Home Blog Page 62

छ.संभाजीनगर लातूर सह 16 बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा.शेतकऱ्यांना होणार फायदा!

0

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील छ. संभाजीनगर लातूर सह राज्यातील 16 महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आता राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.
याचा अर्थ असा की, आता या बाजार समित्या केवळ स्थानिक किंवा राज्य स्तरावर मर्यादित राहणार नाहीत, तर देशभरातील ई-नाम प्रणालीशी जोडल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल अधिक सुरक्षित आणि जास्त भावात विकता येईल. सरकारने या निर्णयासाठी आवश्यक कायदे आणि दुरुस्ती केली असून, विधी व न्याय विभागाने याचे गॅझेटही प्रसिद्ध केले आहे.

“या” बाजार समित्यांना मिळणार राष्ट्रीय दर्जा

सध्या या निर्णयासाठी कोल्हापूरसह राज्यातील सोळा बाजार समित्यांची माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये बाजार समित्यांमध्ये वर्षभरात येणारी आवक आणि त्यातील परराज्यातून येणारा शेतीमाल याची माहिती विचारण्यात आली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये ८० हजार टनांपेक्षा जास्त मालाची आवक होते, अशा ५१ बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. पहिल्या टप्यात कोल्हापूर, नाशिक, पुणे (ग्रामीण), छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, बुलढाणा, ठाणे, जळगाव, जालना, सांगली, वाशिम, अकोला, आहिल्यानगर, लातूर, सोलापूर आणि नागपूर अशा सोळा समित्यांचा समावेश आहे.राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक फायदे होतील. सर्वप्रथम, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. दुसरे, विक्रीत पारदर्शकता येईल. सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने नोंदवले जातील आणि कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची शक्यता कमी होईल. तिसरे, ई-नाम प्रणालीशी जोडल्यामुळे शेतकरी देशभरातील ग्राहकांशी थेट व्यवहार करू शकतील. यामुळे त्यांचा फायदा वाढेल आणि मध्यस्थावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
शासनाने मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये (२०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५) शेतीमालाची आवक तपासून, कोणत्या बाजार समित्या राष्ट्रीय दर्जास पात्र आहेत हे ठरवले आहे. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये एक देशव्यापी परवाना आणि शुल्क प्रणाली लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होईल.शेतकऱ्यांसाठी या निर्णयाचा आणखी फायदा म्हणजे त्यांना आपला माल जास्त भावात विकता येईल. पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी कमी भाव मिळत असे, परंतु राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढेल.
तसेच, स्थानिक बाजारपेठेत माल विकण्याची मर्यादा नाही, त्यामुळे शेतकरी बाजारातील सर्वोत्तम संधीचा फायदा घेऊ शकतील.सोप्या भाषेत सांगायचं तर, राज्यातील काही प्रमुख कृषी बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचे जीवन सोपे होईल. त्यांना आपला शेतीमाल जास्त भावात, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने विकता येईल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. तसेच राज्यातील कृषी उद्योगाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा व्यवसाय अधिक फायदेशीर बनेल. यामुळे शेतकरी फक्त आपल्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि बाजारभावासाठी चिंता करण्याची गरज नाही.

बीडमध्ये कायद्याची घडी बसली ? तरूणावर गोळीबार,दोन गोळ्या झाडल्या नंतर चाकूने भोसकून हत्या

0

बीड — फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करत असलेल्या प्लंबर वर सुरुवातीला दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर जखमी प्लंबर जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना अंकुशनगर, साई पंढरी लॉन्सच्या समोर दुपारी अडीच तीन च्या सुमारास घडली.
हत्या,गोळीबार यासारख्या घटना बीडमध्ये सामान्य झालेल्या आहेत. गुन्हेगार कायद्याची ऐसी तैसी करत पोलिसांच्या इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगू लागली आहेत. पोलीस अधीक्षकांपासून सगळीच पोलीस यंत्रणा आत्मस्तूतीतच मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या कायदा सुव्यवस्थेची कशी घडी बसवली आहे याची टीमकी नववर्षाच स्वागत करत असताना एस पी कडून वाजवली जात होती. मात्र चार-पाच दिवसातच ही टिमकी फुटली गेली. अवैध धंद्याची भरमार सुरू असताना कायदा सुव्यवस्था कशी चांगली राहत असते हे न उलगडलेल कोडं कायम आहे.यामध्ये सर्वसामान्य जनतेचं जगणं दहशतीच्या सावटाखाली येऊन कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. याच स्थितीचा अनुभव बीडकरांना पुन्हा अनुभवायला मिळाला. भर दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास प्लंबिंग चे काम करणाऱ्या हर्षद तुळशीराम शिंदे वय 35 वर्ष, (रा. हाउसिंग कॉलनी धानोरा रोड बीड) नावाच्या तरुणावर गोळीबार झाला. यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर जखमी झालेल्या हर्षद शिंदे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याचा पाठलाग करून धारदार शास्त्राने वार करत त्याची हत्या केल्याची घटना अंकुश नगर भागात घडली. हर्षद शिंदे हा
नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेला कर्मचारी अंकुशनगर भागात साई पंढरी लॉन्ससमोरील पाईप लाईन फुटली म्हणून त्या ठिकाणी दुरूस्तीचे काम करत होता. त्यावेळी ही घटना घडली.या घटनेनंतर आरोपी विशाल संजय सूर्यवंशी वय 30 वर्ष, (रा. अंकुश नगर धानोरा रोड बीड) हा पळून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीड मधील कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

झाडाखाली शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी कुठपर्यंत खायच्या खस्ता; जिल्हाधिकाऱ्यांचा “विवेक” जागा होऊन मिळेल का शाळेला रस्ता?

0

दत्तनगर वस्तीवरील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन

बीड — माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्तनगर वस्तीशाळेवरील शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.०५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

दत्तनगर वस्तीशाळेसाठी २००७-०८ मध्ये सुसज्ज इमारत बांधण्यात आली असतानाही रस्त्यावर अतिक्रमण करून जाण्याचा मार्ग बंद केल्यामुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर शाळा भरवावी लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे वारंवार लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (रा. लिंबागणेश) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे,शिवशर्मा शेलार,शेख मुबीन, रामधन जमाले, राजकुमार कदम डी.जी.तांदळे, नितिन जायभाये, डॉ.तांदळे, बाजीराव ढाकणे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोरडे, राजेंद्र भिसे,शहाजी भुंबे,अंजाबापु अडागळे,कौसर कुरेशी,शालिंदा गरड,भारत भोमदळ, संतोष आडागळे,वचिष्ठ आठवे आदी पालक व ग्रामस्थ सहभागी होते.

आंदोलनादरम्यान “जिल्हाधिकारी जागे व्हा”, “पालकमंत्री अजितदादा जागे व्हा”, “आ. विजयसिंह पंडित जागे व्हा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना न्याय देण्यात दिरंगाई केल्याबद्दल संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच तात्काळ अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पालकमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले.

आमच्या मुलांना न्याय द्या — विलास कोरडे

दत्तनगर वस्तीशाळेची विद्यार्थी पटसंख्या ३४ असून, त्याच इमारतीत अंगणवाडी चालते व तेथे ६४ बालकांची नोंद आहे. सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज व पंखे यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. पालक व मुख्याध्यापकांनी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याची खंत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी यावेळी व्यक्त केली.

कितीही लाटले भूखंड तरी होत नाही वाकडा “बाल”; आणखी एका घोटाळ्यात अडकला अजित पवार चा लाल

0

पुणे — पुण्यातील मुंढवा जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू या प्रकरणात जो साक्षिदार आहे, त्याच व्यक्तीच्या संगनमताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी ‘कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनी’द्वारे परस्पर भूखंड लाटला आणि ३०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
या भूखंडावर ‘अनंत वन’ हा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे ‘डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजी असोसिएशन’चे कार्यालय स्थापन्यात आले असून प्रकल्पातील इतर मालमत्तांची थेट चालू बाजारभावमुल्यानुसार (रेडीरेकनर) विक्री करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुंढवा जमीन घोटाळ्या पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला साहिल प्रधान आणि इतर सदस्यांची नावे या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणातही आढळून येत असल्याचे कुंभार यांनी सांगितले.

