Home Blog Page 30

शाळा 15 जूनपासून ऑफलाईनच सुरू होणार; ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाचा मोठा खुलासा

0

मुंबई —  राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत गेल्या काही दिवसांपासून पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळा उशिरा सुरू होणार का, किंवा यंदाही काही काळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार का, अशा विविध चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. मात्र, शिक्षण विभागाने या सर्व अफवांना पूर्णविराम देत नवीन शैक्षणिक वर्ष पारंपरिक ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीनेच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासून नियमितपणे सुरू होणार आहे. या नियोजित तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे.


यंदा ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा निर्णय शासनाच्या विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य मंडळाच्या शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी देण्यात आली होती. आता सुटीचा कालावधी संपत असून शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

विदर्भातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल

विदर्भातील काही भागांमध्ये अद्यापही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तेथील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरवल्या जाणार आहेत. त्यानंतर 30 जूनपासून विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.
शिक्षण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, शाळा सुरू होण्याबाबत कोणताही बदल झालेला नसून सर्व शाळांमध्ये 15 जून रोजी पहिली घंटा वाजणार आहे.

मुदतबाह्य लस्सी नष्ट, रिफाईंड सोया तेल जप्त; केज-पाटोदा-माजलगावात अन्न विभागाची कारवाई

0

बीड — जिल्ह्यात भेसळखोर, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रेते आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 25 मे 2026 पासून जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून अनेक ठिकाणी छापेमारी करून अन्नपदार्थांचे नमुने आणि मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेदरम्यान केज तालुक्यातील विविध आस्थापनांची तपासणी करून मिठाईचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. पाटोदा तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रांवर तपासणी करून दूधाचे दोन नमुने प्रयोगशाळेसाठी जप्त करण्यात आले. तर माजलगाव येथे 71 किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला.

याशिवाय शिरूर शहरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करत 158 किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे 24 हजार 806 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बीड तालुक्यातील वासनवाडी येथील एका लस्सी उत्पादन केंद्रावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर करून लस्सीचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. यावेळी 102 लिटर लस्सीचा साठा ताब्यात घेऊन जागेवरच नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे 8 हजार 125 रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अन्न सुरक्षा विभागाने घेतलेले सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 30 मे रोजी बीड शहरातील एका पानटपरीवर छापा टाकून तब्बल 2 लाख 60 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर 31 मे रोजी तलवडा येथील पानटपरीवरून 5 हजार 392 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच 2 जून रोजी वडवणी येथील एका किराणा दुकानातून 23 हजार 580 रुपयांचा गुटखा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने आगामी काळातही भेसळयुक्त अन्नपदार्थ, मुदतबाह्य वस्तू आणि प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांविरोधात नियमित धाडसत्र सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवरून नवीन वाद; 12 जूनला OBC समाज रस्त्यावर उतरणार

0

मुंबई — मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, ओबीसी प्रमाणपत्रधारकांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना 12 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली. जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत कथित बोगस दाखल्यांना मान्यता देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेंडगे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकार त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आहे. मात्र, या प्रक्रियेत ओबीसी समाजाच्या अधिकारांवर गदा येत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका करत, काही निर्णयांमुळे ओबीसी समाजात नाराजी असल्याचे सांगितले.


यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली असून, ओबीसी समाजाची भूमिका ऐकून घेण्याची मागणी केली आहे. तसेच, कुणबी नोंदींच्या आधारे मिळालेल्या प्रमाणपत्रांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा न्यायालयीन मार्गाने पाठपुरावा करण्याचा इशाराही दिला.
मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र या मुद्द्यांवरून राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात सरकारची भूमिका आणि विविध समाजघटकांच्या प्रतिक्रिया याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

परळीत २६ किलो गांजासह पावणेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत ;एलसीबी ची कारवाई

0

बीड —  स्थानिक गुन्हे शाखेने परळीमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. परळी येथील रामनगर भागात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २६ किलो २५८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ७ लाख ८७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


मंगळवारी (दि. २ जून) दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळीतील रामनगर भागात राहणारा संशयित राहुल राजू मोहिते (वय २६ वर्षे) याच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना घरात लपवून ठेवलेला २६ किलो २५८ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह एकूण ७ लाख ८७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी राहुल मोहिते याच्याविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई बीड एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन, उपनिरीक्षक दीपक राठोड, सफौ बालाजी दराडे, अंमलदार रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, प्रल्हाद भताने, पुरुषोत्तम काळे, शीतल घुगे, पंडित पांचाळ, कैलास कोलमवाड, शुभम घुले आणि महिला पोलीस अंमलदार भोसले आदींनी केली.

जुगार अड्ड्याला विरोध करणाऱ्या महिलेला अमानुष मारहाण; रंजेगावातील घटनेने खळबळ

0

बीड — बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातील रंजेगाव येथे जुगार अड्ड्याला विरोध करणाऱ्या एका महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका कथित जुगार अड्ड्यामुळे शाळकरी मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत संबंधित महिलेने त्याला विरोध केला होता. याच कारणावरून काही जणांनी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पीडित महिलेच्या आरोपानुसार, आरोपींनी प्रथम तिच्या घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निखिल आबूज आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी महिलेला बेदम मारहाण केली. हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यादरम्यान महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मुलांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात आरोपींचे  वाल्मीक कराड सोबत संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी आणि वाल्मीक कराड यांचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत यंत्रणेकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चौसाळा बायपासवर पहाटे थरारक पाठलाग; डिझेल चोरी करणारी 5 जणांची टोळी पोलिसांनी पकडली

0

चौसाळा —  राज्यात संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई करत डिझेल चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. चौसाळा बायपास परिसरात पहाटेच्या सुमारास संशयित वाहनाचा थरारक पाठलाग करून नेकनूर पोलिसांनी आरोपींना पकडले. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इराण-इराक आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी डिझेल आणि इतर इंधनाचा साठा करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर डिझेल चोरी करून त्याची अवैध विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.


या माहितीच्या आधारे मंगळवारी (दि. २ जून) पहाटे चौसाळा बायपास परिसरात पोलिसांनी सापळा रचला. पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ पुंडे आणि पोलीस शिपाई विलास घुले यांनी संशयित वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत सुरू असलेल्या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी वाहन अडवून पाचही संशयितांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, डिझेल वाहतुकीसाठी वापरली जाणारी साधने आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास चौसाळा पोलीस करीत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला हिरवा कंदील; 36,585 कोटींची तरतूद

0

मुंबई —  राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (2 जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची शक्यता असून 65 लाखांहून अधिक कर्जखाती या योजनेच्या कक्षेत येणार आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” मंजूर केली असून यासाठी तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आचारसंहितेमुळे घोषणेला विलंब

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा तातडीने केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडून योजनेची अधिकृत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

फडणवीसांनी दिले होते संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच कर्जमाफीबाबत महत्त्वाचे संकेत दिले होते. सरकार 30 जूनपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. यासंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांशी चर्चा पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले होते.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ

राज्य सरकार केवळ कर्जमाफीच नव्हे तर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देणार आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे सांगितले जात आहे.

समितीच्या अहवालानंतर निर्णय

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, राज्य सरकारचा सहकार विभाग लवकरच कर्जमाफीच्या अटी व शर्तींबाबत सविस्तर परिपत्रक जारी करणार असून त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम प्रक्रिया सुरू होणार आहे.

सह्याद्री माझा इफेक्ट : TET घोटाळ्यानंतर शासन सतर्क; उत्तीर्ण शिक्षकांची माहिती तातडीने मागवली”

0

मुंबई — बीडसह राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अनेकांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर भ्रष्टाचाराची पाळे”मुळे” खोलवर रुजवत “चंद्र”कला दाखवणाऱ्या दलालाने
टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेकांकडून पैसे उकळत तुंबडी भरल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हा परिषदांकडून तातडीने मागवली आहे. आगामी साप्ताहिक बैठकीत मुख्य सचिवांकडून या विषयाचा आढावा घेतला जाणार असल्याने संबंधित माहिती आज दुपारी ४ वाजेपर्यंत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
बीडमध्ये शालार्थ आयडी घोटाळा, पदभरती घोटाळा, थकीत वेतन घोटाळा, टीईटी प्रमाणपत्र घोटाळा मोठ्या प्रमाणावर होऊन कोट्यावधीची आर्थिक उलाढाल यातून झाली. अनेकांनी “चंद्र” प्रकाशात भ्रष्टाचाराचे आपणच “कांत” आहोत हे दाखवत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” घट्ट रोवली. या घोटाळ्याची एक एक प्रकरण “सह्याद्री माझा” उजागर करत असताना शिक्षण प्रशासन देखील खडबडून जाग होऊ लागला आहे.
बीड जिल्ह्यात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अनेक शिक्षक केलेल्या घोटाळ्यामुळे किंवा त्यांच्यावर दाखल झालेल्या फसवणुकीसारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यामुळे कायमस्वरूपी परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. अनेकांनी भ्रष्टाचारी “बबड्या“च्या भूलथापांना बळी पडत शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा मोजला. हे सगळे शिक्षक नावाजलेल्या संस्थांमधून शासनाचा पगार बिनधास्त उचलत आहेत. थोडक्यात भ्रष्टाचाराला आणखी एक संधी उपलब्ध होत आहे. याच सगळ्या बाबींचा विचार करून ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन यांनी एक जून रोजी 2026 रोजी पत्र जारी केले आहे. त्या पत्रानुसार, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना आवश्यक माहिती पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाने जिल्हा परिषदांकडून खालील माहिती मागवली आहे:

🕳️. • टीईटी (TET) उत्तीर्ण शिक्षकांची एकूण                 संख्या
🕳️•  टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी
• 🕳️ शिक्षकांनी टीईटी परीक्षा द्यावी व ती      उत्तीर्ण व्हावी यासाठी जिल्हा स्तरावर राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा तपशील

राज्यातील शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी टीईटी परीक्षा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे टीईटी पात्र शिक्षकांची सद्यस्थिती, जिल्हानिहाय प्रगती आणि प्रशासनाने केलेले प्रयत्न यांचा सखोल आढावा घेण्यासाठी शासनाने ही माहिती मागविल्याचे समजते.

दरम्यान, शासनाच्या या आदेशामुळे सर्व जिल्हा परिषदांमध्ये माहिती संकलनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून संबंधित विभागांकडून आकडेवारी अंतिम करण्यात येत आहे.

NEET घोटाळ्यावरून 6 जूनला कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलनाची घोषणा

0

नवी दिल्ली — NEET पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या सोशल मीडिया चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी ते 6 जून रोजी भारतात परतणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे दिली.


देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांचा ‘कॉकरोच’ असा उल्लेख केल्याचा दावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर या शब्दावरून प्रेरित होऊन ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’ नावाची ऑनलाइन चळवळ सुरू झाली. अल्पावधीतच या चळवळीला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.


अभिजीत दिपके यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात नागरिकांना संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, 6 जून रोजी दिल्ली विमानतळावर आगमनानंतर समर्थकांसह जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्याच्या उद्देशाने पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे मोर्चा काढण्यात येणार आहे.
दिपके यांनी असेही म्हटले की, भारतात परतल्यानंतर विमानतळावरच अटक होण्याची भीती त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना वाटत आहे. मात्र भारत हे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने CJP च्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) खात्याच्या पुनर्सक्रियतेबाबत कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांतच ही घोषणा करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये बोलताना दिपके यांनी सांगितले की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ते सातत्याने आवाज उठवत आहेत. तसेच विविध परीक्षा प्रक्रियांमधील कथित गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या दाव्यानुसार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावरही लाखो नागरिक या मोहिमेच्या समर्थनार्थ सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले.
लखनऊ, जयपूर आणि महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये या मुद्द्यावरून निदर्शने होत असल्याचा दावा करताना दिपके यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या भावना दुर्लक्षित केल्याचा आरोप केला. देशभरातील 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ झाला असल्याचा दावा त्यांनी केला असून, यामध्ये NEET, CBSE, CUET आणि SSC-GD परीक्षांशी संबंधित उमेदवारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी प्रस्तावित आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

एमआयडीसीतील गोदामाला भीषण आग; सरकी-पेंड जळून खाक,6 तासानंतर  आग आटोक्यात

0

बीड —  शहरातील एमआयडीसी परिसरात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सरकी आणि पेंडचा मोठा साठा जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी होती की, अग्निशमन दलाला तब्बल सहा तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आकाशवाणी केंद्रामागील गोदामात लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील आकाशवाणी केंद्रामागे असलेल्या सुभाष सारडा यांच्या मालकीच्या गोदामात सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर सरकी, पेंड आणि अन्य ज्वलनशील साहित्याचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच उग्र रूप धारण केले.
आगीतून निघणारे धुराचे प्रचंड लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब, पाण्याचे टँकर आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आग विझवण्यासाठी जेसीबीची मदत

गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवण्यात आलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग नियंत्रणात आणणे अग्निशमन दलासाठी मोठे आव्हान ठरले. सतत पाण्याचा मारा करूनही ज्वाला पुन्हा-पुन्हा भडकत असल्याने गोदामातील साहित्य जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
सुमारे सहा तास सुरू असलेल्या बचाव आणि अग्निशमन मोहिमेनंतर अखेर दुपारी बारा वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मोठे आर्थिक नुकसान

या भीषण आगीत गोदामातील सरकी, पेंड, ताडपत्री तसेच शेडवरील पत्रे पूर्णपणे जळून खाक झाली. आगीच्या तीव्रतेमुळे गोदामाच्या काही भिंतीही कोसळल्या. महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणेकडून पंचनामा सुरू असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.