विषारी हातभट्टी दारूने तरुणाचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

परळी (बीड) —  पुण्यात विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली आहे. परळी शहरातील साठेनगर भागात हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मृत तरुणाच्या नातेवाईकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. दारूबंदी करा, अन्यथा मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवू, असा आक्रमक इशारा नातेवाईकांनी दिला.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, साठेनगर परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याची माहिती यापूर्वी अनेक वेळा पोलिसांना देण्यात आली होती. तसेच दारूबंदी करण्यासाठी नागरिकांनी निवेदने आणि आंदोलनेही केली होती. मात्र, यावर प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पुणे येथील विषारी दारू प्रकरणात ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर परळीतील प्रकरणातही कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles