बीड — अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गासाठी तब्बल ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता हळूहळू वेग येताना दिसत आहे. अनेक आंदोलने, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेली अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वे मागील वर्षभरापासून संथगतीने धावत होती. मात्र, आता रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर-बीड डेमू रेल्वेचा वेग वाढवण्यात येणार असून, प्रवासाचा वेळ तब्बल १ तास ३५ मिनिटांनी कमी होणार आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाने डेमू सेवेच्या वेगात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकामुळे अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर प्रवास अधिक जलद होणार आहे.
चार तासांत होणार अहिल्यानगर-बीड प्रवास
सध्या अहिल्यानगरहून बीडकडे येण्यासाठी डेमू रेल्वेला सुमारे साडेपाच तास लागत होते. नव्या वेळापत्रकानुसार हा प्रवास सुमारे चार तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

गाडी क्रमांक 71441 अहिल्यानगर-बीड डेमू १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर स्थानकावरून सकाळी ६.५५ ऐवजी ७.४५ वाजता सुटेल. म्हणजेच गाडी ५० मिनिटे उशिराने सुटणार असली, तरी वेग वाढल्यामुळे ती बीड स्थानकावर पूर्वीच्या दुपारी १२.३० ऐवजी सकाळी ११.४५ वाजता पोहोचणार आहे.
बीड-अहिल्यानगर परतीचा प्रवासही वेगवान
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 71442 बीड-अहिल्यानगर डेमू बीड स्थानकावरून दुपारी १ वाजण्याऐवजी १२ वाजता सुटणार आहे. ही गाडी अहिल्यानगरला पूर्वीच्या सायंकाळी ६.३० वाजता पोहोचण्याऐवजी दुपारी ४ वाजताच पोहोचेल.
म्हणजेच परतीच्या प्रवासातही प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
प्रमुख स्थानकांवरील थांबे कायम
वेग वाढवण्यात आला असला तरी या डेमू रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानकांवरील थांबे कायम ठेवण्यात आले आहेत. अहिल्यानगर, नारायणडोह, न्यू लोणी, सोलापूरवाडी, न्यू धानोरा, कडा, न्यू आष्टी, वेताळवाडी, हातोला, अमळनेर भांड्याचे, जाटनांदूर, विघनवाडी, रायमोहा, राजुरी नवगण आणि बीड या स्थानकांवर रेल्वे थांबणार आहे.
४५ वर्षांची मागणी, चार हजार कोटींच्या घरात खर्च
अहिल्यानगर-बीड-परळी लोहमार्गाची मागणी गेल्या ४५ वर्षांपासून केली जात आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च सुमारे २०० कोटी रुपयांच्या घरात अपेक्षित होता. मात्र, कामाला झालेला विलंब आणि वाढत्या खर्चामुळे प्रकल्पाची किंमत आता तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.
एकूण २४० किलोमीटरच्या या रेल्वेमार्गापैकी अहिल्यानगर ते बीड या सुमारे १३५ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर-बीड डेमू सेवा सुरू करण्यात आली.
विद्युतीकरणाचे कामही वेगात
डेमू रेल्वे सुरू झाली असली तरी मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेचा वेग मर्यादित राहिला होता. आता रेल्वे प्रशासनाने वेग वाढवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर-बीड मार्गावरील विद्युतीकरणाचे कामही वेगाने सुरू असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.
बीड-वडवणी रेल्वेचीही चाचणी पूर्ण
दरम्यान, बीड ते वडवणी या लोहमार्गाची चाचणीही पूर्ण करण्यात आली आहे. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर-बीड रेल्वेचा वेग वाढल्याने मराठवाडा आणि नगर परिसरातील प्रवाशांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या रेल्वेसेवेचा प्रवास आता खऱ्या अर्थाने वेग घेणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

