बीड — घरासमोर उभी केलेली स्कुटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल होताच पेठ बीड पोलिसांच्या डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासांत अज्ञात आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीची स्कुटी तसेच इतर तीन मोटारसायकली, अशा एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
इस्लामपुरा, बाबा चौक परिसरातील रहिवाशाने 8 सप्टेंबर 2026 रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, 7 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेपासून 8 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर उभी केलेली पांढऱ्या रंगाची अॅक्सेस स्कुटी (क्र. MH-23-BK-3173) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 287/2026, कलम 303(2) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच डी.बी. पथकाने अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला 24 तासांच्या आत ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेली अॅक्सेस स्कुटी तसेच आणखी तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यामुळे या कारवाईत एकूण चार दुचाकी वाहने पोलिसांच्या हाती लागली आहेत.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये अॅक्सेस स्कुटीसह होंडा युनिकॉर्न आणि दोन होंडा शाईन मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांच्या चोरीबाबत तसेच आरोपीच्या इतर गुन्हेगारी हालचालींबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत , अपर पोलीस अधीक्षक समीर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बीड वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक मुन्सर , पोलीस हवालदार नितीन सुभाष , पोलीस अंमलदार विष्णु , पांडुरंग, दिगांबर आणि अल्ताफ यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मून्सर करीत आहेत.

