Home Blog Page 82

एस पी साहेब अजून किती देणार लाडक्या गोसावींना पाठबळ; 78 वर्षाच्या आज्जी न्यायासाठी आत्मदहन करायला हतबल

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी पोलीस प्रशासन किती लोकाभिमुख केलं याची टिमकी नववर्षाच्या स्वागताला वाजवली त्याचा भांडाफोड करण्याची वेळ आली आहे.एसपींच्या खास मर्जीतले नेकनूर चे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी 78 वर्षीय अंजना बन नावाच्या आज्जीला न्यायासाठी आत्मदहन करण्याची वेळ आणली आहे. 11 जानेवारीला नेकनूर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा 10 दिवसापूर्वीच देऊनही पोलीस अधीक्षकांनी देखील कुठलीच दखल घेण्याची तसदी घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे.

.                  बीड जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबार, अपहरण, राजरोस चालणारे अवैध धंदे यांच्यापुढे हे प्रकरण तसं पाहिलं तर अतिशय क्षूल्लक आहे.पण पोलीस अधीक्षकांनी नववर्षाच्या स्वागतालाच किती लोकाभिमुख कामं केली आहेत.पोलीस प्रशासन किती सतर्क आहे. याचा ढोल वाजवला. तो वाजवायला ही हरकत नाही. पण कायदा सुव्यवस्था आणि एस पी चा आदेश कितपत मानला जातो. हा खरा प्रश्न सगळ्याच परिस्थितीतून निर्माण होतो. एसपींनी मर्जीतली माणसं अनेक ठिकाणी जनतेच्या माथी बळच मारली. अनेक वेळा कंट्रोलला बसवा असे सांगूनही एसपींनी त्यांच्या विनंतीला मान दिला नाही. मग काय? नंगा नाच करायला अख्खं रान यांना कमी पडू लागलं. अवैध धंद्यांची भरमार झाली. त्यातून स्वतःचे बंगल्यांचे इमले बांधले गेले. ही कहाणी आहे एसपींच्या मर्जीतल्या नेकनूरच्या ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी ची त्याच्या अकार्यशैलीची गौरव गाथा माध्यमांनी अनेक वेळा मांडली.पण पिंडीवरच्या विंचवाला ठेचायचं कसं हे माध्यमांना देखील कळालं नाही. शेवटी अनेकांनी आपल्याच पापाचे भोग आहेत म्हणून घडतय ते घडू द्या म्हणून गोसावी चा नंगानाचाकडे दुर्लक्ष केलं.पण लोकाभिमुख प्रशासनाचा ढोल वाजवला त्यामुळे सत्य सांगण्यासाठी अशा गोष्टी पुढे आणण्याची वेळ “सह्याद्री माझा”वर आली.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील घारगाव येथील अंजना दगडू बन या 78 वर्षाच्या आज्जीवर न्यायासाठी आत्मदहनाची वेळ चंद्रकांत गोसावी यांनी आणली अंजना बन या गावाकडे एकट्याच राहतात परडी चा जोगवा मागून उदरनिर्वाह करतात परडी हेच एकमेव त्याचं जगण्याचं साधन. घरी कुणीच नसल्यामुळे मंदिरात झोपण्याच्या कारणावरून गणेश अंकुश सपकाळ याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. नुसती धमकीच दिली नाही तर नाकातली सोन्याची “मोरणी” काढून घेतली. याची रीतसर तक्रार नेकनूर पोलीस ठाण्याला दिली. तक्रारीला दीड महिना उलटून गेला मात्र कुठलीच कारवाई झाली नाही. चौसाळा पोलीस चौकीचा जमादार गर्जे याने तक्रार करणाऱ्या आज्जीलाच दापदडप करायला सुरुवात केली. “चोराला मेसाई धार्जिन” या म्हणीप्रमाणे “चोराला गोसावी धार्जीन” असं म्हणण्याची वेळ आणली. आज्जीने चंद्रकांत गोसावी ची देखील भेट घेतली. नातवासारख्या असलेल्या गोसावींनी देखील आज्जीची फरपटच केली. गर्जेची व आरोपीची बाजू घेतली. शेवटी अंजना बन यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी येत्या आठ दिवसात गर्जे साहेब व गोसावी तसेच आरोपीवर कारवाई केली नाही तर 11 जानेवारी 2026 ला नेकनुर पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याच निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं. पोलीस अधीक्षकांनी देखील पिंडीवरच्या विंचवालाच नेहमीप्रमाणे वरदान दिलं. निवेदन देऊन दहा-बारा दिवस होत आले तरी कुठलीच कारवाई कांवत यांनी देखील केली नाही. आत्मस्तुतीच्या ढोलाच्या आवाजात म्हाताऱ्या जोगवा मागून खाणाऱ्या निराधार आज्जीची आर्त हाक स्वतःला कर्तव्यदक्ष समजणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या कानावर गेली नाही. जर इतकी बिकट परिस्थिती असेल तर पोलीस अधीक्षकांनी प्रशासनाला लोकाभिमुख केल्याचे ढोल वाजवणं बंद करावं अशी मागणी जनतेतून केली जाऊ लागली आहे.

जबरी चोरी प्रकरणाचा काही तासातच छडा; दोन सख्या भावांच्या घराला पोलिसांचा वेढा

आष्टी — तालुक्यातील सराटेवडगाव येथील शेळके वस्तीवर 4 जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या जबरी चोरीच्या घटनेचा अंभोरा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने 150 किलोमीटरची शोधमोहीम राबवून, चोरीतील दोन सख्ख्या भावांना त्यांच्या घरातून अटक केली.
अक्षय गारमन चव्हाण वय 23 वर्ष आणि रिजवान गारमन चव्हाण वय 20 वर्ष, रा. शेरी बु. अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सराटेवडगाव येथे ग्यानबा राजपुरे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मारहाण करत दागिने आणि रोकड लंपास केली होती. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी तातडीने तपासचक्र फिरवून सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण केले.
चोरटे आष्टी तालुक्यातील शेरी येथील असल्याची खात्री पटताच, मंगळवारी पहाटे पोलिसांनी आरोपींच्या घराला वेढा घातला. आरोपी गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी त्यांच्या दारात उभे राहून मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात चोरट्यांची एक धक्कादायक पद्धत समोर आली आहे. चोरीला जाताना हे आरोपी स्वतःचे मोबाईल दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात ठेवतात, जेणेकरून त्यांचे लोकेशन सापडू नये.

गुन्ह्यासाठी ते वेगळी सिमकार्डे आणि मोबाईल वापरतात. मात्र, अंभोरा पोलिसांनी 150 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या हुशारीला मात दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश साळवे आणि त्यांच्या पथकाने केली. फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

एकाच दिवसात ३० लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा झब्बा झोल; फट गया सारा ढब्बा ढोल

बीड — हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची “इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मात्र, या वृक्षलागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे.
“वृक्षलागवड ही केवळ इव्हेंट म्हणून न करता, तिचे संगोपन व संवर्धन महत्त्वाचे असते. निदान बीड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील लागवड केलेल्या झाडांची तरी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्घाटनाच्या झगमगाटानंतर झाडांची दुरवस्था

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड शहरातील पालवण येथील नव्या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटनापूर्वी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य सिमेंट रस्त्याच्या कडेला १२ ते १५ फूट उंचीची झाडे लावण्यात आली होती. मात्र उद्घाटनाचा सोहळा संपताच या झाडांचे संगोपन पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आले.

आज त्या ठिकाणी अनेक झाडे पाण्याअभावी वाळून गेली, काही मोडून पडली, तर काही झाडे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.

पालकमंत्र्यांची दिशाभूल?

जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभरात १ कोटी रोपे लावण्याचा संकल्प जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात वृक्षसंगोपनाची जबाबदारी झटकली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत पुढील चार वर्षांत १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र हे स्वप्न फक्त कागदोपत्रीच पूर्ण केले जात असल्याचा आरोप आता पुढे येत आहे.

“इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून सन्मान स्वीकारण्यापेक्षा, जमिनीवर लावलेल्या झाडांचे प्राण वाचवणे अधिक गरजेचे आहे. वृक्षलागवडीचे इव्हेंट करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता तरी प्रत्यक्ष जबाबदारी घ्यावी,” अशी ठाम मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

नेकनूरसह चौसाळ्यात गो मांसाची खुली विक्री; पहिल्यांदाच पोलिसांची दृष्टी झाली वक्री

बीड — नेकनूर गोमांस तस्करीचा अड्डा तर आहेच शिवाय चौसाळात देखील खुलेआम गोमांस विक्री केली जाते. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा धंदा सुरू असला तरी पहिल्यांदाच नेकनूर पोलिसांनी धाडसी कारवाई करत बुधवार बाजारात आलेलं अंदाजे 90 किलो गोमांस जप्त केलं आहे. पोलिसांच्या या कधी नवे ते कर्तव्यदक्षतेमुळे कौतुक केलं जात आहे.
नेकनूर अतिशय संवेदनशील भाग म्हणून ओळखल जातं. गुरांचा आठवडी बाजार प्रसिद्ध असतानाच गोमांस तस्करी मध्ये देखील नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्याचप्रमाणे चौसाळा शहरात देखील गेल्या कित्येक महिन्यांपासून राजरोस गोमांसाची विक्री केली जात आहे. पोलिसांना याची सगळीच माहिती आहे.मात्र कायद्यापेक्षा मिळणारा “हप्ता” महत्त्वाचा त्यामुळे आज पर्यंत कारवाई कधीच झाली नाही. बुधवारी बाजारात देखील खुले आम विक्री सुरूच असते.पण चौसाळा शहरातून जात असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पवित्र प्रार्थनास्थळाच्या जवळच शुक्रवार मंगळवार आणि रविवारी गोमांसाची विक्री केली जाते. कायदा काय सांगतो यापेक्षा पोलिसांनी गोमांस विक्री व्यवसायाला आश्रय दिला तो गोरगरिबांची पोट भरावीत आणि रोजगारांच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यामुळे कधीच कारवाई केली गेली नाही. एखाद्याची चुकून तक्रार गेलीच तर वरवरची चौकशी चा ड्रामा करून त्या तक्रारीला केराची टोपली कशी दाखवायची याची हातोटी ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना चांगलीच माहित आहे. त्यामुळे गोमांस विक्रीला कायद्याने बंदी असली तरी संविधानापेक्षा गोसावींनी राबविलेला कायदा मोठा आहे.मग कारवाई करायची कशाला माध्यमांनी तरी अवैध धंद्यांच्या गोष्टी प्रसिद्ध कराव्यात कशाला ? शेवटी चंद्रकांत गोसावी यांचा कार्यकाळ संपत आला आहे. विशेष म्हणजे ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मर्जीतले आहेत.
गोसावींनी अनेक वेळा मला कंट्रोल ला टाका असं एसपींना अर्जव केलं मात्र दरवेळी त्यांच्या या मागणीला एस पीं नी दुर्लक्षित केलं. हीच बाब कायद्याचे तीन तेरा वाजवून सुव्यवस्थेला सूरुंग लावण्यासाठी महत्त्वाची ठरली मग कोणाच्या भावना दुखावल्या तरी चालेल पण मर्जीतला माणूस पदावर राहणं हे महत्त्वाचं मानलं गेलं. पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आहेत निष्कलंक आहेत हे वास्तव जरी असलं तरी माध्यमांच्या बातम्यांकडे ते करत असलेल्या दुर्लक्षामुळे व आपल्या सहकाऱ्यांवर असलेल्या अति विश्वासामुळे कायदा सुव्यवस्थेची घडी सगळी सडली आहे. अवैध धंदे नेकनूर परिसरात पोलिसाश्रयात चालत आहेत. पोलीस प्रमुख पदावर कोणीही बसलं तरी सामान्य जनतेने केलेल्या पापाची फळ त्यांना भोगायचीच आहेत असं म्हणून गप्प बसण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे.
आज बुधवारी चौसाळाचा आठवडी बाजार असल्याने पोलिसांनी बाजारात धाडसी कारवाई केली. याला धाडसीच म्हणावं लागेल कारण कारवाई आजपर्यंत कधीच झाली नव्हती ती अखेर झाली. पोलिसांनी बाजारात खुलेआम विक्री होत असलेलं अंदाजे 90 किलो गोमांस जप्त केलं. ज्या तीन चाकी रिक्षातून हे गोमांस आणला गेलं तो रिक्षा ही पोलिसांनी जप्त केला. तीन जणांना पोलिसांनी बाजारातून उचललं ही धाडसी कारवाई पोलीस उपनिरीक्षक आहेर साहेब, पो, हे, जायभाय, पो, हे, क्षीरसागर, विद्वान , यांच्यासह चौसाळा ठाणे अमलदार मुरुमकर, पो, हे, पुंडे, पो, ना, घुले यांनी केली आहे.

