Home Blog Page 89

एस.पी. कांवत यांच रझाकारी तुघलकी फर्मान, अडकित्त्यात अडकली शेतकऱ्यांची मान ✒️ भाग-२

0

बीड — विकासाला शेतकऱ्यांचाही विरोध नाही मात्र स्वतःची घर जाळून होणाऱ्या विकासाला का विरोध करू नये? या विरोधालाच गावगुंडांच्या परिभाषेत नेऊन ठेवणार तुघलकी फर्मान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढला आहे. एकीकडे शेतकरी निसर्गाशी दोन हात करत आहे तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली घर उध्वस्त करणार परचक्र शेतकऱ्यांच्या घरावरून वरवंटा फिरवत आहे. विकासाची काळजी आपल्यालाच आहे असा आव आणून कंपन्यांचे रखवालदार आहोत अशा जहागीरदारी थाटात लोकशाहीला मूठमाती देत एसपींनी रझाकारी फर्मान काढून शेतकऱ्यांची मान अडकित्यात अडकवली आहे. यामुळे एसपी विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

(शेतकऱ्यांची मान अडकित्यात अडकवणार हेच ते एसपींच फर्मान)

ही तर एसपींची रझाकारी मोगलाई; शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची घाई !!✒️ भाग -१

नवनीत कांवत जिल्ह्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात काहीसा का होईना फरक पडेल अशी अपेक्षा होती मात्र ती एका फर्मानाने धुळीला मिसळली गेली. पवन ऊर्जा, सौरऊर्जा कंपन्यानी जिल्ह्यात नंगानाच सुरू केला आहे‌. या नंग्या नाचाला जिल्हाधिकाऱ्यापासून प्रशासनातील प्रत्येक यंत्रणेच पाठबळ भेटत आहे. तीच स्थिती पोलीस यंत्रणेची देखील झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाची जणू काही आपल्यालाच काळजी आहे. अशा थाटात एसपींनी लोकशाहीला मूठ माती देत शेतकऱ्यांची घर बरबाद झाली,ती देशोधडीला लागली तरी विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. कंपन्यांना त्यांच्या कामात त्रास होऊ नये त्यांना संरक्षण मिळावं यासाठी गावगुंडांच्या परिभाषेत शेतकऱ्यांना नेऊन ठेवलं. शेतकऱ्यांनी स्वतःच हित कुटुंबाच हित जपणं देखील त्यामुळे पाप होणार आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून कंपनीची लोक गाड्या घेऊन गेले. रस्त्यात आडवी येणारी घर पाडली, अधिग्रहित जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रावर कब्जा केला,अधिग्रहित जमिनीचा मावेजा दिला नाही, कंपन्यांच्या गुंडांनी घर जाळली तरी काहीच फरक पडणार नाही. या उलट कंपन्यांना कायद्याचं संरक्षण मिळणार आहे. या अन्यायाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात कंपन्यांच हित जपण्यासाठी पोलीस अधिकारी एसपींच्या या तुघलकी फर्मानामुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून बिन भाड्याच्या खोलीत त्यांना बसवायला रिकामे होणार आहेत.                                निसर्गाशी दोन हात करत जीवन जगायचं सावकाराची देणी द्यायची, मुला बाळांना दोन घास खाऊ घालून त्यांचं शिक्षण करायचं की या परचक्राला थोपवण्यासाठी कर्जबाजारी होऊन न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्यात अडकायचं की झालेला अन्याय मुकाट सहन करायचा असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था निर्माण करायला आले आहेत की शेतकऱ्यांची घर उध्वस्त करून कंपन्यांची दलाली करायला आले आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे. या आरोपांच खंडन देखील करण्याचं तोंड त्यांना राहिला नसल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आमची बाजू ऐकून घ्या अशी आर्त हाक मारून देखील ती ऐकून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची मानसिकता कंपन्यांपुढे शरणागत झालेल्या एसपींना निर्माण झाली नाही. एस पी “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”या पोलीस प्रशासनाच्या ब्रीद वाक्याला येणाऱ्या काळात तरी प्रामाणिक राहणार आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या फर्मानामुळे निर्माण झाला आहे.

“कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय”हे एस पीं च ब्रीद

शेतकऱ्यांची बाजू तसेच त्यांच्यावर होणारा अन्याय ऐकून घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन एसपींना निवेदन दिलं. मात्र एसपींनी शेतकऱ्यांच म्हणण ऐकून न घेता पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांच्या गुंडगिरीला पाठबळ देणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे “कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय” हे ब्रीद घेऊन नवनीत कावत चालले आहेत. असं म्हणायला हरकत नाही. कंपन्यांची बाजू घेण्याची एसपींची भूमिका त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय निर्माण करणारी आहे
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
               सामाजिक कार्यकर्ते

धारूरमध्ये परीक्षा केंद्रातून इंग्रजीचा पेपर घेऊन दोघे पळाले

0

धारूर —  शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर जिल्ह्यातील धारुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रातून शनिवारी (दि. १ मार्च) सकाळी फुटला.पेपर सुरू झाल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता दोघांनी एका हॉलच्या खिडकीतून पेपर घेऊन पलायन केले.                         दरम्यान, पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पेपर जप्त केला आहे. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी लागलीच तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच घेऊन पळालेला इंग्रजी विषयाचा पेपर त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला. दरम्यान, पेपरफुटीमुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी पेपर फोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच या प्रकाराची शिक्षण विभागातील वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रातून दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर घेऊन दोघे पळाले होते. त्या दोन तरुणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. या पाठीमागे आणखीन कोण आहे? पेपर फोडणारी साखळी आहे का? या दृष्टिकोनातून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी दिली आहे.

धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे अफूच्या शेतात पोलिसांचा छापा

0

धारूर –तालुक्यात अफूची शेती होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तीन अधिकाऱ्यांसह 12 पोलीस कर्मचारी पिंपरवाडा शिवरात कारवाई करत रामहरी तिडके नावाच्या शेतकऱ्याचे शेतात तीन गुंठे अफूची शेती केली जात असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यावरुन पथकाने तीन अधिकाऱ्यांसह 12 पोलीस कर्मचारी घेऊन दुपारी बारा वाजल्यापासून या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे. सायंकाळी सहा वाजता त्या तीन गुंठे शेतीतील अफू उपटून घेण्यास सुरुवात केली आहे.

अफू उपटून घेतल्यानंतर त्याचं जे वजन एकत्रित होणार आहे, त्यानुसार किती लाखाचा मुद्देमाल पकडला याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी धारूर तालुक्यात अफूची शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील कळंब आंबा येथील शेतकऱ्यांने कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती.दहा वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच धारूर तालुक्यातील कानपूर येथे अफूची शेती पिकवण्याचा प्रकार आढळून आला होता. या अफूच्या माध्यमातून नशेखोरांना नशा करण्यास अफूचा उपयोग होतो आणि त्यासाठीच नशेखोर अफूचा उपयोग करून घेतात.रामहरी तिडके यांनी शेततळे खोदून त्याच्याद्वारे अफूला पाणीपुरवठा करत अतिशय दुर्गम भागात जिथे सहज जाणं शक्य नाही अशा ठिकाणी अफूची शेती पिकवली आहे. अफू पिकवणे कायद्याने निर्बंध घातलेले असताना रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने अफूची शेती होत असल्याचे उघडकिस आल्यानंतर खळबळ माजली आहे.

“तर आपण भीकेला लागू”; वाल्मीक कराडचा ‘तो’ फोन कॉल उघड

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपास पूर्ण करून मकोका न्यायालयात चौदाशे हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

यामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली आणि हत्येचा कट कोणी रचला, याबाबतची सविस्तर माहिती या आरोपपत्रातून समोर आली आहे.

वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, त्याचा या हत्येशी काहीही संबंध नाही. परंतु, हा दावा खोटा असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. वाल्मिकचा संतोष देशमुख यांच्या हत्येत थेट सहभाग होता आणि त्यानेच सुदर्शन घुलेला फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले याने वाल्मिक कराडला फोन केला होता. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले, ‘कोणीही उठतोय आणि आपल्या आड येतोय. असंच सुरू राहिलं तर आपण भीकेला लागू.’

‘असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता मागचं पुढचं काही बघू नका. जो कुणी आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा…. विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल,’ अशा सूचना वाल्मिकने सुदर्शन घुलेला दिल्या.
आवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीने मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथे पवनचक्कीच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात कंपनीची सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. 8 ऑक्टोबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या काळात वाल्मिक कराड , विष्णू चाटे , सुदर्शन घुले , प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कट रचून आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा आणि जो कोणी या मागणीला विरोध करेल, त्याची हत्या करून परिसरात दहशत पसरवण्याचा कट रचला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्येचा वाल्मीक कराडच मास्टरमाईंड

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी केज न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात काही धक्कादायक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, तपासादरम्यान पोलिसांनी वाल्मिक कराड याला या प्रकरणाचा प्रमुख आरोपी ठरवला आहे. यासाठी पोलिसांनी विविध पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्सचा आधार घेतला आहे.

आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी यांचा एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे. पोलिसांनी 1400 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. आरोपपत्रानुसार, संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या कारणावरून झाली, असे दर्शवले गेले आहे.आरोपी वाल्मीक कराड यानेच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं. यानंतर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी संतोष देशमुखांचा निर्घृण खून केला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच होता, असं आरोप पत्रात म्हटलं आहे

पाच गोपनीय साक्षीदारांचा पुरावा

या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या दिलेल्या जबाबावरून वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. साक्षीदारांनी सांगितले की, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झाली
होती, जिथे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले याला वाल्मिक कराडचा संदेश दिला. या संदेशानुसार, “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा,” असं सांगितलं गेलं.

सीआयडीचा महत्त्वाचा व्हिडिओ पुरावा

तपासादरम्यान सीआयडीला एक महत्त्वाचा व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आरोपी जयराम चाटे याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता. या डिजिटल पुराव्यामुळे सीआयडीने निष्कर्ष काढला आहे की, संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक संघटित टोळी होती.

मात्र या आरोप पत्रातून दोन आरोपींचं नाव वगळण्यात आलं आहे. रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे अशी आरोप पत्रातून नावं वगळलेल्या आरोपींची नावं आहेत.

दरम्यान रणजीत मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपी होता. तर सिद्धार्थ सोनवणे हा खूनाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र दोघांविरोधात आरोप पत्र दाखल झालं नाही. दोघांची नावं सीआयडीने आरोप पत्रातून वगळली आहेत. आता पुरवणी आरोप पत्रात या दोघांची नावं येतात की त्यांना मुख्य आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनवलं जातं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोघांना माफीचा साक्षीदार बनवलं तर मुख्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते, असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील इष्टांक वाढीसंदर्भात धनंजय मुंडे यांनी घेतला जिल्हानिहाय आढावा

0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा मंत्री मुंडेंनी घेतला सविस्तर आढावा

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीबाबत ही घेतली सर्वंकष माहिती

मुंबई — राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे होणार असून या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात विभागाचा जिल्हा निहाय आढावा घेतला.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील विविध जिल्ह्यात इष्टांक वाढवणे, ई पॉस मशीन सह सर्व अन्य समस्या याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.

विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे तसेच ज्या जिल्ह्याने इष्टांक पूर्ती केली आहे त्यांना वाढीव मागणी असल्यास इष्टांक देण्यासंदर्भात तसेच ईष्टाकाची पूर्ती न केलेल्या जिल्ह्यातील उर्वरित इष्टांक हा अन्य आवश्यकता असलेल्या ठिकाणी हस्तांतरित करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बुलढाणा जिल्ह्यात रेशनचे धान्य व त्यामुळे केस गळती होत असल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या असून त्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व योग्य त्या सूचना केल्या.

