Home शिक्षण “देशात ३० लाख पदवीधर बेरोजगार; शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन तीव्र करणार – अभिजीत...

“देशात ३० लाख पदवीधर बेरोजगार; शिक्षण व्यवस्थेविरोधात आंदोलन तीव्र करणार – अभिजीत दीपके”

0
5

“मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मग पेपरफुटी का नाही?” – अभिजीत दीपके यांचा सवाल

छ. संभाजीनगरदेशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली असून दरवर्षी लाखो तरुण पदवीधर बेरोजगार राहत आहेत. सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेले आंदोलन हा केवळ ट्रेलर असून आगामी काळात देशभरात अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कॉकरोच जनता पार्टी (CJP) या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दीपके म्हणाले की, देशात दरवर्षी सुमारे ५० लाख विद्यार्थी पदवीधर होतात. मात्र त्यापैकी केवळ २० लाखांनाच रोजगार मिळतो, तर उर्वरित ३० लाख तरुण बेरोजगार राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून धर्म आणि राजकारणाच्या मुद्द्यांवर भर दिला जात असताना शिक्षण, रोजगार आणि तरुणांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

NEET आणि CBSE परीक्षांमधील गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “खासगी क्षेत्रात एखाद्या कर्मचाऱ्याकडून चुका झाल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई होते. मग वारंवार पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा मंत्र्यांवर कारवाई का होत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. आम्ही ही मागणी यापूर्वीपासून सातत्याने करत आहोत. पंतप्रधान मोदी हे रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याबाबत जगभरात चर्चा होतात, मग देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी पेपरफुटी का थांबवू शकत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून यासाठी केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर आणि आयटी सेलच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दीपके म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना देशविरोधी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थी आणि युवक शांततापूर्ण पद्धतीने सहभागी झाले होते, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्र हा पुरोगामी, विचारप्रधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर उभा असलेला राज्य असल्याचे सांगत आंबेडकरी विचारांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले.

हे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित राहणार नसून लवकरच महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये युवकांच्या प्रश्नांवर मोठी आंदोलने उभारली जातील. छत्रपती संभाजीनगरमध्येही लवकरच व्यापक आणि शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध न ठेवता युवकांच्या बळावर हा लढा पुढे नेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here