बीड/माढा — मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराटी आंतरवाली येथे सुरू झालेल्या आंदोलनाला आज दोन वेगवेगळ्या घटनांमुळे वेगळे वळण मिळाले. आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा गेवराई परिसरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तर सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे एका मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनाचा पाठलाग करत गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनासाठी निघालेल्या बीडच्या आंदोलकाचा मृत्यू
केज तालुक्यातील नांदुर घाट येथील रहिवासी सुग्रीव बापू शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह सराटी आंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते.
त्यांचे वाहन गेवराई परिसरात आले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते सराटी आंतरवालीकडे जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. सुग्रीव शिंदे यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर नांदुर घाट परिसरासह मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
माढ्यात आंदोलकाचा मंत्र्यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वाहनासमोर मराठा आंदोलकाने आक्रमक आंदोलन केले. बापू गायकवाड असे या आंदोलकाचे नाव असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांचा ताफा पुढे जात असताना बापू गायकवाड यांनी धावत जाऊन त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी थेट वाहनाखाली घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला.
यावेळी आंदोलकांकडून ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकाला वाहनाखालून बाहेर काढले. त्यानंतर मंत्री बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला.
घटना घडत असताना मंत्री बाबासाहेब पाटील वाहनातच होते. त्यांनी वाहनातून खाली न उतरता परिस्थिती पाहिली.
29 ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचे उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून सराटी आंतरवाली येथे त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज मुंबईत धडकणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतून मराठा समाजातील कार्यकर्ते आणि आंदोलक सराटी आंतरवालीकडे रवाना होत आहेत.
या पार्श्वभूमीवर बीडमधील आंदोलकाचा मृत्यू आणि माढ्यातील आंदोलनाची घटना यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची चर्चा पुन्हा एकदा राज्यभरात झाली आहे.

