Home आरोग्य वडवणीतील ‘ढोले फूड प्रोडक्ट्स’वर अन्न विभागाचा छापा; 1.16 लाखांचा साठा जप्त

वडवणीतील ‘ढोले फूड प्रोडक्ट्स’वर अन्न विभागाचा छापा; 1.16 लाखांचा साठा जप्त

0
12

नवीन जागेत परवानगीशिवाय उत्पादन; जुन्या परवान्याचा क्रमांक वापरल्याचे तपासात उघड

बीड — चिवडा आणि फरसाण उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वडवणी येथील ‘मे. ढोले फूड प्रोडक्ट्स’ या पेढीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. नवीन जागेत आवश्यक परवानगी न घेता अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू केल्याचे आढळून आल्यानंतर १ लाख १६ हजार ४६० रुपयांचा अन्नसाठा जप्त करून प्रतिबंधित करण्यात आला.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने पेढीची अचानक तपासणी केली असता, नवीन ठिकाणी अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला वैध एफएसएसएआय परवाना घेतला नसल्याचे आढळले.

तसेच, नवीन जागेत तयार करण्यात आलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर जुन्या उत्पादन केंद्राचा एफएसएसएआय परवाना क्रमांक छापण्यात आल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील माहितीबाबतही नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीदरम्यान पेढीत अन्न सुरक्षा व्यवस्थापन योजनेचा आराखडा, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल आणि पाण्याच्या तपासणीचे अहवाल उपलब्ध नसल्याचेही आढळले.

अन्न सुरक्षा अधिकारी अंकुश नरवाडे यांनी ‘चिवडा (ढोले), फरसाण (सत्यम), विशेष झिरो शेव आणि कॉर्न फ्लेक्स चिवडा’ या चार अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांचे प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उर्वरित अन्नसाठ्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. १ लाख १६ हजार ४६० रुपयांचा साठा जप्त करून त्याच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला. सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here