कुंभार म्हणाले, ‘पुण्यातील शिवाजीनगर येथील सुमारे दोन एकरचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून ६० वर्षाच्या दीर्घ मुदतीवर कल्पतरू प्लांटेशन कंपनीला देण्यात आला. कालांतराना या ठिकाणच्या १५ हजार चौरस फूट जागेवर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून ६३ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेली इमारत उभारण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) नोंदणी क्रमांक पी ५२१०००१४४९४ या क्रमांकाद्वारे याची नोंदही उपलब्ध आहे. वास्तविक धर्मादाय ट्रस्टची जागा भाडेपट्ट्याव देण्यात आली असताना या जागेची डेक्कन शुगर आणि पुन्हा कल्पतरू प्लांटेशन असे हस्तांतरण दाखविण्यात आले. तसेच जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनीने या जागेवरील सहा मजले परस्पर विक्री करण्यात आले आहे. ज्याची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.’डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला ‘कुलमुखत्यार’ देण्यात आले. प्रधान ही व्यक्ती मुंढवा जमिन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शितल तेजवानी यांच्यात जो करार झाला त्या व्यवहारांत साक्षिदार आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. या जागेसाठी निविदा प्रक्रिया राबवताना दौंड शुगर लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्पवृक्ष प्रायव्हेट लिमिटेड या उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित तीन कंपन्यांच्याच निविदा येणे, त्यापैकी कल्पवृक्ष कंपनीला अंतिम निविदा मंजूर होणे, कंपनीने थेट जागा विकसित करणे हा योगायोन नसून ठरवून हा ठरवून भूखंड लाटण्याचा प्रकार आहे. कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि खासदार सुनेत्रा पवार या इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत.

जागेवर २५ कोटींचे कर्जही

मुदतीनुसार भाडेतत्वावर जागा दिल्यानंतर संबंधित जागेवर कोणताही वित्त पुरवठा किंवा बँकेचे कर्ज काढता येत नाही. परंतु या जागेवर २५ कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे. सन २०१७ पासून या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आणि नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याठिकाणी आलिशान कार्यालय सुरू झाल्यावर याबाबत कायदेशीर माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली. कल्पतरू प्लांटेशन कंपनी यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या जागेचा काही भाग परस्पर विक्री केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे कुंभार यांनी नमूद केले.

महारेराच्या आदेशाला केराची टोपली

‘महारेरा’ यांनी देखील या जागेची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार समोर आल्याने हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकल्पाचे बँक खाते गोठवत प्रवर्तकांनी प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदी सोबत साठेकरार आणि विक्री करार करण्यास मज्जाव असल्याच्या सूचना दिल्या. मात्र या ठिकाणी ‘अनंत वन’ हा प्रकल्प या ठिकाणी उभा केला असून शासनाच्या विरोधात लढणाऱ्या कंपनीच्या प्रकल्पांमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे कार्यालय असणे कितपत योग्य आहे, असेही कुंभार यांनी सांगितले.

पत्नी FB लाइव्ह करत होती,पतीच्या अंगावर ट्रॉली कोसळली; ऊसतोड कामगार रीलस्टारचा मृत्यू

0

बीड — ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर कोसळल्याने ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गणेश डोंगरे असं ऊसतोड कामगाराच नाव असून तो रीलस्टारही होता. जेव्हा घटना घडली तेव्हा गणेशची पत्नी अश्विनी फेसबुक लाइव्ह करत होती.तिच्या डोळ्यादेखतच ही दुर्घटना घडली. तिला लक्षात आलं तेव्हा लाइव्हमध्येच ती किंचाळल्याचंही ऐकू येतं.
वडवणी तालुक्यातील डोंगऱ्याचीवाडी सोन्नाखोटा येथील रहिवाशी असणारा गणेश डोंगरे वय 30 वर्ष आणि त्यांची पत्नी ऊसतोडीसाठी लातूरच्या कारखान्यावर गेले होते. कारखान्याजवळ ते थांबले असताना गणेश डोंगरे याच्या अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली. गणेशच्या अशा अकाली मृत्यूमुळे त्याची पत्नी, तीन मुली आणि आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

गणेश डोंगरे याची घरची शेती अवघी एक एकर इतकी होती. गणेशवरच कुटुंबाची जबाबदारी होती. त्याची पत्नीही त्याला ऊसतोडीसह कष्टाच्या कामात साथ देत होती. गावी पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या गणेश-अश्विनीने ऊस तोडणीही सुरू केली होती. अश्विनी आणि गणेश हे त्यांचे व्हिडीओ शेअर करायचे. ऊसतोडणी करत ज्या परिस्थितीत आपण राहतोय, आपण जे काम करतोय ते दोघंही दाखवत असत.
लातूर जिल्ह्यात साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गणेश आणि अश्वीनी आले होते. शनिवारी दुपारी गणेश आणि अश्विनी ट्रॅक्टर भरून साखर कारखान्यावर पोहोचले होते. वजनासाठी ते कारखाना परिसरात थांबले असताना एक ट्रॅक्टर पलटी झाला. तो गणेश यांच्या अंगावर कोसळल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. घटना घडली तेव्हा गणेश यांची पत्नी अश्विनी कारखाना परिसरात फेसबुक लाइव्ह करत होती.

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी; सरकारी शाळांना मोठा दिलासा 

0

मुंबई — जि.प., नगरपालिका महानगरपालिका शाळांमध्ये मे 2026 पर्यंत रिक्त होणारी शिक्षकांची पद पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील पालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे चालू शैक्षणिक वर्षात तसेच आगामी वर्षात रिक्त होणारी पदे तातडीने भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षक आणि शाळा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक पदभरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार सध्या ८० टक्क्यांपर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. ही भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 मधील निकालाच्या आधारे केली जाणार आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शिक्षक सेवानिवृत्त होत असतात. तसेच संच मान्यतेनुसार नव्याने पदे निर्माण होत असतात. या रिक्त पदांवर वेळेत शिक्षक उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य सुरळीत सुरू राहावे, यासाठी ही भरती आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम,2009 नुसार कोणत्याही शाळेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षक पदे रिक्त ठेवता येत नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडली जात असल्याचे चित्र होते. यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत होता आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने 2025/26 या शैक्षणिक वर्षाअखेर संभाव्य रिक्त होणारी पदे गृहीत धरून आगाऊ भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणारी शिक्षक टंचाई टाळता येणार आहे.
नवीन शासन निर्णयानुसार, संबंधित शाळांच्या संचमान्यतेनुसार संभाव्य रिक्त पदांचा आढावा घेऊन शिक्षक संवर्गातील भरती केली जाणार आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, अध्यापनाची गुणवत्ता सुधारेल, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक भरतीसंबंधीचा हा निर्णय राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी तो अत्यंत दिलासादायक ठरला आहे.

” बीड फर्निचर ” कारखान्याचा भव्य शुभारंभ : आ. विजयसिंह पंडित व तहसीलदार शेळके यांच्या हस्ते उद्घाटन

0

बीड — शहरातील फर्निचर व्यवसायाला नवा आयाम देणाऱ्या “बीड फर्निचर कारखान्याचा” रविवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता आमदार विजयसिंह पंडित व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते भव्य शुभारंभ करण्यात आला.

या सोहळ्यात संपादक शेख मुजीब यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कारखाना स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.कारखान्याची अत्याधुनिक वैशिष्ट्ये या फर्निचर कारखान्यात अत्याधुनिक डिझाइन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची मशिनरी बसवण्यात आली आहे. येथे बेड, वॉर्डरोब, सोफा सेट्ससह घरगुती आणि कार्यालयीन फर्निचर वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. “ग्राहकांच्या प्रत्येक गरजेनुसार दर्जेदार, टिकाऊ आणि आकर्षक फर्निचर तयार करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही स्थानिक साहित्याचा वापर करून खर्च कमी ठेवणार आहोत,” असे आयोजकांनी सांगितले. कारखान्यामुळे ग्राहकांना बाहेरील शहरात जाऊन फर्निचर खरेदी करण्याची गरज भासणार नाही.शुभारंभ सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती आणि भाषणेया शुभारंभ सोहळ्यात आमदार विजयसिंह पंडित, शेख मुजीब, नगराध्यक्ष बीड, तहसीलदार चंद्रकांत शेळके, सय्यद शाकेर, दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, शहरातील शेख निजाम, शेख एजाज (खन्ना भैय्या), रफीक पठाण, खुर्शीद आलम, अमीर भाई, पत्रकार शेख तालीब, पत्रकार शेख आयुब, सय्यद इरफान यांसह मोठ्या संख्येने नागरिक, उद्योजक व पत्रकार उपस्थित होते. आमदार पंडित म्हणाले, “अशा उद्योगांमुळे बीडचा विकास वेगवान होईल आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल.” तहसीलदार शेळके यांनी कायदेशीर मंजुरी आणि भविष्यातील सहकार्याबाबत आश्वासन दिले.

