मंगळवेढ्याची कहानीच न्यारी ! १६ वर्षांच्या संसाराचं स्वप्न झालं भग्न…; चक्क “त्याने” गाढविणीशी केलं लग्न!

पत्नी परत यावी म्हणून पतीने… मंगलाष्टकं म्हणत गाढविणीच्या गळ्यात घातला हार, फोटो-व्हिडीओ व्हायरल

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अचानक मंगलाष्टकांचा आवाज सुरू झाला. गळ्यात हार घेऊन एक पती उभा होता. मात्र, त्याच्यासमोर नवरी म्हणून उभी होती ती चक्क गाढविणी! उपस्थितांना हा प्रकार पाहून नेमकं काय सुरू आहे, हे काही क्षण कळेना. पण त्यामागची कहाणी समोर आली आणि या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली.

हा प्रकार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेट आणि जिल्हा परिषद गेटसमोर घडला. दीपक सूर्यवंशी यांनी गाढविणीसोबत प्रतीकात्मक विवाह करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पण दीपक यांनी गाढविणीशीच लग्न का केलं? यामागे तब्बल १६ वर्षांच्या संसाराची कहाणी आहे.

१६ वर्षांपूर्वी झालं लग्न...

दीपक सूर्यवंशी हे मूळचे पुण्याचे असून सध्या सोलापुरात राहतात. सुमारे १६ वर्षांपूर्वी त्यांचा पूजा सूर्यवंशी यांच्याशी विवाह झाला. त्या काळातील परिस्थिती सांगताना दीपक म्हणतात, “पैसा, जमीन आणि नोकरी असतानाही आज लग्न होणं कठीण आहे. मात्र देवाच्या कृपेने १६ वर्षांपूर्वी मला मुलगी भेटली आणि लग्न झालं.”

यानंतर तब्बल १६ वर्षे संसार केल्याचे दीपक सांगतात. मात्र, याच संसाराला अचानक ब्रेक लागला.

आणि अचानक पत्नी घरातून निघून गेली…

पूजा सूर्यवंशी कोणतीही पूर्वकल्पना न देता आपल्याला सोडून गेल्याचे दीपक यांचे म्हणणे आहे. १६ वर्षांचा संसार अचानक मोडल्याने आपण पत्नीला परत आणण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतल्याचे ते सांगतात.

पत्नी पुन्हा घरी यावी आणि आपल्या संसाराला न्याय मिळावा, या मागणीसाठी दीपक मागील काही दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने त्यांनी अखेर आंदोलनाची दिशा बदलली.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘गाढवाचे लगीन’

आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दीपक यांनी ‘गाढवाचे लगीन’ हे प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गाढविणीला आणण्यात आले. त्यानंतर रीतसर मंगलाष्टके म्हणण्यात आली आणि गाढविणीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, या अनोख्या आंदोलनामागचा संदेश काय, असा प्रश्न उपस्थित होताच दीपक यांनी आपली व्यथा मांडली.

‘१६ वर्षांचा संसार करून माझा दोष काय?’

“१६ वर्षे प्रामाणिकपणे संसार केला. तरीही माझा संसार मोडला गेला. माझा दोष काय? प्रामाणिक संसार करणाऱ्या व्यक्तीला हेच उत्तर का?” असा सवाल दीपक सूर्यवंशी यांनी केला.

आपली पत्नी पुन्हा आपल्याकडे यावी आणि संसाराला न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पत्नीच्या जाण्यामागे कोणाचा हात? पतीचा दावा काय?

पत्नी आपल्यापासून दूर जाण्यामागे मेहुणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांचा हस्तक्षेप असल्याचा दावा दीपक सूर्यवंशी यांनी केला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच पत्नीने आपल्याला सोडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मात्र, या दाव्याबाबत संबंधितांची स्वतंत्र बाजू समोर आलेली नाही.

आंदोलनस्थळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे फोटो

या अनोख्या आंदोलनाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची छायाचित्रेही ठेवण्यात आली होती. प्रशासनाने जागे व्हावे आणि आपल्या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा, हा संदेश या आंदोलनातून देण्याचा प्रयत्न दीपक यांनी केला.

एकीकडे १६ वर्षांचा संसार, दुसरीकडे पत्नी अचानक सोडून गेल्याची तक्रार आणि त्यानंतर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट गाढविणीसोबत केलेला प्रतीकात्मक विवाह… त्यामुळे सोलापुरातील हे आंदोलन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles