Home Blog Page 36

बीडमध्ये लग्नातील फटाकेबाजीचा थरार जीवावर; फोटोग्राफर गंभीर जखमी, लाखोंचे साहित्य जळाले

0

बीड — शहरातील बार्शी रोड परिसरात कांबळे व टिके परिवाराच्या झालेल्या विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या धोकादायक फटाकेबाजीमुळे मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत फोटोग्राफर गंभीररीत्या भाजले गेले असून त्यांचे लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. या प्रकरणी संबंधित आयोजक, इव्हेंट व्यवस्थापक आणि फटाके उडवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमेश्वर मंदिर परिसरामागील आशीर्वाद मंगल कार्यालयात २८ एप्रिल २०२६ रोजी विवाह सोहळा पार पडत होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र, ही फटाकेबाजी कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजनांशिवाय आणि नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररीत्या भाजले गेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दुर्घटनेदरम्यान त्यांचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स आणि इतर महागडे उपकरणे जळून नष्ट झाली. तसेच काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटर किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारदारांच्या मते, लोकवस्तीच्या भागात अग्निसुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नव्हती. तसेच आवश्यक परवानग्या, प्रशिक्षित कर्मचारी किंवा सुरक्षेचे निकष पाळले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यास उपस्थित महिला, लहान मुले, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, जखमी फोटोग्राफर अभिषेक कदम यांच्या स्वतःच्या विवाहाला अवघे काही दिवस बाकी असताना ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान, संबंधित मंगल कार्यालयात विनापरवाना मद्यसाठा असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून आयोजक, फायरवर्क व्यावसायिक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच जखमींना नुकसानभरपाई मिळावी, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मंगल कार्यालयांमधील धोकादायक फटाकेबाजीवर कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी अभिषेक कदम चे वडील गोरख कदम यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

केजचे तहसीलदार राकेश गिड्डेंच्या निधनानंतर पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी

0

केज — तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या भीषण अपघाती निधनानंतर राज्य शासनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. गिड्डे यांच्या निधनानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत त्यांच्या पत्नी नेहा राकेश गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर ‘गट-क’ मधील शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, नेहा गिड्डे यांच्या कौटुंबिक आणि मानसिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने त्यांना बीडऐवजी सांगली जिल्ह्यात नियुक्ती देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दाखविण्यात आलेल्या संवेदनशीलतेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

भीषण अपघातात राकेश गिड्डे यांचा मृत्यू

दि. ९ एप्रिल रोजी अंबाजोगाई-लातूर महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महसूल विभागासह केज तालुक्यात शोककळा पसरली होती.
घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिड्डे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते. यावेळी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर तातडीने नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

शासनाकडे अर्जानंतर हालचालींना वेग

नेहा गिड्डे यांनी दि. २६ एप्रिल रोजी शासनाकडे नोकरीसाठी अधिकृत अर्ज सादर केला होता. त्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला.
यानंतर महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवत सांगली जिल्ह्यात नियुक्ती देण्याचे आदेश जारी केले.

मिरज तहसील कार्यालयातील पद नाकारले

शासनाने नेहा गिड्डे यांना सांगली जिल्ह्यातील मिरज तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार पद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नागरिकांची मोठी गर्दी आणि कामाचा प्रचंड ताण लक्षात घेता, “सध्या अशा पदावर काम करण्याची मानसिक स्थिती नाही,” असे सांगत त्यांनी हे पद स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.
दरम्यान, आता त्यांना ‘गट-क’ मधील त्यांच्या पसंतीच्या रिक्त पदावर नियुक्ती दिली जाणार असल्याची माहिती स्वतः नेहा गिड्डे यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा सवाल; IAS पालकांच्या मुलांना आरक्षण का?

0

नवी दिल्ली — ओबीसी आरक्षण आणि क्रीमी लेयरच्या मर्यादेबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केलेल्या महत्त्वपूर्ण निरीक्षणामुळे देशभरात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. “आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ का मिळावा?” असा थेट सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. या प्रश्नानंतर आरक्षणाचा उद्देश, क्रीमी लेयरची मर्यादा आणि सामाजिक न्याय यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.


हे प्रकरण न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आले होते. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “आरक्षणाचा मुख्य उद्देश सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. जर एखाद्या कुटुंबातील आई-वडील सर्वोच्च प्रशासकीय पदांवर पोहोचले असतील, तर त्यांच्या मुलांना पुन्हा आरक्षणाची गरज काय?”
कोर्टाने यावेळी सामाजिक स्तर आणि शासकीय सेवेमधील उच्च पदांबाबतही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. पालक उच्चशिक्षित असून मोठ्या प्रशासकीय पदांवर असतील, तर त्या कुटुंबाची सामाजिक स्थिती बदलते. त्यामुळे पुढील पिढीला सातत्याने आरक्षणाचा लाभ देणे योग्य ठरते का, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे कोर्टाने नमूद केले.
सुनावणीदरम्यान EWS आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला. न्यायालयाने स्पष्ट केले की, EWS आरक्षण हे केवळ आर्थिक दुर्बलतेवर आधारित असते, तर ओबीसी आरक्षणामध्ये सामाजिक मागासलेपणाचाही विचार केला जातो. त्यामुळे क्रीमी लेयरचे निकष आणि EWS चे निकष समान असू शकत नाहीत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
दरम्यान, वकील शशांक रत्नू यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, केवळ उत्पन्न नव्हे तर सामाजिक आणि प्रशासकीय दर्जाही क्रीमी लेयर ठरवताना महत्त्वाचा असतो. ग्रुप A आणि काही प्रकरणांमध्ये ग्रुप B कर्मचाऱ्यांनाही क्रीमी लेयरच्या बाहेर ठेवले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाच्या या निरीक्षणानंतर देशभरात ओबीसी आरक्षण, क्रीमी लेयरची मर्यादा आणि सामाजिक न्याय यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, आरक्षणाचा खरा लाभ हा खरोखरच वंचित आणि मागास घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

परळीतील हॉटेल चालकाची पैशांच्या वादातून निर्घृण हत्या; एक आरोपी ताब्यात

0

परळी — शहरात पैशांच्या किरकोळ वादातून एका हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

मृत व्यक्तीचे नाव कारभारी नारायण आंधळे असे असून ते परळी येथे ‘पवन हॉटेल’ चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी (दि. 21 मे) रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर कारभारी आंधळे हे संशयित आरोपी सचिन सोमनाथ राठोड आणि सुमीत पवार यांच्यासोबत बसून दारू पीत होते. यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला.

वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन राठोड याने कारभारी आंधळे यांना पकडून ठेवले, तर सुमीत पवार याने धारदार चाकूने त्यांच्या मानेवर आणि हातावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या कारभारी आंधळे यांचा घटनास्थळीच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर आरोपी सचिन राठोड यानेच कारभारी आंधळे यांच्या मुलाला फोन करून वडील जखमी अवस्थेत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच मृताचे मोठे चिरंजीव ओमकेश आंधळे व नातेवाईक अरुणोदय मार्केट लाईन परिसरात पोहोचले. त्यानंतर जखमी अवस्थेतील कारभारी आंधळे यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी ओमकेश आंधळे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात सचिन राठोड आणि सुमीत पवार यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सचिन राठोड याला ताब्यात घेतले असून फरार आरोपी सुमीत पवारचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित

0

बीड  — भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेला बीडचा माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राज्य शासनाने त्याच्यावर अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात ७ मे रोजी अविनाश पाठक याला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुढील सुनावणीत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
दरम्यान, एका सनदी अधिकाऱ्याला न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय नियमांनुसार पुढील कारवाई करत अविनाश पाठकच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. शासन आदेशानुसार हे निलंबन अटकेच्या तारखेपासून लागू करण्यात आले असून निलंबन कालावधीत त्याचे मुख्यालय बीड येथेच राहणार आहे.
भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणामुळे आधीच बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू असताना आता झालेल्या निलंबन कारवाईमुळे या प्रकरणाला आणखी वेग आला आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी समीर शेख 

0

बीड — समीर शेख यांची बीड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नियंत्रण कक्षातून त्यांची बीडला बदली करण्यात आली असून त्यांनी सचिन पांडकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पदभार स्वीकारणार आहेत

पोलीस दलाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळख असलेल्या सचिन पांडकर यांची जवळपास साडेतीन वर्षानंतर धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. सचिन पांडकर यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानात्मक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. असे असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी पोलीस दल व जनता यांचा समन्वय साधून कामकाज केले. बीडच्या इतिहासात इतका कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला नव्हता. आंदोलन काळात बीडमध्ये झालेली जाळपोळ असो की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झाल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती कुशलतेने त्यांनी हाताळली. पोलीस दलातला वरिष्ठ अधिकारी असताना देखील त्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. परिणामी पोलीस दलाची प्रतिमा टिकून राहण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता बीडकरांना लागली होती. दरम्यान राज्य नियंत्रण कक्षेतून समीर शेख यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात बीड मधील कायदा सुव्यवस्थेचे आव्हानांना समीर शेख कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे

नीट पेपरफुटीपासून बोगस शाळांपर्यंत? डॉ. मनोज शिरुरे प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

0

बीड — भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचीच असलेली लातूरची रेनीसन्स सीबीएसई इंग्लिश स्कूल चा अध्यक्ष असलेला बालरोग तज्ञ डाॅ. मनोज शिरुरे याला नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर फुटलेली नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान शिक्षण संस्थेचा पदाधिकारी जाळ्यात अडकल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून संस्थेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.


नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी या मास्टर माईंड ला पकडल्यानंतर आरसीसी क्लासेस चा शिवराज मोटेगावकर हा देखील एका व्हिडिओ जाहिरात मुळे सीबीआयच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणाचे धागेदोरे लातूर बीड सह राज्यामध्ये कोठे कोठे आहे याचा कसून तपास ‌ सीबीआय करत आहे. या तपासात फूटलेला पेपर खरेदी केल्याप्रकरणी पालक देखील तपास यंत्रणांच्या रडार वर आले आहेत.
सीबीआय ने बुधवारी रात्री
लातूरच्या औसा रोडजवळील सिद्धिविनायक रुग्णालयात छापा मारला. यावेळी सिद्धिविनायक रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरुरे याची कसून तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉ. शिरुरेला नोटीस देऊन सोडण्यात आले. मात्र सीबीआय ने पुन्हा शिरूरेला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्ली येथे रवाना करण्यात आले.डाॅ. शिरुरे याने मोटेगावकर कडून आपल्या मुलासाठी प्रश्नपत्रिका विकत घेतली होती.
दरम्यान डॉ. मनोज शिरूरे हा भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचाच एक भाग असलेल्या रेनीसन्स सीबीएसई इंग्लिश स्कूलचा अध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शाळेने शासनाची कोणतीही परवानगी नसताना आणि दिल्ली बोर्ड सीबीएसई चे अफिलेशन प्रमाणपत्र नसताना शाळा बेकायदेशीर सूरूच ठेवली. संगनमत करून करोडो रुपयांचा चुना विद्यार्थी आणि पालकांना लावला आहे. मनसेने या विरोधात खंबीर भूमिका घेतल्यानंतर माध्यमिक शाळा बंद करण्यात आली. अशी माहिती मिळत आहे. याच संस्थेच्या अंबाजोगाई माजलगाव आणि उदगीर येथे इंग्रजी माध्यमांच्या बोगस शाळा असल्याचं देखील सांगितलं जात आहे. शाळेसाठी लावण्यात आलेल्या अटी शर्ती पाळल्या जात नसून मैदान ग्रंथालय प्रयोगशाळा यासारख्या मूलभूत सुविधा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ ज्या उद्देशाने चालू करण्यात आले होते त्या संस्थेच्या उद्देशाला हरताळ फासण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत येऊन पोहोचल्यामुळे या संस्थेचे देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

पेपर लिक प्रकरणात”विद्यार्थ्यांसह पालकांची “नीट” नेटकी; सीबीआयकडून शिक्षिका आई व दोन विद्यार्थ्यांची कसून चौकशी

0

अंबाजोगाई — पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता बीड जिल्ह्यात नवे धागेदोरे मिळत असून, पालकांसह विद्यार्थ्यांची देखील “नीट ” नेटकी होताना दिसून येत आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे पालक व दोन विद्यार्थ्यांना घरातून  दुसरीकडे घेऊन जात ही चौकशी करण्यात आली. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यातील बहीण रिपीटर विद्यार्थीनी असून ती पुन्हा NEET परीक्षेला बसली होती, तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षा देत होता. धक्कादायक बाब म्हणजे कथितरित्या हा पेपर या दोघांसाठीच मिळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.

CBI च्या चौकशीनंतर अंबाजोगाई परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणातून आणखी मोठे शैक्षणिक रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून शैक्षणिक नेटवर्कसह पालकांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, नीट घोटाळ्याचा कथित मास्टरमाईंड म्हणून चर्चेत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याचे बीड कनेक्शन समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेचा शिवराज मोटेगावकर हा ‘ब्रँड अँबेसिडर’ असल्याचे समोर आले आहे. २०२४ मध्ये संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या लेटरहेडवर मोटेगावकरचा ‘ब्रँड अँबेसिडर’ असा उल्लेख आढळून आला. यामुळे संशय अधिक गडद झाला आहे.

यामुळे मोटेगावकरशी संबंधित कोचिंग क्लास चालक आणि शैक्षणिक नेटवर्कही आता तपासाच्या रडारवर आले आहेत.बीड मधील शाहूनगर परिसरात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत असून, या क्लास चालकांचे मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी पेपरफुटी संदर्भात काही व्यावसायिक हितसंबंध होते का, याचीही CBI कडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना आता बीड जिल्ह्यातील या नव्या घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रातील काळे धंदे आणि कोचिंग माफियांचे कथित जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे जाळे केंद्रीय अन्वेषण विभागाने उध्वस्त करून टाकावे अशी मागणी केली जात आहे.

तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा! 6 आरोपी ताब्यात, 7.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

केज (बीड ) — जिल्ह्यातील केज पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथे कर्तव्यावर असताना21 मे रोजी  वेंकटराम (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गोपनीय माहितीदारामार्फत केज पोलीस ठाणे हद्दीतील काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. संबंधितांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व साहित्य असल्याचेही समोर आले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी तातडीने पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष दुपारी छापा टाकून तिरट जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले.
या धाडसी कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी तसेच चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. वेंकटराम (IPS) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार क्षीरसागर, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार वंजारे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तपासाच्या दृष्टीने आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.