कोणीही असो चुकीला माफी नाहीच – नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे
बीड — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवातील मिरवणुकीत कचखडी आणि रस्त्यावर अचानक आलेल्या पाण्यामुळे मोठी गैरसोय झाली होती. या प्रकरणात नगरपालिकेने बांधकाम विभागातील इंजि. किरण देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमोद माने या तिघांना नोटीस बजावली होती. सदरील नोटीसचे खुलाशे संबंधितांनी सादर केले आहेत मात्र ते समाधानकारक नसल्याने आणि त्यांच्याकडून गंभीर चूक झाल्याने इंजि. देशमुख यांच्यासह पगारे, माने या तिघांविरुद्ध नगराध्यक्षा यांच्या आदेशावरून मुख्याधिकाऱ्यांनी निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासनाचे सह आयुक्त यांच्यामार्फत आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान या संदर्भात वरिष्ठ स्तरावर प्रशासकीय पाठपुरावा करण्यात येणार आहे. दोषीवर कारवाई करण्यात येणार असून चुकीला माफी नसल्याचे नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे यांनी स्पष्ट केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने विविधि प्रकारच्या उपाययोजना करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले होते. परंतु रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचखडीमुळे तसेच मिरवणूकी दरम्यान रात्री 9.30 नंतर मिरवणूक मार्गावर एका ठिकाणी अचानक घाण पाणी आल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला. सदरील गैरसोयीबद्दल नगर पालिकेने बांधकाम विभाग प्रमुख इंजि.किरण देशमुख,पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रमोद माने तसेच स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे यांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला होता, संबंधिताचे खुलासे प्राप्त झाले असून सदरील खुलाशाच्या अनुषंगाने संबंधीत विभाग प्रमुख यांच्यावर उचित कार्यवाहीस्तव निलंबनाचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. जयंती उत्सव मिरवणुकी दरम्यान भीमसैनिकांची आणि नागरिकांची झालेली गैरसोय ही गंभीर बाब असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात आलेले नाही. यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून आवश्यक ती सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे यांनी सांगितले.
विघ्नसंतोषी लोकांनी पाणी सोडल्याचा स्वच्छता विभाग प्रमुखाचा खुलासा
जयंती उत्सव मिरवणुकी दरम्यान त्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत कसल्याही प्रकारची तक्रार नव्हती. कदाचित बीड नगर परिषद कार्यालयाच्या मागील वस्तीमध्ये पाणी पुरवठा सुरू होता. रोडवरील रहदारीमुळे ती कच खडी नालीमध्ये गेली असावी किंवा नगर परिषदेच्या बाजूस शासकीय रुग्णालयाचे निवास आहेत. तिथे पाण्याची टाकी असून तिथून काही विघ्नसंतोषी लोकांनी पाणी सोडले असेल त्यामुळेच पाणी आले असेल, त्यामुळे ते तपासणे गरजेचे असल्याचा असा खुलासा स्वच्छता विभाग प्रमुख यांनी केला.
मुख्याधिकाऱ्यांनी दिले पोलीस ठाण्याला पत्र
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान रात्री 9.30 च्या सुमारास नगर परिषद बीड कार्यालयाशेजारील शासकीय निवासस्थाना समोर रस्त्यावर अचानक पाणी जमा होऊन मिरवणूकीस अडथळा निर्माण झाला. सदर ठिकाणी जाणीवपूर्वक अज्ञात व्यक्तींनी नगर परिषदेची बदनामी करून मिरवणुकीस अडथळा निर्माण करत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास येत असून सदर प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व या कार्यालयामार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश दुधाळ यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांनी बीड शहर पोलिसांना दिले आहे.

