अंबाजोगाई घरफोडीचा छडा; 27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी जप्त

अंबाजोगाई —  बंद घराचा दरवाजा तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. 50 हून अधिक CCTV फुटेज तपासत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 20 सप्टेंबर 2026 रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणे दोन किलो चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 391/2026 नुसार बीएनएसच्या कलम 331(3), 331(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला सूचना केल्या. पोलिसांनी अभिलेखावरील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती तपासण्यास सुरुवात केली. तसेच अंबाजोगाई परिसरातील 50 पेक्षा अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
CCTV फुटेजच्या तपासादरम्यान एका ठिकाणी तीन संशयित दुचाकीवरून जाताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, अमर काकासाहेब थोरात हा त्याच्या दोन साथीदारांसह घरफोडीत सहभागी असून चोरीचे सोने विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचून अमर थोरात याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने साथीदार म्हणून जगजीतसिंग अचलसिंग दुधानी याचे नाव सांगितले. पोलिसांनी माहितीच्या आधारे दुधानी यालाही ताब्यात घेतले. तपासात मंगलसिंग हिरासिंग बावरी याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. घरफोडीसाठी बावरी याची युनिकॉर्न मोटारसायकल वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 27 तोळे (270 ग्रॅम) सोन्याचे आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणातील मंगलसिंग बावरी सध्या फरार असून, अंबाजोगाई शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात अमर काकासाहेब थोरात (वय 23, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) आणि जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (वय 32, रा. शिवाजी चौक, परळी) यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पीएसआय सुशांत सुतळे आणि पथकाने केली. कारवाईत पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार पांडुरंग काळे आणि हनुमंत चादर यांचा सहभाग होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles