विमा नाकारणाऱ्या ‘स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी’ला बीड ग्राहक आयोगाचा दणका

उपचार खर्च, डेली कॅशसह नुकसान भरपाई देण्याचे आदेश

क्लाइंबर्स लीगल सर्व्हिसेसच्या पाठपुराव्याला यश

बीड — आरोग्य विमा पॉलिसी असतानाही अल्पवयीन मुलीचा मेडिक्लेम तांत्रिक कारणे पुढे करून नाकारणाऱ्या ‘स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्स कंपनी’ला बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. विमा कंपनीने तक्रारदारास उपचाराचा खर्च, डेली कॅश बेनिफिट, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चासह एकूण २८ हजार ५२ रुपये देण्याचे आदेश आयोगाने दिले. त्यानुसार शहरातील तक्रारदार ॲड.हैदरोद्दीन सय्यद यांना शुक्रवारी (दि.११) भरपाईचा धनादेश देण्यात आला असून क्लाइंबर्स लीगल सर्व्हिसेसच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शहरातील झमझम कॉलनी येथील रहिवासी ॲड. हैदरोद्दीन सय्यद यांनी आपल्या कुटुंबासाठी स्टार हेल्थ कंपनीकडून ‘फॅमिली हेल्थ ऑप्टिमा इन्शुरन्स प्लॅन’ अंतर्गत वार्षिक १६ हजार ४६२ रुपये प्रीमियम भरून ७ लाख २५ हजार रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती. दरम्यान, त्यांची १४ वर्षीय मुलगी अलिझा हिला ताप, अशक्तपणा, व्हायरल इन्फेक्शन व गॅस्ट्रोचा त्रास झाल्याने बीड येथील ‘अपेक्स चिल्ड्रन्स हॉस्पिटल’मध्ये २३ ते २७ जून २०२३ या कालावधीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी १५ हजार ५५२ रुपये खर्च झाला. उपचारानंतर सर्व मूळ बिले, तपासणी अहवाल व आवश्यक कागदपत्रांसह विमा कंपनीकडे क्लेम दाखल करण्यात आला. मात्र, संबंधित रुग्णालय वगळलेल्या यादीत असल्याचे तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसल्याचे कारण देत कंपनीने विमा दावा नाकारला. याविरोधात ॲड. हैदरोद्दीन सय्यद यांनी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी आयोगाचे अध्यक्ष हरीश अडके, सदस्या संगिनी राहुल पोळ आणि सदस्या सतिका शिरदे यांच्यासमोर झाली. आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही विमा कंपनीने क्लेम नाकारण्यासाठी कोणताही ठोस पुरावा आयोगासमोर सादर केला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा ठपका आयोगाने ठेवला. तक्रारदाराच्यावतीने क्लाइंबर्स लीगल सर्व्हिसेसतर्फे ॲड. नारायण सिरसट, ॲड. एस. आर. कुंभार, ॲड. व्ही. सी. मिसाळ आणि ॲड. बालाजी घुमरे यांनी काम पाहिले. त्यांना अक्षय सिरसट यांनी सहकार्य केले.

आयोगाच्या आदेशामुळे तक्रारदारास दिलासा

बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने उपचाराचा खर्च १५ हजार ५५२ रुपये आणि २ हजार ५०० रुपये डेली कॅश देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम अदा करावी, अन्यथा निकालाच्या दिनांकापासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत वार्षिक ८ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असे आयोगाने आदेशात म्हटले होते. आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत कंपनीने दंड आणि व्याजासह रकमेचा धनादेश दिल्यामुळे तक्रारदारास दिलासा मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles