Home Blog Page 37

नोकऱ्यात जास्त प्रमाण असताना मराठा आरक्षणाची गरज काय? उच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 11 डिसेंबरला

0

मुंबई — मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) अंतर्गत दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला.जर शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असेल तर मग त्यांना आरक्षणाची गरज काय? असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला. त्यांचा हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होईल, असे सांगितले
या याचिकेवरील सुनावणीवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन.जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी मराठा आरक्षणाला विरोध करताना प्रामुख्याने मागासलेपणाचे निकष आणि आरक्षणाची आवश्यकता यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी प्रदीप संचेती यांनी आकडेवारीचा दाखला कोर्टाला दिला. मराठा समाज स्वतःला मागास समजत असला तरी, शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे. आरक्षणाची गरज कशासाठी आहे? तर ती मुख्यतः नोकऱ्यांसाठी आहे. जर मराठा समाजातील मुलांकडे नोकऱ्यांचे प्रमाण अधिक असेल, तर मग त्यांना आरक्षणाची गरज कशासाठी आहे?” असा थेट सवाल संचेती यांनी उपस्थित केला.
यानंतर संचेती यांनी जयश्री पाटील यांच्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना दिलेल्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर वाचून दाखवले. त्यांनी जयश्री पाटील यांच्या याचिकेत मांडलेला महत्त्वपूर्ण मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. “स्वत:ला स्वतःच एखादा समाज मागास ठरवू शकत नाही.” असे संचेती यांनी म्हटले.या युक्तिवादातून, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे इंदिरा साहनी निकालाने निर्धारित केलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करणारे आहे आणि मराठा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करणारे ‘असाधारण व अपवादात्मक परिस्थितीचे’ निकष पूर्ण करत नाही, यावर भर दिला. याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता पुढील सुनावणीत राज्य सरकार आणि आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.

चिमुकली अत्याचार प्रकरण : मालेगावात जनतेच्या संतापाचा कडेलोट आंदोलकांनी कोर्टाचं गेट तोडलं

0

मालेगाव — डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधम विजय खैरणार विरोधात मालेगावकरांचा संताप उसळून आला.मालेगाव मध्ये आज कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला होता. मोर्चेकर्‍यांनी मालेगाव कोर्टाचे गेट तोडून कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केल्याने तणाव वाढला होता.

संशयित आरोपी विजय खैरणार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना कळताच आक्रमक आंदोलकांनी कोर्टाचे गेट तोडून थेट कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. कोर्टाचे गेट तोडून आंदोलक आतमध्ये शिरले. यावेळी पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज करावा लागला.

राज्यभरात या घटनेमुळे संतापाची लाट आहे. मालेगावकरांनी आज या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक दिली होती. आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. संतप्त आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसल्याने मालेगाव कोर्ट परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
मालेगावपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळे गावात गेल्या रविवारी ३ वर्षाच्या चिमुरीडीवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणात विजय खैरणार या २४ वर्षीय संशयिताला पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीला त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी दि.२१ मालेगाव येथील अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं.

परंतु नागरिकांना यासंदर्भात कुणकुण लागताच नागरिकांचा मोर्चा कोर्टाकडे वळाला. न्यायालय परिसरात जमलेला मोठा जनसागर व त्यांच्या संतप्त भावनांचा अंदाज घेऊन पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला कोर्टात आणलच नाही. पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आरोपीला न्यायालयापुढे हजर केलं.पण तोपर्यंत आंदोलकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसला. महिला आणि तरुणांनी कोर्टाचे गेट तोडत आत धाव घेतली. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली.

आमदार आणि खासदारांशी सौजन्याने वागा.!अधिकाऱ्यांना सरकारचे निर्देश

0

मुंबई — आमदार आणि खासदारांशी अत्यंत आदराने आणि सौजन्याने वागण्याचे निर्देश आराध्या सरकारने सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. अधिकाऱ्यांना त्यांच्या पत्रव्यवहाराचे दोन महिन्यांच्या आत उत्तर देण्यास आणि दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेण्यास, तसेच त्यांना प्रमुख सरकारी कार्यक्रमांना आमंत्रित करण्यास सांगितले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने सर्व राज्य विभाग, निमसरकारी कार्यालये आणि सरकार नियंत्रित संस्थांना निर्देश जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांना विधानसभेचे आमदार आणि खासदारांशी अत्यंत आदराने आणि सौजन्याने वागण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यात सुशासन, पारदर्शकता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आहे.या परिपत्रकात अधिकाऱ्यांना आमदार आणि खासदार सरकारी कार्यालयांना भेट देताना आदराने स्वागत करण्याचे, त्यांच्या चिंता काळजीपूर्वक ऐकण्याचे आणि संबंधित सरकारी नियमांनुसार मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की या प्रतिनिधींशी दूरध्वनी संभाषणे देखील सभ्य आणि सौजन्याने केली पाहिजेत.

“दोन महिन्यांच्या आत प्रतिसाद द्या आणि दर तीन महिन्यांनी पत्रव्यवहाराचा आढावा घ्या.”
जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी, प्रत्येक कार्यालयाला आमदार आणि खासदारांकडून प्राप्त झालेल्या सर्व पत्रव्यवहारांसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवण्याचे आणि दोन महिन्यांच्या आत प्रतिसाद देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जर वेळेवर प्रतिसाद देणे शक्य नसेल, तर हे प्रकरण विभाग प्रमुखांकडे पाठवावे आणि संबंधित आमदाराला अधिकृतपणे कळवावे. विभाग प्रमुखांना दर तीन महिन्यांनी अशा सर्व पत्रव्यवहारांचा आढावा घेणे देखील आवश्यक असेल.

केंद्रीय आणि राज्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरपालिका अध्यक्षांसह सर्व संबंधित मान्यवरांना सर्व प्रमुख सरकारी कार्यक्रमांना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये योग्य बसण्याची व्यवस्था पाळली पाहिजे.खासदार, आमदार आणि नागरिकांशी भेट”
याव्यतिरिक्त, विभाग प्रमुखांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तास विशेषतः खासदार, आमदार आणि स्थानिक नागरिकांशी भेटण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

14 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची नव्यानं सोडत; निवडणूक आयोगाच्या मोठ्या हालचाली सुरू

0

मुंबई — राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 44 नगरपरिषदा, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषद आणि 2 महापालिकांमध्ये (नागपूर, चंद्रपूर) 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे.याबाबत येत्या (25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.मात्र त्यापूर्वीच जिथे 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे, ते कमी करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने दाखवली आहे. त्याचवेळी जिथे 50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे अशा 233 नगरपरिषद-नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार (2 डिसेंबर) निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग  प्रयत्नात असल्याचे समजते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते. मात्र ही मर्यादा ओलांडली असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात  दाखल झाली आहे. यावर सोमवारी (17 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. यात न्यायालयाने अधिकारी आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले.यानंतर आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत. तसेच बांठिया आयोगाच्या पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसे आरक्षण होते आणि आता जाहीर झालेले आरक्षण कसे आहे याची तौलनिक माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती आयोग सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे.
20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणात वाढ :

राज्यातील एकूण 20 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले असल्याची माहिती आहे. एकूण 34 जिल्हापरिषदांमध्ये जाहीर झालेल्या 2011 जागांमध्ये एकूण 54 टक्के आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये खुल्या वर्गासाठी 934 जागा, अनुसूचित जातीसाठी 246 जागा, अनुसूचित जमातीसाठी 306 जागा आणि ओबीसीसाठी 526 जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
एकूण आरक्षित जागा 1077 असून हे प्रमाण 54 टक्के इतके आहे. यामध्ये आदिवासीबहुल नंदुरबार 100 टक्के, पालघर 93 टक्के, गडचिरोली 78 टक्के, नाशिक 71 टक्के, अमरावती 66 टक्के, यवतमाळ 59 टक्के यांचा समावेश आहे. मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या अधिक असल्याने या जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे.मात्र, धुळे 73 टक्के, चंद्रपूर 63 टक्के, अकोला 58 टक्के, नागपूर 57 टक्के, ठाणे 57 टक्के, गोंदिया 57 टक्के, वाशिम 56 टक्के, नांदेड 56 टक्के, हिंगोली 56 टक्के, वर्धा 54 टक्के, जळगाव 54 टक्के, भंडारा 52 टक्के, लातूर 52 टक्के, बुलडाणा 52 टक्के या जिल्हा परिषदांमध्येही 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने परळीत सव्वा लाखाचा गांजा पकडला

0

बीड  — परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेने कापसाच्या शेतात लावलेला गांजा जप्त केला आहे. या धाडीत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज आंधळे यांची हेळंबमध्ये गट क्रमांक 746 मध्ये शेती असून त्यांनी आपल्या शेतात कापसासोबत गांज्याची देखील लागवड केली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना पेट्रोलिंग करत असताना याबाबत माहिती मिळाल्यावरून त्यांनी शेतात जात पाहणी केली. यावेळी शेतात कापसासोबतच गांज्याची देखील लागवड झाल्याचा प्रकार समोर आला.पोलिसांनी छापा मारून 25.950 ग्रॅम गांजा जप्त केला.या कारवाईत 1 लाख 29 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,परळी ग्रामीणचे प्रभारी सय्यद,पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,अंकुश निमोणे,रियाज शेख, केकाण, जोगदंड, भताने, आंधळे, घोडके, मराडे यांच्यावतीने करण्यात आली.

बिबट्याची दहशत संपेना बीड अहिल्यानगर महामार्गावर पुन्हा दिसला

0

सांगवी पाटण गावातही बिबट्या दिसला

आष्टी — ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे. यातच बीड अहिल्यानगर महामार्गावर म्हसोबावाडी ते घाटपिंपरी घाटात दुसऱ्यांदा बिबट्याचं 19 नोव्हेंबर रोजी पुन्हा दर्शन झालं. याबरोबरच सांगवी पाटण गावातील सुदर्शन विद्यालयाच्या गेट समोरच बिबट्या दिसल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त ताबडतोब करावा अशी मागणी केली जात आहे.
सांगवी पाटण गावातील सुदर्शन विद्यालयासमोर बिबट्या वावरताना दिसला. त्यामुळे खिळद, डोईठाण, कोहिनी, किनी, बेलगाव, बावी, दरेवाडी,कारखेल, धामणगाव परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगांवी रात्रीच्या वेळी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, दोन-तीन जनाची सोबत असेल तरच फिरावे, सोबत टॉर्च काठी यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर करून बिबट्या दिसल्यास वनविभागाला कळवण्यात यावे असे आवाहन केले आहे.


पाटण सांगवीत बिबट्या दिसलेला असतानाच बीड अहिल्यानगर महामार्गावर देखील 15 नोव्हेंबर रोजी बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा 19 नोव्हेंबर रोजी म्हसोबावाडी ते घाट पिंपरी घाटामध्ये रात्रीच्या दरम्यान पुन्हा बिबट्या दिसला. याचा देखील व्हिडिओ प्रवाशांनी चित्रित करून समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. आष्टी वनपरिक्षेत्र हद्दीत गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांची संख्खा वाढल्याचे दिसून येत आहे. शेतातसह, लोकवस्ती व आता रस्त्यावर त्याचा बिनधास्त संचार सुरू आहे. बिबटे निशाचर प्राणी आहेत, त्यामुळे त्यांची बहुतेक क्रियाकलाप आणि शिकार रात्रीच्या वेळीच होते. दिवसा ते विश्रांती घेतात. डोंगरपट्यात दडण असल्याने व रस्त्यावर आणि लोकवस्तीकडे बिबटे वळलेले असल्यामुळे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जनतेमधून होत आहे.

मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण: संशयीताला कोर्टात का आणले नाही, जनता आक्रमक

0

मालेगाव — डोंगराळे येथील साडेतीन वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याच्या घटनेचे गुरुवारी न्यायालय परिसरात तीव्र पडसाद उमटले. संशयीताची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.मात्र, न्यायालय परिसरात संतप्त महिला व तरुणांचा मोठा जमाव जमला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला आताच फाशी द्या, असा हेका धरत हा जमाव आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. जवळपास दोन-अडीच तास हा आक्रोश सुरू होता.

रविवारी रात्री चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रवींद्र खैरनार (२४) या संशयीताला तात्काळ अटक केली. यानंतर न्यायालयात उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपत असल्याने दुपारी अडीच वाजेनंतर त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.

खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी संतप्त महिला व तरुणांची न्यायालय आवारात मोठी गर्दी उसळली. जमावाचा संताप बघता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशी शक्यता गृहीत धरत पोलिसांनी संशयीताला न्यायालयात आणणे टाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वेळ टळून गेल्यावरही संशयीताला न्यायालयात आणले जात नसल्याचे बघून जमाव आणखी आक्रमक झाला. त्यानंतर महिला पुरुषांनी न्यायालय आवारात ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली.

काही वेळानंतर संतप्त महिला व तरुणांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कॅम्प रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. नंतर मोसम पुलाजवळ जाऊन काही काळ तेथील वाहतूक रोखून धरली. लोकांचा हे रौद्ररूप बघता संशयीताला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर केले गेले. संशयीताने हत्येसाठी वापरलेले हत्यार काढून दिले नाही, गुन्ह्याचा सूक्ष्म तपास करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय सोनवणे यांनी न्यायालयात केला. त्यानुसार न्यायालयाने सात दिवसांकरिता त्याची पोलीस कोठडी वाढवली आहे.

या प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सर्वच स्तरातून त्याचा निषेध नोंदविला जात आहे. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचा रेटा वाढला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी यापूर्वीच निर्देश दिले आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गावी भेट देऊन मृत चिमुकलीच्या पालकांचे सांत्वन केले. तसेच मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. त्यानंतर गेल्या दोन दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ, किरीट सोमय्या, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राम भदाणे, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी डोंगराळे गावी भेट देऊन मृत चिमुकली व गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. गुरुवारी सायंकाळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डोंगराळे येथे भेट दिली. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा द्या तसेच या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई 12 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर दिंद्रुड पोलिसांनी कारवाई करत तब्बल 12 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर रोजी हॉटेल बप्पाश्री जवळ, आनंदगाव ते लोनगाव रोड वर पांढऱ्या रंगाचे क्रमांक नसलेले पिकअप वाहनात  जितीन राजेभाऊ पौळ, वय 32 वर्षे, रा. खरात आडगाव हा एक ब्रास वाळू 6000 रुपये किमतीची ची अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील पिकअप व एक ब्रास वाळू असा एकूण चार लाख सहा हजार रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत लोनगाव चौकाजवळ, आनंदगाव ते लोनगाव रोड वर आरोपी जीवन काशिनाथ साळवे, वय 30 वर्षे, रा. खरात आडगाव, ता. माजलगाव हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक 407 टेम्पो क्र. एम एच 21 एक्स 0353 मध्ये अवैधरीत्या नऊ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू वाहतूक करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील आठ लाख रुपयाचा टेम्पो वाहन  दिड ब्रास वाळू  8 लाख 9 हजार रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध  दिंद्रुड पोलीस ठाण्यात कलम: 303(2) बीएन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात सपोनि. महादेव ढाकणे, पोउपनि. पवनसिंग जंघाळे,भराडे,सचिन गायकवाड यांनी केली आहे.

सरकार गुटखा विक्रीवर बंदीच नाही, थेट मकोका लावण्याच्या तयारीत!

0

मुंबई — गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असली तरी देखील गुटखा होत असल्याने याला आळा घालण्यासाठी गुटखा विक्री करणारा वर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकार विचार करीत असल्याच अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए) मंत्री नरहरी झिरवाल यांनी सांगितलं

या प्रकरणी एफडीए मंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, गुटख्याच्या उत्पादन आणि विक्रीवर सध्या बंदी असूनही तंबाखूयुक्त उत्पादनाची बेकायदेशीर खेप बाहेरून राज्यात येत आहे. ज्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांचे नुकसान होत आहे. मंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात झिरवाल यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार गुटखा कंपन्यांचे मालक, प्रमुख संचालक आणि या बेकायदेशीर व्यापारामागील सूत्रधारांविरुद्ध मोक्का लागू करण्याचा विचार करत आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याच्या वाहतूक आणि विक्रीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, बेकायदेशीर गुटखा व्यापारासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हे नोंदवता येतील का, याबाबत मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल.मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल म्हणाले की, राज्य सरकार गुटखा बंदीची अधिक कडक अंमलबजावणी करेल आणि विविध विभागांमार्फत जिल्हा पातळीवर कर्करोग निर्माण करणाऱ्या उत्पादनाविरुद्ध जागरूकता मोहिमा राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात भगवान फुलारी व नागनाथ शिंदे निलंबित

0

बीड — शिक्षक भरती घोटाळ्यात झालेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्या प्रकरणी बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या भ्रष्ट जोडगोळीचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी या दोघांच्या निलंबनाचे आदेश प्रधान सचिव रणजीसिंह देओल यांनी दिले आहेत.
नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती घोटाळा झाला. त्यानंतर शासनाने चौकशी समिती स्थापन करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले. बीडमध्ये देखील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी या जोड गोळीने शिक्षण विभागात गैरव्यवहाराचा कळस गाठला. शिक्षक भरती प्रकरणात 500 कोटीचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी केला होता. या सदर्भात  तक्रार करून सतत त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. दरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यात आली.समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत केल्या होत्या. प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे उघडकीस आले. गेल्याच म्हणजे ऑक्टोबर मध्ये अहवाल सादर करून निलंबनाची शिफारस करण्यात आली. यावरून नागनाथ शिंदे व भगवान फुलारी या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.