नाळवंडी नाक्यावरील६३ लाख रुपये किंमतीच्या रस्ता कामाचे आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते उद्घाटन

नाळवंडीच्या उर्वरित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू —आ.विजयसिंह पंडित

बीड — नाळवंडी नाका ते नाळवंडी रस्त्यावरील ६४ लाख रुपय किंमतीच्या रस्ता कामाचे उद्घाटन
आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सदर काम जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत करण्यात येत असून उर्वरित नाळवंडी रस्त्याच्या कामाचा प्रश्न देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी नाळवंडी नाक्याच्या पुढे ते उड्डान पुलापर्यंत रस्ता कामासाठी व नळकांडी पुलासाठी ६३ लाख रुपयाचा निधी जिल्हा वार्षिक विकास योजनेअंतर्गत दिलेला आहे. या रस्ता कामाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, नगरसेवक दत्ता जाधव, अरिफ खान, नगरसेवक शेख निजामभाई, आनंद पवार, भाऊसाहेब डावकर, इनामदार खय्युम, ईश्वर पवार, बाबूलाल पवार, संतोष जाधव, विलास घनवट, अनिल देवकर, संजय इटकर, अनिल पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून विकास कामांना गती येत आहे. नाळवंडी नाका ते नाळवंडी या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. खरंतर हा रस्ता पूर्वीच होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. आता हा रस्ता जिल्हा वार्षिक नियोजन मधून ९०० मीटर होत आहे पुढे या रस्त्यावर एक पूल असून त्याबरोबर उर्वरित रस्त्याचे काम देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू, रस्ता कामांमध्ये गुणवत्ता आणि दर्जा घसरता कामा नये अशा सूचनाही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या .

यावेळी नाळवंडी रोडवरील खडी क्रेशर चालक संघटनेच्यावतीने बीड नगरपालिकेत आ. विजयसिंह पंडित यांना मोठ्या प्रमाणात यश आल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी खडी क्रेशर चालख हरिभाऊ क्षिरसागर, राजाभाऊ कानडे, सतीश चिपाडे, बाळासाहेब कानडे, आनंद पवार, अमोल गायकवाड, प्रेमराज गुंजाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

चंदन चोरांची टोळी जेरबंद; सव्वा आठ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

