गेवराई — माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार, दि.३ ऑक्टोबर रोजी गेवराई शहरात सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रेने श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर हे शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, श्रीराम कथा, भजन संध्या आणि महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांचे किर्तन असे भरगच्च कार्यक्रम दि.३ ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त शिवनगरी, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे शनिवार, दि.३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी शिवाजीराव (दादा) पंडित यांच्यावर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रेने महोत्सवाचा शुभारंभ होणार असून शनिवार, दि.१० ऑक्टोबर रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे. दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ५ या वेळेत श्रीराम कथा, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भजन संध्या आणि रात्रौ ८ ते १० या वेळेत किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार यानिमित्ताने गेवराईत हजेरी लावणार आहेत. तर विदर्भरत्न ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीराम कथा ऐकण्याचा योग गेवराईकरांना येणार आहे. कार्यक्रमाची पूर्वतयारी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी करत आहेत. भाविक भक्तांनी श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व किर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. नामदेव महाराज शेकटेकर व ह.भ.प. राम महाराज अंबुले करणार आहेत.


