ज्ञानेश कुमारशी संबंधित २००६ चे प्रकरण पुन्हा चर्चेत; केरळमध्ये चौकशीचे आदेश

तिरुवनंतपुरम — केरळमधील २००६ सालच्या राज्य परिवहन प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचार आणि या प्रकल्पाशी जोडलेल्या मलेशियन अभियंत्याच्या आत्महत्येचे प्रकरण तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची बाब म्हणजे, २००६ मध्ये ज्ञानेश कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या संदर्भातील प्राथमिक दक्षता चौकशी करण्यात आली होती. आता या चौकशीशी संबंधित जुन्या कागदपत्रांची मागणी गृह विभागाने केली आहे.

केरळ प्रदेश काँग्रेसचे नेते मलयिनकीझू वेणुगोपाल यांनी शनिवारी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीची मागणी करणारी तक्रार दाखल केली. त्यानंतर गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी दक्षता व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले.

तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याचा दावा

चेन्नीथला यांनी पत्रकारांशी बोलताना तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आल्याचे सांगितले. तक्रारीतील बाबींमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने या प्रकरणाची सविस्तर दक्षता चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

पुढील कायदेशीर कारवाईबाबत मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दक्षता विभागाचे संचालक मनोज अब्राहम यांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मलेशियन अभियंत्याच्या आत्महत्येशी संबंध

हे प्रकरण मलेशियन स्थापत्य अभियंता ली सी बीन यांच्या आत्महत्येशी संबंधित आहे. ते केरळ राज्य परिवहन प्रकल्पांतर्गत अंगमाली ते तिरुवनंतपुरम या मार्गाच्या सुधारणा कामाशी जोडलेल्या पटी-बेल या संयुक्त उपक्रमाशी संबंधित होते.

२००६ मध्ये या मार्गाच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २१५ कोटी रुपयांचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मलेशियन कंपनी आणि भागीरथा इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त उपक्रमाकडे या कामाची जबाबदारी होती.

काम सुरू असताना ली सी बीन यांनी काही तक्रारी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते मलेशियाला परतले आणि तेथे त्यांनी आत्महत्या केली.

आत्महत्येच्या चिठ्ठ्यांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख?

ली सी बीन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्महत्येच्या दोन चिठ्ठ्या सापडल्याचे सांगितले जाते. त्यापैकी एक चिठ्ठी त्यांच्या पत्नीला, तर दुसरी कंपनीच्या संचालकाला उद्देशून लिहिल्याचे नमूद आहे. या चिठ्ठ्यांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, गृहमंत्री चेन्नीथला यांनी आपण स्वतः ही चिठ्ठी पाहिलेली नसल्याचे स्पष्ट केले. चिठ्ठीतील मजकुराबाबतची माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमधून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

२००६ ची चौकशी पुन्हा सुरू होण्याची शक्यता

ली सी बीन यांच्या मृत्यूनंतर २००६ मध्ये दक्षता विभागाने चौकशी सुरू केली होती. या चौकशीत प्रकरणाशी संबंधित बाबी तसेच क्वालालंपूरमध्ये लिहिल्याचे सांगितल्या जाणाऱ्या चिठ्ठीच्या मजकुराची तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ही चौकशी पुढे सरकली नाही.

सरकार बदलल्यानंतर हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता जुन्या चौकशीच्या कागदपत्रांची मागणी आणि नव्याने प्राथमिक चौकशीचे आदेश यामुळे हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे.

प्राथमिक चौकशीतून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles