्यात

0

माजलगाव (बीड) — जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. माजलगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दोन अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एका नागरिकाने सावकारकीचा अधिकृत परवाना मिळवण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, परवाना मंजूर करून देण्यासाठी मुख्य सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे आणि कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने यांनी एका खाजगी हस्तकाच्या माध्यमातून संबंधित नागरिकाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने याबाबत जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने माजलगाव सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला.
मंगळवारी ३० जून २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून १३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना मुख्य सहाय्यक निबंधक, कार्यालयीन अधीक्षक आणि त्यांच्या खाजगी हस्तक सुरज फपाळ या तिघा जणांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून संबंधित तिघांविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात लाच मागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात दोषींवर थेट मकोका लावणार; भुसेंची विधानसभेत मोठी घोषणा

0

मुंबई — महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली.
२८ जून २०२६ रोजी होणाऱ्या TET परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच परीक्षेच्या एक दिवस आधीच फुटल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणातील दोषींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

पोलिसांच्या कारवाईत तीन आरोपी ताब्यात

पोलिसांना २७ जून रोजी TET परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचला आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींकडे २८ जूनच्या परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आढळून आली. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ती प्रश्नपत्रिका खरी असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मुख्य आरोपी राजू श्री प्रयाग शाव याच्यासह अन्य दोन आरोपींवर भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम २०२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

SIT कडून देशभर तपास

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस महासंचालकांच्या आदेशाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पथके बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना करण्यात आली आहेत.
पेपरफुटीचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे.

उमेदवारांना दिलासा; फेरपरीक्षा शुल्काशिवाय

पेपरफुटीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
तसेच भविष्यात TETसह इतर स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

विरोधकांचा सरकारवर निशाणा

TET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत विरोधकांनी निषेध नोंदवला.
दरम्यान, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नपत्रिका महाराष्ट्राबाहेर छापण्याची पद्धत बंद करून त्या राज्यातच छापण्यात याव्यात, अशी मागणी केली.

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान

0

धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

मुंबई — परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे.

माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, सुधारित आराखड्यास नव्याने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी या ६३ कामांना सुधारित मान्यता देण्याबाबत शिखर समितीने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात परळी वैद्यनाथ येथे मंदिर व परिसरात या विकास कार्यक्रमात भव्य दर्शन मंडप, दगडी पायऱ्या, प्रवेशद्वारे त्याचबरोबर भव्य असे भक्तनिवास अशी अनेक कामे प्रगतीपथावर असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत.

या सुधारित आराखड्याच्या माध्यमातून भक्त निवास, दर्शन मंडप, शौचालये, विद्युतीकरण, पादचारी मार्ग, पार्किंग, अशा विविध स्वरूपाची एकूण ६३ कामे करण्यात येत आहेत.

शाळांना निधी नाही मात्र अधिकाऱ्यांसाठी लाखोंची उधळपट्टी;अधिकाऱ्यांच्या निवासस्थान-कार्यालय दुरुस्तीचे ऑडिट करा — बीडमध्ये निदर्शने

0

बीड —  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना हात आखडता घेणारे जिल्हा प्रशासन मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या गेल्या २० वर्षातील दुरुस्ती कामांचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक बीड यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीवर दीड वर्षात तब्बल ९३ लाख रुपयांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणात अंदाजपत्रके तयार करणाऱ्या व मंजुरी देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिस अधीक्षक निवासस्थानातील दुरुस्ती कामांमध्ये उद्यान दुरुस्ती, बाहेरील रंगकाम, गेस्ट रूम व मास्टर बेडरूम फर्निचर, गार्ड रूम दुरुस्ती, स्टाफ शौचालय, चेंबर दुरुस्ती, पाइपलाइन, किचन ड्रेनेज व वॉटरप्रूफिंग, बेडरूम-गेस्ट रूम-डायनिंग हॉल सुशोभीकरण तसेच पेव्हर ब्लॉक आदी कामांचा समावेश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांची अवस्था गंभीर असून इमारत नसलेल्या ५८ शाळा, मोडकळीस आलेल्या १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या, विद्यार्थी संख्या वाढल्याने आवश्यक असलेल्या ७० शाळांमधील ९८ अतिरिक्त वर्गखोल्या यासाठी ५७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच २९० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी ५० लाख रुपयांची गरज असताना प्रशासनाकडून निधी देण्यात विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.

शाळांसाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केल्यानंतर २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर होतो, मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, ही बाब दुर्दैवी असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी म्हटले.

या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,शेख मुबीन, शेख मुस्ताक,माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक,, प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ), बाजीराव ढाकणे, डॉ. संजय तांदळे, शिवाजी मांडवे आदी सहभागी झाले होते.

नसरापूर अत्याचार प्रकरणात दोषी भीमराव कांबळेला फाशी; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

0

पुणे — भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे (वय 65) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी 29 जून रोजी शिक्षा सुनावत हा खटला “दुर्मिळातील दुर्मिळ” असल्याचे निरीक्षण नोंदवले.
या प्रकरणात 25 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेवरील युक्तिवादासाठी 29 जूनची तारीख देण्यात आली होती. सरकारी पक्षाने आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य, पुरावे आणि तत्सम प्रकरणांचा दाखला देत फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

न्यायालयाचे गंभीर निरीक्षण

विशेष न्यायालयाने निकाल देताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण करून ठोस पुरावे सादर केले. आरोपीचा गुन्हा क्रौर्यपूर्ण असून त्याच्या वर्तनातून पश्चात्ताप दिसून येत नाही. तसेच आरोपी सुधारण्याच्या पलीकडे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सरकारी पक्षाने न्यायालयासमोर अशाच प्रकारच्या 12 प्रकरणांचा संदर्भ दिला होता. त्यातील अनेक प्रकरणांत फाशीची शिक्षा झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

काय आहे नसरापूर प्रकरण?

1 मे 2026 रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. काही वेळानंतर तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, डीएनए तपासणी आणि साक्षीदारांच्या आधारे तपास करत संशयिताला अटक केली.

15 दिवसांत आरोपपत्र दाखल

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करत अवघ्या 15 दिवसांत विशेष न्यायालयात सुमारे 1200 पानी आरोपपत्र दाखल केले होते.
यानंतर फास्ट ट्रॅक पद्धतीने सुनावणी झाली. सरकारी पक्षाने वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे बाजू मांडली.

प्रकरणाचा घटनाक्रम

1 मे 2026 : नसरापूरमधून चिमुरडी बेपत्ता; रात्री मृतदेह आढळला.
2 मे 2026 : पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
मे पहिला आठवडा : वैद्यकीय व न्यायवैद्यकीय पुरावे जमा.
16 मे 2026 : 1200 पानी आरोपपत्र दाखल.
28 मे 2026 : न्यायालयाने आरोप निश्चित केले.
20 जून 2026 : अंतिम युक्तिवाद सुरू.
25 जून 2026 : भीमराव कांबळे दोषी ठरला.
29 जून 2026 : फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.