बीड — जिल्ह्यातील केज येथे आयशर टेम्पो चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेला टेम्पो धारूर येथील एमआयडीसी परिसरातून जप्त करण्यात आला असून आरोपींवर यापूर्वीही चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी नसीर कुरेशी, रा. रोजा मोहल्ला, केज यांनी केज पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांचा मालकीचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच -१५ – डी के ४२४१ हा ५ मे २०२६ रोजी रात्री घराच्या मागील मोकळ्या जागेत उभा केला होता. मात्र ६ मे रोजी सकाळी टेम्पो भाड्याने नेण्यासाठी गेले असता वाहन जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन संशयित व्यक्ती टेम्पो चोरी करताना स्पष्ट दिसून आले. पोलिसांनी माहिती संकलित करून संशयितांची ओळख उमेर ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी, रा. रोजा मोहल्ला, केज आणि आवेश ऊर्फ आवड्या खाँजा शेख, रा. कोकीजपरी, केज अशी पटवली.
दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींनी चोरी केलेला टेम्पो धारूर येथील एमआयडीसी परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो जप्त करून आरोपींसह पुढील कारवाईसाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, जफर पठाण, महेश जोगदंड, दिलीप गित्ते आणि गणेश मराडे यांच्या पथकाने केली.