बीड — पोलिसांनी धर्मापुरी पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या गायरान जमिनीत छापा मारून चंदन चोरांची सात जणांची टोळी जेरबंद करण्यात यश मिळवलं. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तीन लाख रुपयाचे 104 किलो चंदनासह सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबाजोगाई चे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना सोमवार दि. 5 जानेवारी रोजी चंदनाची खरेदी विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली. माहिती मिळताच धर्मापुरी पानगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गायरान जमिनीत रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी छापा मारला. यावेळी बेकायदेशीररित्या चंदनाची तस्करी पप्पु बाबुराव सूर्यवंशी वय 40 वर्ष, राहुल पप्पु सूर्यवंशी वय 23 वर्ष, तेजस कल्लप्पा कांळीबे वय 25 रा. अशोक नगर, परळी, जि. बीड,नितीन सटवा जाधव वय 22, रा. हनुमान नगर, परळी, जि. बीड अविनाश व्यंकट जाधव वय 23 वर्ष,व्यंकट रामचंद्र जाधव वय 45 (दोन्ही रा. फुलेनगर, उदगीर, जि. लातूर ,भारत निवृत्ती गायकवाड वय 40, रा. नाकलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.हे आढळून आले. यावेळी दोन लाख साठ हजार रुपये रुपये किमतीचे 104 किलो लाकूड , 39 हजार रुपये किमतीची चंदन साल 39 किलो,टाटा इंडिगो चारचाकी कार ,दुचाकी वाहने अंदाजे एक लाख 60 हजार रुपये एक विनानंबर दुचाकी वीस हजार रुपयांची, 7 मोबाईल फोन लोखंडी तराजू व वाकस 1 हजार रुपये असा एकुण मुद्देमाल 8 लाख 21 हजार रुपये पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस अंमलदार सतेश कांगणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 317(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान ही कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निमोने, पोह. बासर, बिक्कड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सतेश कांगणे, सोडगीर, उत्तरेश्वर केदार, खंदारे यांनी केली आहे.

छ.संभाजीनगर लातूर सह 16 बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा.शेतकऱ्यांना होणार फायदा!

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील छ. संभाजीनगर लातूर सह राज्यातील 16 महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आता राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.
याचा अर्थ असा की, आता या बाजार समित्या केवळ स्थानिक किंवा राज्य स्तरावर मर्यादित राहणार नाहीत, तर देशभरातील ई-नाम प्रणालीशी जोडल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल अधिक सुरक्षित आणि जास्त भावात विकता येईल. सरकारने या निर्णयासाठी आवश्यक कायदे आणि दुरुस्ती केली असून, विधी व न्याय विभागाने याचे गॅझेटही प्रसिद्ध केले आहे.

“या” बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा

सध्या या निर्णयासाठी कोल्हापूरसह राज्यातील सोळा बाजार समित्यांची माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये बाजार समित्यांमध्ये वर्षभरात येणारी आवक आणि त्यातील परराज्यातून येणारा शेतीमाल याची माहिती विचारण्यात आली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये ८० हजार टनांपेक्षा जास्त मालाची आवक होते, अशा ५१ बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. पहिल्या टप्यात कोल्हापूर, नाशिक, पुणे (ग्रामीण), छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, बुलढाणा, ठाणे, जळगाव, जालना, सांगली, वाशिम, अकोला, आहिल्यानगर, लातूर, सोलापूर आणि नागपूर अशा सोळा समित्यांचा समावेश आहे.राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक फायदे होतील. सर्वप्रथम, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. दुसरे, विक्रीत पारदर्शकता येईल. सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने नोंदवले जातील आणि कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची शक्यता कमी होईल. तिसरे, ई-नाम प्रणालीशी जोडल्यामुळे शेतकरी देशभरातील ग्राहकांशी थेट व्यवहार करू शकतील. यामुळे त्यांचा फायदा वाढेल आणि मध्यस्थावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
शासनाने मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये (२०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५) शेतीमालाची आवक तपासून, कोणत्या बाजार समित्या राष्ट्रीय दर्जास पात्र आहेत हे ठरवले आहे. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये एक देशव्यापी परवाना आणि शुल्क प्रणाली लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होईल.शेतकऱ्यांसाठी या निर्णयाचा आणखी फायदा म्हणजे त्यांना आपला माल जास्त भावात विकता येईल. पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी कमी भाव मिळत असे, परंतु राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढेल.
तसेच, स्थानिक बाजारपेठेत माल विकण्याची मर्यादा नाही, त्यामुळे शेतकरी बाजारातील सर्वोत्तम संधीचा फायदा घेऊ शकतील.सोप्या भाषेत सांगायचं तर, राज्यातील काही प्रमुख कृषी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचे जीवन सोपे होईल. त्यांना आपला शेतीमाल जास्त भावात, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने विकता येईल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. तसेच राज्यातील कृषी उद्योगाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा व्यवसाय अधिक फायदेशीर बनेल. यामुळे शेतकरी फक्त आपल्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि बाजारभावासाठी चिंता करण्याची गरज नाही.

