वाघळूज खून प्रकरणातील तिन्ही आरोपी निर्दोष मुक्तता

बीड — आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील प्रविण विनायक पवार यांच्या मृत्यूप्रकरणी दाखल खून व गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींची बीड सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करता न आल्याने सत्र न्यायालय क्र. ४ चे सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी आरोपींना संशयाचा लाभ दिला.

प्रविण पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कार्यरत होते. सुट्टीवर ते वाघळूज येथील घरी आले असताना ८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता ही घटना घडली होती.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, प्रविण यांचे भाऊ आरोपी विनोद विनायक पवार यांनी त्यांच्याकडे सहा हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्यास प्रविण पवार व त्यांच्या पत्नीने नकार दिल्यानंतर विनोद पवार यांनी त्यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण केली. यावेळी मयताचे वडील विनायक मिटू पवार, आई झुंबरबाई तसेच विनोद पवार यांची पत्नी सोनाली यांनीही चप्पल, चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद होते.
डोक्यात मार लागल्याने प्रविण पवार जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २६०/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३२६, ३२३ व ३४ नुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी विनायक मिटू पवार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित तीन आरोपींविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आणि खटला बीड येथील सत्र न्यायालयात चालला.

साक्षीदारांच्या जबाबांतील तफावत; ठोस पुराव्याचा अभाव

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने विविध पुरावे व साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये तफावत, पुराव्यांमध्ये विसंगती तसेच आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निश्चितपणे सिद्ध करणाऱ्या ठोस पुराव्याचा अभाव असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करता आले नाहीत. उपलब्ध पुराव्यांचे परीक्षण केल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना संशयाचा लाभ देत निर्दोष मुक्त केले.

बचाव पक्षाकडून पुराव्यातील त्रुटींवर भर

या खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. शाम भालचंद्रराव देशपांडे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या पुराव्यातील त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती आणि आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठोस पुराव्याचा अभाव त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
त्यांना अॅड. यशवंत नवनाथ मुंढे, अॅड. हंबर्डे, अॅड. सुनील ढाकणे आणि कृष्णा भावले यांनी सहकार्य केले.
सत्र न्यायालय क्र. ४, बीडचे सत्र न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी संपूर्ण पुराव्याचे परीक्षण केल्यानंतर तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाकडे वाघळूज तसेच आष्टी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles