केज — घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आणि त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीवर लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास ३० वर्षीय विवाहित महिला घरात एकटी असताना आबा गोरख गायकवाड हा तिच्या घरात शिरला. त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केल्यानंतर तिच्याशी झोंबाझोंबी करून पदर ओढत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महिलेने घडलेला प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्याने २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीकडे जाऊन याबाबत जाब विचारला. यावेळी गोरख उत्तरेश्वर गायकवाड याने लोखंडी गजाने महिलेच्या पतीच्या डोक्यात वार केल्याच तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून महिला आणि तिच्या पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ११५(२), ११८(१), ३३३ आणि ३५२ अन्वये आबा गोरख गायकवाड आणि गोरख उत्तरेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस जमादार पल्लवी तरकसे तपास करीत आहेत.