स्थान आणि भविष्यकाळातील योजना

फर्निचर कारखाना ह. मौलाना युनूस पार्क, तेलगाव रोड, बीड येथे सुरू करण्यात आला आहे. आयोजकांनी सांगितले की, लवकरच २० नवीन कर्मचारी नेमणूक करणार आहोत आणि ऑनलाइन विक्री सुरू करणार आहोत. पर्यावरणस्नेही साहित्य वापरून हिरवे फर्निचर तयार करण्याची योजना आहे. या कारखान्यामुळे बीड शहर फर्निचर उद्योगाचे केंद्र बनेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.या शुभारंभाने शहरवासीयांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.

0

विद्यार्थ्यांना थंडीत झाडाखाली बसवण्याची लाज जिल्हा प्रशासनाला नाही!

0

अजित पवारांना काळे झेंडे दाखवू नयेत म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलले

बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असताना माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्तनगर वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून जिल्हा प्रशासनाचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला आहे. सुसज्ज शालेय इमारत उपलब्ध असतानाही केवळ रस्ता नसल्याच्या कारणामुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ३५ पटसंख्या असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही लेखी निवेदनाद्वारे वारंवार लक्ष वेधले. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर पालकमंत्र्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचा इशारा देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या नावाखाली पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आज गुरुवारी सकाळी नेकनूर पोलिस प्रशासनाच्या आदेशाने लिंबागणेश पोलिस चौकीचे पोह. गणेश परजने व पोह.मन्सुर शेख यांनी डॉ. गणेश ढवळे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन लिंबागणेश पोलिस चौकीत स्थानबद्ध केले.
“पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू नयेत म्हणून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे; पण शाळकरी मुलांचे हाल थांबवण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही,” असा घणाघाती आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.

दरम्यान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड डॉ. किरण कुंवर यांनी दत्तनगर वस्तीशाळेच्या तक्रारीची दखल घेतली असून, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व संबंधित ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती कार्यवाही करून शाळेसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पत्रकाद्वारे दिले आहे. तसेच आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

तरीही, विद्यार्थ्यांचा रस्ता प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास येत्या सोमवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गाडी अडवण्याचा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला असून, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लग्नाचं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार; पोलिसाची हैवानियत

0

बीड — लग्नाचे आमिष दाखवून एका विभक्त महिलेला लग्नाचे आमिष दाखवून
पोलिसाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित महिलेने बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली. आरोपी पोलिसाविरोधात कठोर कारवाई करण्याची पीडित महिलेने मागणी केली आहे.
पीडित महिलेचे लग्न झाले होते पण ती 2022 पासून नवऱ्यापासून विभक्त राहते. कौटुंबिक वादात आणि कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा आरोपी पोलिसाने घेतला. हा पोलिस विवाहित आहे. तरी देखील त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या पोलिसाने पीडित महिलेला सांगितले होते की, ‘मी पोलिस आहे. त्यामुळे तुला कोर्टाच्या कामात मदत करून लवकर न्याय मिळवून देईन. तसंच त्याने माझं बायकोसोबत पटत नाही आणि मी तिला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करेल.’ पोलिसाच्या बोलण्यावर महिलेने विश्वास ठेवला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली. पोलिसाने य महिलेला अनेकदा लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपी पोलिसाने या महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी महिलेला विश्वासात घेऊन मी तुझ्यासोबत लग्न करेल असे म्हणत तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. आरोपीने त्यावेळी उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यामुळे पीडित महिलेला गंभीर शारीरिक इजा झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला तीन टाके पडले होते. याचा खर्च आरोपी पोलिसाने ऑनलाइन पद्धतीने दिला होता.पोलिसाने रुग्णालयाचा खर्च केला होता हाच पुरावा या प्रकरणाचा महत्वाचा पुरावा ठरत आहे. आरोपी पोलिसाने महिलेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केला. महिलेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा त्याने तिला धमकावले. ‘मी पोलिस आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तू माझे काहीही बिघडवू शकत नाहीस.’, असे म्हणत आरोपी पोलिस महिलेचा छळ करू लागला.

ऐवढेच नाही तर त्याने महिलेसोबतचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेने केली आहे.