Home क्राईम नेकनूर पोलिसांनी कात टाकली : अपघाती मृत्यूचा बनाव; पोलिसांनी 3 दिवसांत उघड...

नेकनूर पोलिसांनी कात टाकली : अपघाती मृत्यूचा बनाव; पोलिसांनी 3 दिवसांत उघड केला खून, 2 आरोपी अटक

0
10

बीड — चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात नेकनुर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेची लावलेली विल्हेवाट ठाण्याला आलेली मरगळ आता झटकली गेली असून नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर आणि संवेदनशील खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करण्यात नेकनूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपींनी हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या शास्त्रोक्त तपास आणि तांत्रिक विश्लेषणामुळे सत्य समोर आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लिंबागणेश — अंजनवती मार्गावरील गणेश माळ परिसरात रस्त्यालगत  किरण बंडू सोनवणे यांचा मृतदेह आढळून आल्याने सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांमध्ये विसंगती आढळून आल्याने नेकनूर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केज वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने रात्रंदिवस मेहनत घेतली. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), लोकेशन विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची साखळी मजबूत करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींनी पुरावे नष्ट करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेत तांत्रिक माहितीच्या आधारे ते फरार झाल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर विशेष पथके रवाना करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बीड, तळोजा पोलीस स्टेशन पनवेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले व त्यांचे पथक, टेक्निकल सेलचे विकी सुरवसे आणि इतर यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले. संयुक्त कारवाईत आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांना तळोजा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात दशरथ परदेशी (वय 25) आणि धीरज येडे (वय 26), दोघेही रा. अंजनवती, ता. जि. बीड यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा तपास अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली सफौ. संजय गुंड, दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख, गणेश परजने, बाबासाहेब साळुंखे, बालाजी ढाकणे आणि सुधाकर जायभाये यांनी यशस्वीपणे पार पाडली.

कोणताही ठोस सुगावा नसताना आणि अपघाताचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न झालेल्या या गुन्ह्याचा अवघ्या 72 तासांत उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने नेकनूर पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here