केज शिक्षण विभाग लाचखोरी प्रकरण समोर आले असून शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र किती बरबटलेले आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.
केज — बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासकीय कारभारावर प्रश्न उपस्थित होत असतानाच केज येथील शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास जालना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५६), कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज आणि जयगुरु शिवाजी गिरी, जिल्हा परिषद शिक्षक, तांदळे वस्ती, अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

चौकशी अहवालाच्या प्रकरणात लाचेची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या चौकशी अहवालासंदर्भातील प्रक्रिया सुरू होती. हा अहवाल व्यवस्थित तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी संबंधितांकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.
या तक्रारीची दखल घेत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी केज येथील शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्रात ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोघांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
केजमध्ये खळबळ; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे केजमध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची अपेक्षा असताना अशा प्रकरणांमुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होतात.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
कोणी लाच मागत असेल तर संपर्क साधा:
🛡️ ACB महाराष्ट्र – तक्रार नोंदवा ➔
अधिकृत संकेतस्थळ: acbmaharashtra.gov.in | टोल फ्री क्रमांक: 1064

