लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले तरी शेतकरी हक्क मोर्चा शेतकऱ्यांच्या पाठीशी
बीड — पवनचक्की व सौरऊर्जा कंपन्यांना शेतजमिनींचा ताबा मिळवून देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची संमती न घेता, जमिनीचा योग्य मोबदला न देता तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच प्रकल्पाचे साहित्य शेतजमिनींमधून वाहतूक केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न उपस्थित केला किंवा प्रकल्पाच्या कामासंदर्भात कायदेशीर हक्क बजावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर पोलिसी दबाव आणला जातो तसेच गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जाते, असा आरोपही करण्यात आला.
दरम्यान, पाटोदा तालुक्यातील सौंदाणा शिवारातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने पवनचक्की प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या तणावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासन कंपन्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप
बीड जिल्ह्यातील महसूल व पोलीस प्रशासन पवनचक्की कंपन्यांच्या हितासाठी काम करत असून शेतकऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाने केला. शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले तरी शेतकरी हक्क मोर्चा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय होणारी प्रकल्पाची कामे व साहित्य वाहतूक थांबवावी, जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी तसेच शेतकऱ्यांवर दबाव आणणाऱ्या अधिकारी व संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पिंपरनईत शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळ आणि मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा ताण?


