बीड शहरातील गंभीर गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पेठ बीड पोलिसांच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. पोलिसांची मोठी कारवाई.
बीड — शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आणि मागील सहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पेठ बीड पोलिसांच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सय्यद मुक्तार उर्फ मुक्कन सय्यद मंजूर अली याला अटक केली.
सदर आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो पोलिसांना सतत चकवा देत फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी डीबी पथकाकडून सातत्याने गुप्त हालचाली सुरू होत्या. अखेर अचूक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
पेठ बीड पोलिसांकडून फरार आरोपी, अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांविरोधात सातत्याने कारवाया सुरू असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, पोउनि शहा, नितीन राठोड, अजित शिकेतोड, गुजर, परजने, गिरी आणि डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.




