मुंबई — राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखेर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ संहितेतील ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध सवलती आणि मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी यांसह विविध पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून अनेक भागांत शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
पावसाची स्थिती, पिकांची अवस्था आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसान आणि पाण्याच्या समस्यांसह विविध अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या.


