अंतरवाली सराटीत जरांगे यांच्या आंदोलनाचा मंडप हटवला; समर्थक महिलेचे गंभीर आरोप

जालना —  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर अंतरवाली सराटी येथे आता नव्या घडामोडींना वेग आला आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केल्यानंतर काही अंतर प्रवास केला; मात्र वाटेतच उपोषण स्थगित करून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला. त्यानंतर आता अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थ आणि सरपंचांनी आंदोलनस्थळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंडप हटवण्यात आला असून, उपोषणासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठही काढण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आंदोलनात सक्रिय राहिलेल्या ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. तारख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

‘महिलांचा भावनिक वापर केला’

ललिता तारख यांनी आरोप केला की, मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांना आश्वासन देऊन माता-माऊल्यांना फसवले. आंदोलनासाठी आपण रात्रंदिवस झटत होतो, तसेच जरांगे यांच्या चौथ्या उपोषणाच्या वेळी आपण उपस्थित होतो, असेही त्यांनी सांगितले.
“तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे. तुम्ही कसे उपोषण केले, हे वेळ आल्यावर सांगेन,” असे म्हणत तारख यांनी जरांगे यांच्या उपोषणाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.

अंतरवालीत एकही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही

अंतरवाली सराटीमध्ये अद्याप एकही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा दावा ललिता तारख यांनी केला. हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी आरक्षण मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही, असे त्या म्हणाल्या.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे आम्ही दहा महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपोषणस्थळावरून शिवीगाळ करणे योग्य नाही

आंदोलनादरम्यान वापरल्या गेलेल्या भाषेवरही तारख यांनी नाराजी व्यक्त केली. उपोषणस्थळावरून शिवीगाळ करणे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे १८ पगड जातींना सोबत घेऊन चालणारे होते. जिल्हाधिकाऱ्यांबद्दल वापरण्यात आलेली भाषा योग्य नव्हती, असेही त्यांनी म्हटले.
यापूर्वी आंदोलनाचा मंडप हटवू नये म्हणून आम्ही पोलिसांना विरोध केला होता. मात्र आता अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाचा मंडप आणि व्यासपीठ हटवण्यात आले आहे, असे तारख यांनी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळ हटवण्याचा निर्णय आणि ललिता तारख यांनी केलेली टीका यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पुढील काळात काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles