बीड — स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्कादायक घटना घडली. विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मयत विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी शुक्रवारी सकाळी उपोषणस्थळीच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

१४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुषमा घुले या माध्यमांशी बोलत होत्या. याचवेळी त्यांनी अचानक हातातील विषारी औषधाची बाटली तोंडाला लावली. या प्रकारामुळे उपोषणस्थळी एकच खळबळ उडाली. उपस्थित पोलीस आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
विलास घुले हत्या प्रकरणात न्यायाची मागणी
केज तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची सुमारे चाळीस दिवसांपूर्वी हत्या झाली होती. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत घुले कुटुंबीयांनी यापूर्वीही आंदोलन केले होते.
या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावरही कारवाई करावी, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी घुले कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप सौरभ सोनवणे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत सुषमा घुले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. न्यायासाठी सुरू असलेल्या याच उपोषणादरम्यान सुषमा घुले यांनी विषारी औषध प्राशन केल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
पालकमंत्री बीडमध्ये येण्यापूर्वीच घटना
दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री बीडमध्ये दाखल होण्यापूर्वीच न्यायाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी महिलेने विषारी औषध घेतल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, सुषमा घुले यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर खळबळ माजली असून नातेवाईक आक्रमक झाले आहेत.