या बैठकीस विभागाच्या सहसचिव, उपसचिव यांसह सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पुरवठा अधिकारी आदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.

आजारी पण कामावर

धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले असून त्यांना बेल्स पाल्सी या आजाराचे निदानही झाले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामास त्यांनी सुरुवात केली आहे.

डोळ्यांची हालचाल आणि अधिक काळजी म्हणून त्यांनी गॉगलचा वापर करत मीटिंग घेतली. अद्यापही स्पष्टपणे सलग बोलण्यास त्रास होत असतानाही त्यांनी आपल्या कामकाजास आता सुरुवात केली आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणी दत्ता गाडे पकडला

0

पुणे — स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हते. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला.
अखेर, रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.
पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून, तूर्तास एवढेच सांगता येईल, अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली.
आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 100 जणांचे पथक तयार करण्यात आले होते.
-ऊसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा वापर करण्यात आला.
-आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
-आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

बलात्कार करून घरी परतला, दुपारपर्यंत आरामात, नंतर कीर्तनात सहभागी झाला!साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर अत्याचार करून शिरूर तालुक्यातील गुणाट गाव गाठले. दुपारपर्यंत तो घरीच होता. त्यानंतर त्याने कीर्तनातही सहभाग घेतला. मात्र, टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये स्वतःचा फोटो दिसताच, त्याने तातडीने घर सोडून पळ काढला.

सावधान…!ढोकीत बर्ड फ्लू चा संशयित रुग्ण आढळला

0

ढोकी — प्राण्यानंतर आता माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण सापडला आहे.ढोकी गावात माणसाला बर्ड फ्लू झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

लागण झालेला संशयित व्यक्ती हा मास विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून हा व्यक्ती तापाने फणफणला होता. ताप कमी होत नसल्याने आरोग्य विभागाने त्याचा स्वॅब घेतला. स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.

या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीवर उपचार सुरू आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लू मुळे ढोकी गावत कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण सुरू असतानाच ढोकी गावातील एक मांस विक्रेत्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

ढोकी गावातील पोलिस ठाणे परिसरात 21 फेब्रुवारीला पहिल्यांदा काही कावळे मृतावस्थेत पडलेले आढळून आले त्याना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस आले. 24 फेब्रुवारीला प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालातून कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ढोकी गावच्या 10 किमी परिघातील परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात 52 कावळे आत्तापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत.

पोलीस स्टेशन परिसरात कावळे मृत्युमुखी पडत असल्याने पोलीस स्टेशनचा परिसर बंद करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर पशुसंवर्धन विभागाने परिसर निर्जंतूकीकरण केला असून परिसरात वावरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, ढोकी शहर परिसरातील चिकन व मटन विक्रीचे दुकाने बंद आहे करण्यात आली आहेत

वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट; गंभीर आरोपाने खळबळ

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरूंगात व्हीआयपी ट्रेंटमेंट दिली जाते, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच १४ जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहाच्या मेनगेटमध्ये आला असताना वैजनाथ मुंडे, रमेश खाडे, यांनी ज्यांची ड्युटी नाही अशा कर्मचाऱ्यांना कारागृहात आरोपीसोबत घेतले.

असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यावरून आता बीडचे प्रकरण आणखी तापायला सुरूवात झाली आहे.

ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनात गीते, सुधारकर मुंडे, गोविंद खाडे, राहुल राठोड यांनी आरोपीची बॅग आणि इतर साहित्य कारागृहात नेले. १५ जानेवारीला सकाळी ८ ते ९ दरम्यान कारागृहातल्या किचनमधून आरोपी कराडला स्पेशल चहा देण्यात आला असा आरोप देखील त्यांनी केला आहे. १५ जानेवारीलाच सकाळी १० वाजता पोलीस वाल्मिक कराडला घेऊन जात असताना कारागृहातील कर्मचारी ज्ञानेशेवर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्ननाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे आणि राहुल राठोड यांनी कर्तव्यावर असतानाही आरोपीला साहित्य दिले.

तर २२ जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहाच्या मेनगेटमध्ये आल्यानंतर कर्मचारी अशोक सानप यांनी अंगझडती घेतली नाही. अशोक सानप हेच वाल्मिकचे साहित्य कारागृहात घेऊन गेले. २२ जानेवारीला रात्री ११ वाजता ४० मिनिटांनी वाल्मिकला दवाखान्यात पाठवताना कृष्णा ढाकणे, राहुल राठोड, यांनी वाल्मिकचं साहित्य त्याच्या नातेवाईकांकडे दिले असल्याचाही आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे.

१५ फेब्रुवारीला कराडला सुभेदार चिंचाणे यांनी स्पेशल चहा बनवून दिला. कारागृहातील कर्मचारी ढाकणे हे कारागृहातील बंदी बालाजी धस यांच्यामार्फत कराडला चहा नाश्ता आणि सर्व निरोप देत आहेत. १५ फेब्रुवारीला कराडला वकील असल्याचा बहाणा करून त्याचे सहकारी आणि मित्र भेटले. असा आरोप देखील देशमुख कुटुंबियांनी केला आहे

बालरोग तज्ञ परिचारिका’ अभ्यासक्रमाला जे.जे.हॉस्पिटलनंतर बीड जिल्हा रुग्णालयात मान्यता

0

आ.संदीप क्षीरसागरांनी मानले शासनाचे आभार

बीड — महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विद्यार्थी प्रवेश क्षमता असेलला केवळ जे.जे.रुग्णायालय मुंबई येथे उपलब्ध असलेला नर्सिंग क्षेत्रातील ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे ३० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा अभ्यासक्रम आता बीड जिल्हा रुग्णायालात उपलब्ध होणार आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे माता व नवजात बालक यांच्या आरोग्यसेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बालरोगतज्ञ परिचारिका मुंबईनंतर आता मुंबईपेक्षा जास्त संख्येने बीडमधून घडणार आहेत. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री, आरोग्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.
केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत माता व बाळ मृत्यू दार कमी करण्यासाठी तसेच नवजात बालक व माता यांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी समुपदेशन, उपचार व प्रशिक्षण यांच्या माध्यमातून प्रशिक्षित अधिपरिचारिकांकडून आरोग्य सेवा पुरविण्यात येतात. सध्या महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २० विध्यार्थी क्षमता असलेला ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ हा अभ्यासक्रम केवळ मुंबई येथील जे.जे.रुग्णालय येथील परिचर्या प्रक्षिशण केंद्रात उपलब्ध होता. त्यानंतर आता जे.जे.रुग्णायलय येथील प्रशिक्षण केंद्रापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश क्षमतेने या अभ्यासक्रमाला बीड जिल्हा रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रात मुंबई नंतर बीड मध्ये बालरोगतज्ञ असलेल्या अधीपरिचारिका घडणार हि नक्कीच बीड जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. दरम्यान हा अभ्यासक्रम १ वर्ष कालावधीचा असून ३० विद्यार्थी प्रतिवर्षी येथे प्रवेश घेऊ शकतील. तसेच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता जीएनएम किंवा बीएस्सी नर्सिग उत्तीर्ण नोंदणीकृत अधिपरिचारिक असणे आवश्यक आहे. याबाबत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शासन निर्णय क्रमांक २०२५०२२७१४४४४१३३१७ द्वारे अधिसूचित करण्यात आले आहे. बालरोग तज्ञ अधिपरिचारिका अभ्यासक्रमाला बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात मान्यता मिळावी यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्याला आता अखेर यश आले आहे. बीड मतदार संघाच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.अजित दादा पवार, आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचे व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.