बीड — संघ संस्काराच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे भाशिप्रची मुहूर्तमेढ रोवली पण अमृत महोत्सवी वाटचालीच्या काळात मात्र वेतन घोटाळा,शालार्थ आयडी घोटाळा, पदभरती घोटाळा, टीईटी प्रमाणपत्र घोटाळा, बोगस शाळांच्या माध्यमातून पालकांच्या खिशावर टाकल्या जात असलेल्या दरोड्या “मुळे” भ्रष्टाचाराची शंभरी होऊन संस्थेचे हाल तर चोरट्यांचे गाल लाल अशी स्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर हेच का आरएसएस चे संस्कार गोळा झाला चोरांचा बाजार असं म्हणण्याची वेळ आली आहे.
अमृत महोत्सव खरे तर एखाद्या संस्थेच्या भरभराटीचा गौरव करण्याचा क्षण पण दुर्दैवाने विद्यमान संचालक मंडळाने संस्थेत चालवलेल्या नंगानाचाच गौरव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. हे संस्थेचे दुर्दैव म्हणायचं पण सत्यावर प्रकाश टाकत “सह्याद्री माझा” ने हे प्रकरण उचलून धरले आहे. सेवा जेष्ठता डावलून सावरकर चा मुख्याध्यापक बनलेल्या महाभागाने संस्थेच्या संस्काराच्या बूडात असे “मुळे” खूपसले की ते आतही जात नाही अन् बाहेरही निघत नाही अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी मराठवाडा प्रशासकीय अधिकारी तथा समन्वयक म्हणून म्हणून देखील तो मिरवू लागला.”चंद्र” शितल असतो त्यामुळे संस्थेच्या वाटचालीत “हेमंत” ऋतू येऊन भरभराट होईल म्हणून “वैद्य“बनून उपचार सुरू केला.पण हाय रे दुर्दैव संस्थेचे दुखणं इतकं नासलं गेलं. शेवटी घुसलेले “मुळे” टोकरून काढताना “खुरपे” ही बोथट झाले. गुन्ह्यांच्या सडक्या घाणीने ते बरबटले गेले. सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशासाठी पालकांच्या खिशावर पंधरा हजाराचा दरोडा टाकला या प्रकरणात त्याच्यावर कलम 384,34 अन्वये माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ही “अमर” नाथाची महती संस्थेच्या मध्यान्हाचा “प्रभाकर” अस्तंगत व्हायला सुरुवात करणारी झाली. संस्थेतल्या एका एका पदाधिकाऱ्याच्या “अ”सत्य नारायणाची कथा तर इतकी “लो“कप्रिय झाली की “आपण सारे भाऊ भाऊ मिळून सगळे चूरून खाऊ” हे ब्रीद बनून भ्रष्टाचाराचा “हिया” केला गेला. मग काय संस्थेच्या बुडात घुसलेल्या त्या “मूळ्या” ने इतका धुमाकूळ घातला की संघ संस्कार, देश हित, शिस्त, त्याग, समर्पण यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. स्वतःला राजा “इंद्र”समजणाऱ्या सर्वे सर्वा अध्यक्षाला कारभाराचा “सूर”गवसलाच नाही. या सगळ्या खेळात आश्चर्याने “आ” होऊन सगळे अधिकार “लुळ लुळ” ‘कर‘त राहिले.
बोगस शाळांचे पेव फुटले
संघ संस्काराच्या आडून पालकांच्या खिशावर संस्थेच्या नावावर दरोडे टाकायचे यासाठी बोगस शाळा सुरू करण्यात आल्या.खोलेश्वर जीनियस इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अंबाजोगाई,
माजलगावची सिद्धेश्वर सीबीएसई प्रायमरी स्कूल,उदगीर येथील रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल,लातूर मधील केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल बोगसपणे चालू आहे.2018 पासून आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याची पैशासाठी खेळ खेळला गेला.
शालार्थ आयडी/वेतन घोटाळा
भाशिप्र मध्ये बोगस शिक्षक भरती मोठ्या प्रमाणावर केली गेली. या शिक्षक भरती घोटाळ्यातून कोट्यावधी रुपयांचा मलिदा संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लुटला. इतकंच नाही तर थकीत वेतन घोटाळा देखील केला. शिक्षक भरती प्रक्रिया बंद झाल्यानंतर जे शिक्षक बोगस शालार्थ आयडीच्या जोरावर संस्थेत भरती केले. त्यांचा थकीत वेतन काढून त्याच्यावर देखील डल्ला मारला गेला. तीच स्थिती शिक्षक पात्रता परीक्षेची आहे. संस्थेमध्ये टीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभागाने बंधन घालून देखील ते शिक्षक आजही संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तिथेही टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र बोगसपणे उपलब्ध करून दिले गेले. हे सगळे कमी की काय म्हणून शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त एसआयटी मॅनेज करण्याच्या नावाखाली शिक्षकांची लूट केली गेली. बरं या घोटाळ्याचे आकडे हजारोत नाही लाखोत नाही तर कोटीच्या कोटी उड्डाण मारली गेली आहेत.
बदल्या मधून वर कमाई चा धंदा तर राजरोस सुरू आहे. या शाळेवरून त्या शाळेवर प्रतिनियुक्ती द्यायची यातून चार दोन लाख रुपये त्या शिक्षकाकडून उकळायचे शेवटी संस्थेत राहायचं तर मगरीशी वैर नको म्हणून निमुटपणे सहन करायचं.
यासारखे एक ना अनेक सडके प्रकार संस्थेत सुरू झाल्यामुळे यातून देशाच उज्वल भविष्य कसं घडलं जाणार? भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या जोरावर संस्काराचं पीक कसं येणार? या सगळ्या प्रकारातून देश हित राष्ट्र प्रथम न दिसता “स्वार्थ प्रथम” दिसू लागला आहे. कमीत कमी अमृत महोत्सवाच्या काळात तरी यामध्ये बदल होईल का? कुठेतरी मनाची नाही तर जनाची लाज बाळगली जाणार का? शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराचीच बाळघुटी पाजली जाणार? यासारखे अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.

