Home Blog Page 31

NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर चालला बुलडोझर

0

बीड — देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख सूत्रधार म्हणून नाव समोर आलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीच्या बीड शहरातील अनधिकृत बांधकामावर अखेर बुलडोझर चालविण्यात आला आहे.

नगरपालिकेकडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणांने जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

नीट (NEET )पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना पी. व्ही. कुलकर्णी ची बीडमधील मोठी मालमत्ता चर्चेत आली होती. शाहूनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या त्यांच्या व्यावसायिक कॉम्प्लेक्सची नगरपालिका प्रशासनाने पाहणी केली होती. तपासणीदरम्यान बांधकामासाठी आवश्यक परवानग्या नसल्याचे तसेच अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस देत बांधकाम स्वतःहून हटविण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा पालिकेकडून थेट तोडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. मुदत संपल्यानंतर आता नगरपालिकेकडून बुलडोझर आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बांधकाम पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, लातूरमधील RCC क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर आणि प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना न्यायालयाने 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या फ्लॅटवर विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेतले जात असल्याचे तपास यंत्रणांना आढळल्याची माहिती समोर आली आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी च्या मालमत्तेवर सुरू झालेल्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर विविध चर्चांना उधाण आले आहे. अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश या कारवाईतून दिला जात असल्याचे मानले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: राज्यात 98% पावसाचा अंदाज, डॉ. साबळे यांनी दिला इशारा

0

मुंबई —  देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी महाराष्ट्रासाठी तुलनेने दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यात सरासरीच्या सुमारे 98 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. मात्र पावसाचे वितरण असमान राहण्याची आणि अनेक भागांत पावसाचे खंड पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. साबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी असला तरी अत्यंत कमी पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही. तथापि, पावसाचे स्वरूप विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याने पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

विभागनिहाय पावसाचा अंदाज

डॉ. साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यातील विविध विभागांमध्ये पुढीलप्रमाणे पाऊस अपेक्षित आहे:
🕳️.   पश्चिम विदर्भ – 97 टक्के
🕳️.   मध्य विदर्भ – 100 टक्के
🕳️.   मराठवाडा – 100 टक्के
🕳️.  पूर्व विदर्भ – 96 टक्के
🕳️.   उत्तर महाराष्ट्र – 96 टक्के
🕳️.  पश्चिम महाराष्ट्र – 97.6 टक्के
🕳️.  कोकण – सरासरीइतका पाऊस
पुणे, नागपूर, यवतमाळ, परभणी आणि दापोली या भागांमध्ये सरासरीइतक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक भागांत पडू शकतात पावसाचे मोठे खंड

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दापोली, अकोला, पुणे आणि यवतमाळ येथे लहान स्वरूपाचे खंड पडू शकतात. कराड, पाडेगाव आणि निफाड भागात मध्यम स्वरूपाचे खंड पडण्याची शक्यता आहे.
तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी आणि नागपूर परिसरात मोठे खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये आवर्षणसदृश परिस्थिती निर्माण होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

यंदाच्या हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिला आहे. सोयाबीन, मूग, उडीद, मटकी, चवळी, बाजरी आणि ज्वारी यांसारख्या पिकांची निवड फायदेशीर ठरू शकते.
तसेच खालील आंतरपीक पद्धतींचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात आली आहे:
बाजरी + तूर
तूर + भुईमूग
कापूस + मूग
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रासाठी यंदाचा मान्सून सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता असली तरी पावसाचे असमान वितरण आणि दीर्घ खंड ही मोठी चिंता ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारण, पीक विविधीकरण आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून संभाव्य जोखीम कमी करण्याची गरज आहे.

भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” : भाशिप्रच्या “बबड्या”साठी कायद्याच्या आयचा घोऽऽ। सेवा जेष्ठता डावलून मुख्याध्यापक अन् संचालक ही कसा झाला?

0

बीड — आरएसएस च्या विचारधारेने भाशिप्र मध्ये मांडीवर घेतलेल्या ” बबड्याकायद्याच्या आयचा घोऽऽ! म्हणत सेवा जेष्ठता यादी डावलत सावरकर च्या मुख्याध्यापक पदावर विराजमान झाला. इतकच नाही तर त्याच शिक्षण संस्थेत संचालक ही झाला. हे कमी की काय म्हणून “चंपावती” शिक्षण संस्थेत शिक्षण सभापतीपदही मिळवलं. या दोन्ही ठिकाणी त्याने भ्रष्टाचाराच्या “चंद्र”कला दाखवत पाळे”मुळे” खोलवर रुजवली असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे.
भाशिप्र संस्थेत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवताना लाडक्या “बबड्या” ने कायदे व नियमांची विल्हेवाट कशी लागवायची यामध्ये डॉक्टररेटच मिळवली. याच ज्ञानाचा फायदा उचलत सेवा जेष्ठता यादीला फाट्यावर मारत सावरकर मध्ये मुख्याध्यापक पदं मिळवलं. एवढ्यावरच त्याची भूक शांत झाली नाही. भाशिप्र उभा करताना ज्या लोकांनी रक्ताचं पाणी केलं कुठलाही स्वार्थ न पाहता संस्था नावारूपाला आणली त्यांच्याच मुंडक्यावर पाय देऊन संचालक पद पदरात पाडून घेतलं.विशेष म्हणजे संस्काराचे धडे लोकांना शिकवणाऱ्या विचारधारेने हा दुसऱ्याचा “बबड्या” स्वतःच्या कसा मांडीवर घेतला असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. चला आपलाच माणूस संचालक झाला ही भावना ठेवून कोणीच अक्षेप घेतला नाही.मग काय चौफेर “चंद्र”कला दाखवायला मैदान मोकळ सापडलं पाळे”मूळे“खोलवर रूजवत मार्गात येणारे प्रत्येक अडथळे दूर करत हा कधी लाडका झाला ते कुणालाच कळले नाही. जिथे जिथे खायला मिळेल तिथलं तिथलं अन्नद्रव्य शोषून घेत संस्थेची वाढ खुंटविण्यात मोलाची कामगिरी पार पाडली. त्यासाठी शासकीय नियमांची, कायद्याची ऐसी की तैसी करत बनावट कागदपत्रांचा आधार घेत शोषणाला सुरुवात केली. संस्था ओसाड करताना स्वतःची वाढ कशी होईल याकडेच प्राधान्याने लक्ष दिलं.
हे कमी होतं की काय म्हणून एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या नामवंत चंपावती शिक्षण संस्थेत देखील प्रवेश मिळवला. संस्थेत महत्त्वाचा असलेलं शिक्षण सभापतीपद पदरात पाडून घेतलं. यावेळी खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम’ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम (Public Trust Act) अंतर्गत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संस्थांच्या संचालक किंवा विश्वस्त मंडळात राहण्यावर निर्बंध आहेत तरीही हे घडलं.
दोन वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये एकाच वेळी संचालक किंवा कार्यकारी पदावर राहणे म्हणजे हिताचा संघर्ष (Conflict of Interest) निर्माण होण्यासारखे आहे. एका संस्थेचे हित जपताना दुसऱ्या संस्थेच्या हिताला बाधा पोहोचू शकते याचा विचार केला जातो.
सावरकर च मुख्याध्यापक हे पद शाळेच्या दैनंदिन प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाजासाठी पूर्णवेळ (Full-time) आहे. त्यामुळे दुसऱ्या संस्थेच्या शिक्षण सभापतीपदाची जबाबदारी सांभाळल्यास मुख्याध्यापक पदाच्या मूळ कर्तव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असलेले निर्बंध देखील विचारात घेतले गेले नाहीत. विचारात का घ्यायचे? ते संस्कारातच नाहीत तर अंमलात कसे येणार? हा मोठा प्रश्न आहे. दोन्हीही संस्थांच हित महत्त्वाचं की स्वतःच्या तुंबडी भरण्याचं हित महत्त्वाचं? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. परिणामी एकेकाळी सुवर्णयुग अनुभवलेली चंपावती शिक्षण संस्था देखील आज मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसू लागली आहे. भाशिप्र संस्था असो की चंपावती शिक्षण संस्था असो दोन्हींचाही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बोन्साय करतांना कायद्याच्या आयचा घोऽऽ! म्हणत सुरू असलेल्या नंगानाचाला आळा बसणार का? लाडका “बबड्या” अशीच घाण करत राहणार का? दोन्हीही शिक्षण संस्था डबघाईला येणार का? लाडका “बबड्या” शिक्षण संस्थेसोबतच संघ विचारधारेला देखील बदनामीच्या गर्तेत घालणार का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत गणवेश; राज्य सरकारचा  निर्णय

0

मुंबई — राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत गणवेश योजनेत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल करत नवीन नियम लागू केले आहेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी 29 मे रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे गणवेश वितरणातील विलंब, निकृष्ट दर्जाचे कापड आणि गुणवत्तेच्या तक्रारींना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

केंद्र शासनाच्या ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थी तसेच दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ दिला जातो.
याशिवाय राज्य शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही गणवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दर्जेदार कापड अनिवार्य

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडाबाबत शासनाने कठोर निकष निश्चित केले आहेत.
नवीन नियमांनुसार:
70:30 किंवा 80:20 पॉलिस्टर-व्हिस्कोज-कॉटन मिश्रित कापड वापरणे आवश्यक.
विद्यार्थ्यांच्या त्वचेला त्रास होणार नाही याची विशेष काळजी.
100 टक्के पॉलिस्टर कापड वापरण्यास पूर्ण बंदी.
दर्जेदार आणि टिकाऊ कापडाचा वापर बंधनकारक.

समग्र शिक्षा’ लोगो अनिवार्य

सुधारित नियमांनुसार प्रत्येक गणवेशावर ‘समग्र शिक्षा अभियान’चा अधिकृत लोगो लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गणवेशांची ओळख स्पष्ट होणार आहे.

महिला बचत गटांना प्राधान्य

स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी गणवेश शिवणकामाची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांना देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
प्रथम प्राधान्य स्थानिक महिला बचत गटांना.
उपलब्धता नसल्यासच बाहेरील बचत गटांची मदत.
ग्रामीण भागात महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा.

गुणवत्तेसाठी विशेष तपासणी यंत्रणा

गणवेशाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाने बहुस्तरीय तपासणी व्यवस्था लागू केली आहे.
यामध्ये:
केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची नियमित तपासणी.
प्रत्येक तालुक्यातून कापडाचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत चाचणी.
राज्यस्तरीय विशेष तपासणी पथकाची स्थापना.
जिल्हानिहाय अचानक तपासण्या.

निकृष्ट कापड आढळल्यास कठोर कारवाई

गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादार किंवा जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

स्काऊट-गाईड उपक्रमानुसार एक गणवेश

नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दोन गणवेशांपैकी एक गणवेश स्काऊट-गाईड उपक्रमाशी सुसंगत असणे आवश्यक राहील.
मुलांसाठी गणवेश
आकाशी रंगाचा शर्ट
गडद निळी हाफ पँट
मुलींसाठी गणवेश
आकाशी रंगाचा शर्ट
गडद निळा स्कर्ट

एकाच दिवशी होणार गणवेश वाटप

राज्य सरकारने सर्व शाळांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप एकाच वेळी आणि एकाच दिवशी करण्यात यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गणवेश उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मोफत गणवेश योजनेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेत वितरण यावर भर दिला जाणार आहे. महिला बचत गटांना रोजगार, विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश आणि निकृष्ट साहित्याविरोधात कठोर कारवाई अशा त्रिसूत्रीवर आधारित ही सुधारित योजना राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.

धनंजय देशमुख-समाधान खिंडकर प्रकरणात मोठा खुलासा; दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

0
बीड ग्रामीण पोलिसांचा तपास पूर्ण; CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांनंतर न्यायालयात अहवाल सादर होणार

बीड —  जिल्ह्यातील चर्चित धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यातील परस्पर तक्रारींच्या प्रकरणात बीड ग्रामीण पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना मिळालेल्या CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे दोन्ही तक्रारी खोट्या असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे धनंजय पंडितराव देशमुख (रा. मस्साजोग, ता. केज) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 191/2026 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात समाधान खिंडकर आणि इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दुसरीकडे, समाधान बाबुराव खिंडकर (रा. बेलवाडी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 192/2026 दाखल करण्यात आला होता. या तक्रारीत धनंजय देशमुख आणि इतर दोन ते तीन जणांनी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

CCTV तपासात धक्कादायक निष्कर्ष

दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज जप्त करून त्याची सखोल पडताळणी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, फुटेजमध्ये कोणतीही छेडछाड अथवा संशयास्पद हालचाल आढळून आलेली नाही.

30 मे 2026 रोजी रात्री 10.05 ते 12.00 या कालावधीतील फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, फिर्यादींनी नमूद केलेली कोणतीही घटना त्या फुटेजमध्ये घडल्याचे दिसून आले नाही.

साक्षीदारांच्या जबाबातूनही तक्रारी खोट्या

तपासादरम्यान घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. हे जबाब BNSS कलम 105 अंतर्गत ई-साक्ष पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर दोन्ही तक्रारी तथ्यहीन आणि खोट्या असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

न्यायालयात सविस्तर अहवाल सादर होणार

दोन्ही फिर्यादींनी जाणूनबुजून खोटी माहिती देत पोलीस आणि न्याय यंत्रणेचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल संबंधित न्यायालयात सादर करण्यात येणार असून, खोटी तक्रार देणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बीड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही वैयक्तिक किंवा इतर कारणांसाठी पोलीस व न्याय यंत्रणेचा गैरवापर करू नये. खोटी तक्रार देणे, दिशाभूल करणारी माहिती पुरवणे किंवा खोटे आरोप करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख अडचणीत; पिस्तूल रोखून धमकी दिल्याचा आरोप

0

बीड —  मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेतील पिस्तूल काढून डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादी समाधान खिंडकर (वय 30, रा. बेलवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या मित्रांसोबत बीड बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी रवीराज साबळे हे देखील तेथे उपस्थित होते. इंस्टाग्रामवर लाईव्ह सुरू असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्यांचा मोबाईल घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाईल का घेतला, अशी विचारणा केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त करत धमकी दिली. तसेच अंगरक्षकाच्या कमरेतील पिस्तूल काढून फिर्यादीच्या डोक्याला लावत “तुला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता त्यांच्याविरुद्धच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गुटख्या विरुद्ध एलसीबीची मोठी कारवाई; तीन ठिकाणी छापेमारी 12.13 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. 31 मे 2026 रोजी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी तब्बल 12 लाख 13 हजार 800 रुपयांचा अवैध गुटखा व वाहने जप्त केली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथके तयार करून बीड शहर, युसूफ वडगाव आणि सिरसाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

बीड शहरात 2.21 लाखांचा गुटखा जप्त

बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकासमोर एका व्यक्तीकडे विक्रीसाठी ठेवलेला अवैध गुटखा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 21 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

युसूफ वडगावमध्ये स्वीफ्ट कारसह मुद्देमाल ताब्यात

युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीकडून स्वीफ्ट कारमधून अवैध गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. कारवाईदरम्यान पोलिसांनी गुटखा आणि स्वीफ्ट कारसह एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सिरसाळा हद्दीत टेम्पोसह 5.42 लाखांचा माल पकडला

सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पोहनेर येथे एका व्यक्तीच्या अँटोरिक्षा/टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा भरून विक्रीसाठी नेला जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी 5 लाख 42 हजार 800 रुपयांचा गुटखा व वाहन जप्त केले.

एकूण 12.13 लाखांचा मुद्देमाल जप्त

तीन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी 12 लाख 13 हजार 800 रुपयांचा अवैध गुटखा आणि वाहने जप्त केली असून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक, बीड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोउपनि श्रीराम खटावकर, महेश विघ्ने, सुशांत सुतळे तसेच राहुल शिंदे, विकास राठोड,अशोक दुबाले,अर्जुन यादव,महेश जोगदंड, राजु पठाण, दिलीप गिते, बप्पा घोडके, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, मनोज परजणे,अश्फाक सय्यद, नितीन वडमारे, गणेश मराडे, यांनी सहभाग घेतला.

मराठा आरक्षण आंदोलन:मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीतील आमरण उपोषण मागे घेतले

0

अंतरवाली सराटी — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि विविध मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे तसेच स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करणे या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेतही सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

दरम्यान, राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर दोन्ही बाजूंमध्ये प्राथमिक तोडगा निघाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

उपोषण मागे घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या हितासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. सरकारने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करण्यात येईल.”

सरकार आणि मराठा आंदोलकांमधील संवादामुळे सध्या निर्माण झालेला तणाव काहीसा कमी झाला असला तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार पुढे कोणती पावले उचलते आणि दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मान्सूनचा मोठा इशारा! यंदा भारतात केवळ 90% पाऊस; 2015 नंतरचा सर्वात कोरडा हंगाम ठरण्याची शक्यता

0

नवी दिल्ली —  भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढवणारा अंदाज जाहीर केला आहे. विभागाने एप्रिलमध्ये दिलेला पावसाचा अंदाज कमी करत आता जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्य सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात IMD ने पावसाचे प्रमाण 92 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, नव्या हवामान मॉडेल्स आणि महासागरीय परिस्थितीच्या आधारे हा अंदाज खाली आणण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास 2015 नंतरचा हा सर्वात कोरडा मान्सून हंगाम ठरू शकतो. 2015 मध्ये देशाला सामान्य सरासरीच्या फक्त 86 टक्के पाऊस मिळाला होता.

एल निनोचा वाढता प्रभाव

हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या कमी पावसामागील प्रमुख कारण म्हणजे ‘एल निनो’ ही हवामानविषयक घटना. पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते.

IMD च्या अंदाजानुसार, जूनमध्ये एल निनोचा प्रभाव तुलनेने सौम्य राहील. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता वाढू शकते आणि सप्टेंबरपर्यंत हा प्रभाव अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

IOD कडूनही दिलासा नाही

सुरुवातीला इंडियन ओशन डायपोल (IOD) सकारात्मक टप्प्यात जाण्याची अपेक्षा होती. सकारात्मक IOD मुळे एल निनोच्या परिणामांचा काही प्रमाणात प्रतिकार होऊ शकला असता. मात्र, नव्या अंदाजानुसार संपूर्ण मान्सून हंगामात IOD तटस्थ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाला अतिरिक्त बळ मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

शेती, पाणी आणि वीज क्षेत्रावर परिणाम?

देशात सध्या अन्नधान्य आणि जलसाठ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने तातडीचे संकट निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. तरीही कमी पर्जन्यमानाचा परिणाम शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि औद्योगिक क्षेत्रावर जाणवू शकतो.

विशेषतः खरीप हंगामातील पिकांसाठी पावसाचे कमी प्रमाण आव्हानात्मक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, एल निनोचा प्रभाव पुढील रब्बी हंगामावरही पडू शकतो.

उष्णतेचाही वाढता धोका

मान्सून कमकुवत राहण्याच्या अंदाजासोबतच जून महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटांचे दिवस नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस अधिक राहू शकतात.

सावध राहण्याची गरज

गेल्या काही वर्षांत भारताला चांगल्या मान्सूनची साथ लाभली होती. मात्र, यंदाचा हंगाम वेगळा ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी, जलसंपदा व्यवस्थापन यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत संभाव्य परिस्थितीसाठी तयारी ठेवणे आवश्यक आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण : साक्षीदार दादा खिंडकर यांना भावाकडून धमकीचा आरोप

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दादा खिंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दादा खिंडकर हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते महत्त्वाचे साक्षीदार मानले जात असून, त्यांना साक्ष देऊ नये आणि प्रकरण मिटवून घ्यावे यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तक्रारीनुसार, दादा खिंडकर आपल्या घरी असताना त्यांचा लहान भाऊ समाधान खिंडकर याने जुना वाद उकरून काढत त्यांच्याशी वाद घातला. यावेळी “धनंजय देशमुख यांच्यासोबत राहू नकोस, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस आणि ते प्रकरण मिटवून घे,” असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप आहे.
यावर दादा खिंडकर यांनी विरोध दर्शवत, “तुला या प्रकरणाशी काय करायचे आहे? तू तुझे काम कर,” असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर शिवीगाळ व धमकावण्याचा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर दादा खिंडकर यांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर यांच्यात कौटुंबिक कारणांमुळे पूर्वीपासून मतभेद असल्याचेही समोर आले आहे. तसेच, यापूर्वी काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी दादा खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
मात्र, एका चर्चित हत्या प्रकरणातील साक्षीदाराला स्वतःच्या सख्या भावाकडूनच साक्ष बदलण्यासाठी किंवा साक्ष न देण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाला आता नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आगामी तपासात या आरोपांमागील नेमकी पार्श्वभूमी आणि सत्य समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.