बीडमध्ये कायद्याची घडी बसली ? तरूणावर गोळीबार,दोन गोळ्या झाडल्या नंतर चाकूने भोसकून हत्या

बीड — फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करत असलेल्या प्लंबर वर सुरुवातीला दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जखमी प्लंबर जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना अंकुशनगर, साई पंढरी लॉन्सच्या समोर दुपारी अडीच तीन च्या सुमारास घडली.
हत्या,गोळीबार यासारख्या घटना बीडमध्ये सामान्य झालेल्या आहेत. गुन्हेगार कायद्याची ऐसी तैसी करत पोलिसांच्या इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगू लागली आहेत. पोलीस अधीक्षकांपासून सगळीच पोलीस यंत्रणा आत्मस्तूतीतच मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या कायदा सुव्यवस्थेची कशी घडी बसवली आहे याची टीमकी नववर्षाच स्वागत करत असताना एस पी कडून वाजवली जात होती. मात्र चार-पाच दिवसातच ही टिमकी फुटली गेली. अवैध धंद्याची भरमार सुरू असताना कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहत असते हे न उलगडलेल कोडं कायम आहे.यामध्ये सर्वसामान्य जनतेचं जगणं दहशतीच्या सावटाखाली येऊन कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. याच स्थितीचा अनुभव बीडकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला. भर दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास प्लंबिंग चे काम करणाऱ्या हर्षद तुळशीराम शिंदे वय 35 वर्ष, (रा. हाउसिंग कॉलनी धानोरा रोड बीड) नावाच्या तरुणावर गोळीबार झाला. यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर जखमी झालेल्या हर्षद शिंदे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याचा पाठलाग करून धारदार शास्त्राने वार करत त्याची हत्या केल्याची घटना अंकुश नगर भागात घडली. हर्षद शिंदे हा
नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेला कर्मचारी अंकुशनगर भागात साई पंढरी लॉन्ससमोरील पाईप लाईन फुटली म्हणून त्या ठिकाणी दुरूस्तीचे काम करत होता. त्यावेळी ही घटना घडली.या घटनेनंतर आरोपी विशाल संजय सूर्यवंशी वय 30 वर्ष, (रा. अंकुश नगर धानोरा रोड बीड) हा पळून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीड मधील कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

झाडाखाली शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत खायच्या खस्ता; जिल्हाधिकाऱ्यांचा “विवेक” जागा होऊन मिळेल का शाळेला रस्ता?

दत्तनगर वस्तीवरील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन

बीड — माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्तनगर वस्तीशाळेवरील शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.०५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

दत्तनगर वस्तीशाळेसाठी २००७-०८ मध्ये सुसज्ज इमारत बांधण्यात आली असतानाही रस्त्यावर अतिक्रमण करून जाण्याचा मार्ग बंद केल्यामुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर शाळा भरवावी लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे वारंवार लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (रा. लिंबागणेश) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार,शेख मुबीन, रामधन जमाले, राजकुमार कदम डी.जी.तांदळे, नितिन जायभाये, डॉ.तांदळे, बाजीराव ढाकणे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोरडे, राजेंद्र भिसे,शहाजी भुंबे,अंजाबापु अडागळे,कौसर कुरेशी,शालिंदा गरड,भारत भोमदळ, संतोष आडागळे,वचिष्ठ आठवे आदी पालक व ग्रामस्थ सहभागी होते.

आंदोलनादरम्यान “जिल्हाधिकारी जागे व्हा”, “पालकमंत्री अजितदादा जागे व्हा”, “आ. विजयसिंह पंडित जागे व्हा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना न्याय देण्यात दिरंगाई केल्याबद्दल संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच तात्काळ अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पालकमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले.

आमच्या मुलांना न्याय द्या — विलास कोरडे

दत्तनगर वस्तीशाळेची विद्यार्थी पटसंख्या ३४ असून, त्याच इमारतीत अंगणवाडी चालते व तेथे ६४ बालकांची नोंद आहे. सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज व पंखे यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. पालक व मुख्याध्यापकांनी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याची खंत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी यावेळी व्यक्त केली.

कितीही लाटले भूखंड तरी होत नाही वाकडा “बाल”; आणखी एका घोटाळ्यात अडकला अजित पवार चा लाल

पुणे — पुण्यातील मुंढवा जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू या प्रकरणात जो साक्षिदार आहे, त्याच व्यक्तीच्या संगनमताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी ‘कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनी’द्वारे परस्पर भूखंड लाटला आणि ३०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
या भूखंडावर ‘अनंत वन’ हा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे ‘डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजी असोसिएशन’चे कार्यालय स्थापन्यात आले असून प्रकल्पातील इतर मालमत्तांची थेट चालू बाजारभावमुल्यानुसार (रेडीरेकनर) विक्री करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुंढवा जमीन घोटाळ्या पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला साहिल प्रधान आणि इतर सदस्यांची नावे या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणातही आढळून येत असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

कुंभार म्हणाले, ‘पुण्यातील शिवाजीनगर येथील सुमारे दोन एकरचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून ६० वर्षाच्या दीर्घ मुदतीवर कल्पतरू प्लांटेशन कंपनीला देण्यात आला. कालांतराना या ठिकाणच्या १५ हजार चौरस फूट जागेवर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून ६३ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेली इमारत उभारण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) नोंदणी क्रमांक पी ५२१०००१४४९४ या क्रमांकाद्वारे याची नोंदही उपलब्ध आहे. वास्तविक धर्मादाय ट्रस्टची जागा भाडेपट्ट्याव देण्यात आली असताना या जागेची डेक्कन शुगर आणि पुन्हा कल्पतरू प्लांटेशन असे हस्तांतरण दाखविण्यात आले. तसेच जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनीने या जागेवरील सहा मजले परस्पर विक्री करण्यात आले आहे. ज्याची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.’डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला ‘कुलमुखत्यार’ देण्यात आले. प्रधान ही व्यक्ती मुंढवा जमिन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शितल तेजवानी यांच्यात जो करार झाला त्या व्यवहारांत साक्षिदार आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. या जागेसाठी निविदा प्रक्रिया राबवताना दौंड शुगर लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्पवृक्ष प्रायव्हेट लिमिटेड या उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित तीन कंपन्यांच्याच निविदा येणे, त्यापैकी कल्पवृक्ष कंपनीला अंतिम निविदा मंजूर होणे, कंपनीने थेट जागा विकसित करणे हा योगायोन नसून ठरवून हा ठरवून भूखंड लाटण्याचा प्रकार आहे. कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि खासदार सुनेत्रा पवार या इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत.

जागेवर २५ कोटींचे कर्जही

मुदतीनुसार भाडेतत्वावर जागा दिल्यानंतर संबंधित जागेवर कोणताही वित्त पुरवठा किंवा बँकेचे कर्ज काढता येत नाही. परंतु या जागेवर २५ कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे. सन २०१७ पासून या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आणि नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याठिकाणी आलिशान कार्यालय सुरू झाल्यावर याबाबत कायदेशीर माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली. कल्पतरू प्लांटेशन कंपनी यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या जागेचा काही भाग परस्पर विक्री केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे कुंभार यांनी नमूद केले.

महारेराच्या आदेशाला केराची टोपली

‘महारेरा’ यांनी देखील या जागेची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार समोर आल्याने हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकल्पाचे बँक खाते गोठवत प्रवर्तकांनी प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदी सोबत साठेकरार आणि विक्री करार करण्यास मज्जाव असल्याच्या सूचना दिल्या. मात्र या ठिकाणी ‘अनंत वन’ हा प्रकल्प या ठिकाणी उभा केला असून शासनाच्या विरोधात लढणाऱ्या कंपनीच्या प्रकल्पांमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे कार्यालय असणे कितपत योग्य आहे, असेही कुंभार यांनी सांगितले.