हायकोर्ट लिपीक  परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभिजीत दीपके आक्रमक, कोर्टाबाहेर ठिय्या

छत्रपती संभाजीनगर —  मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी रविवारी राज्यभर घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींची माहिती मिळाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी आणि इतर समस्यांचा पाढाच दीपके यांच्यासमोर मांडला.

विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर दीपके यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्याची दखल घेऊन परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, तसेच भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली.

यानंतर दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर न्यायालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. “हेच आता जंतर-मंतर” असे म्हणत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनीही आंदोलनात सहभागी व्हावे आणि मागण्या मान्य होईपर्यंत जागेवरून उठू नये, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने तरुण जमा झाले असून वातावरण तापले आहे. पोलिसांकडून अभिजीत दीपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हायकोर्ट लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेतील तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आता संबंधित यंत्रणा काय भूमिका घेते, याकडे परीक्षार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles