Home Blog Page 35

राहुल गांधींचा मोठा दावा; “वर्षभरात मोदी सरकार कोसळणार”

0

नवी दिल्ली —  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi ) सरकारच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. पुढील एक वर्षाच्या आत मोदी सरकार सत्तेतून जाऊ शकते, असा दावा राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत केला असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळाली आहे.


काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, वाढती महागाई आणि जनतेतील नाराजी या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत देशात आर्थिक असंतोष वाढत असल्याचे म्हटले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि देशांतर्गत आर्थिक तणाव याचा मोठा परिणाम आगामी काळात भारतीय राजकारणावर होऊ शकतो. लोकांमध्ये सरकारविरोधात नाराजी वाढत असून त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असेही राहुल गांधी यांनी बैठकीत नमूद केल्याचे सांगितले जात आहे.

अन्यायग्रस्तांसोबत काँग्रेस उभी राहील

या बैठकीत काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, राहुल गांधी यांनी यावर असहमती दर्शवली. कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर काँग्रेसने स्पष्टपणे त्या समाजाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“हिंदू, दलित, सवर्ण, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध किंवा जैन कोणताही समाज असो, अन्याय झाल्यास काँग्रेसने त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला पाहिजे,” असे राहुल गांधी म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राहुल गांधी यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे

NEET प्रकरण: लातूरमध्ये मोठी कारवाई; कोचिंग क्लासेस, हाॅस्टेल, हॉटेल बंद करण्याचे आदेश!

0

लातूर — नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या लातूर शहरात आता आणखी एक मोठा प्रशासकीय निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या लातूर औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, वस्त्रालयं आणि इतर व्यावसायिक उपक्रमांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर जिल्हा उद्योग केंद्राने संबंधित व्यवसाय तात्काळ बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.


या निर्णयामुळे लातूरच्या प्रसिद्ध ‘क्लास संस्कृती’त मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२०११ पासून सुरू होत्या तक्रारी

तक्रारदारांच्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीमधील जागांचा मूळ उद्देश उद्योग उभारणीचा होता. मात्र गेल्या अनेक वर्षांत उद्योगांऐवजी कोचिंग क्लासेस आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले. जवळपास २७ एकर परिसरातील अनेक भूखंडांवर औद्योगिक प्रकल्प उभे राहण्याऐवजी ट्युशन क्लासेस, विद्यार्थ्यांची हॉस्टेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रम सुरू झाले.
या संदर्भात २०११ पासून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. काही वेळा कारवाईची आश्वासनं देण्यात आली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईदेखील झाली. मात्र परिस्थितीत फारसा बदल झाला नसल्याची नाराजी तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे.

ट्युशन एरिया’ म्हणून ओळख निर्माण

एकेकाळी उद्योगांसाठी विकसित करण्यात आलेला हा परिसर आता संपूर्ण राज्यात ‘ट्युशन एरिया’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. मोठमोठे उद्योग बंद पडत गेले आणि त्यांच्या जागी खासगी कोचिंग क्लासेसचे जाळे निर्माण झाले. अनेक नामांकित कोचिंग संस्थांनी येथे आपली केंद्रे सुरू केली असून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये दाखल होत आहेत.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयकडून अटक झाल्यानंतर लातूरच्या क्लास संस्कृतीवर टीकेची झोड उठली होती. पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर प्रकरणानंतर ‘लातूर पॅटर्न’च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पालकांकडून मिश्र प्रतिक्रिया

प्रशासनाच्या या कारवाईनंतर पालकांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे ही व्यवस्था अचानक बंद करू नये, अशी भूमिका घेतली आहे. तर काहींनी औद्योगिक नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रशासनाच्या नव्या आदेशानंतर लातूर औद्योगिक वसाहतीतील कोचिंग व्यवसायांवर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मुळुकवाडी हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप; बळीराम निर्मळ हत्येचा निकाल

0

बीडच्या मुळुकवाडी येथे 2022 मध्ये झालेल्या बळीराम निर्मळ हत्या प्रकरणात आरोपी रोहिदास निर्मळ याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी प्रभावी बाजू मांडली.

बीडमध्ये गाजलेल्या मुळुकवाडी हत्या प्रकरणाचा निकाल

बीड —  तालुक्यातील मुळुकवाडी येथे 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या बळीराम निर्मळ हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी रोहिदास निर्मळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रथम सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. मिलिंद केशवराव वाघीरकर यांनी काम पाहिले.

सकाळच्या वेळी कोयत्याने हल्ला

घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास केशरबाई बळीराम निर्मळ या घरासमोर मूग पाखडत बसल्या होत्या, तर कांताबाई निर्मळ या घराच्या ओट्यावर दात घासत होत्या. त्याचवेळी आरोपी रोहिदास निर्मळ हा कोयता लपवून घरासमोर आला आणि अचानक केशरबाई यांच्या डोक्यावर व तोंडावर वार करण्यास सुरुवात केली.


आरडाओरड ऐकून बळीराम निर्मळ घटनास्थळी धावत आले असता आरोपीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या बळीराम निर्मळ यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत केशरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार करण्यात आले. कांताबाई निर्मळ यांच्यावर बीडमध्ये उपचार करण्यात आले.

नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी कांताबाई निर्मळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 267/2022 अंतर्गत भारतीय दंड विधान कलम 302, 307, 326, 324, 109 आणि 115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख आणि हजारे यांनी केला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी पक्षाने एकूण 13 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, जखमी महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारी पक्षाने सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी रोहिदास निर्मळ याला दोषी ठरवले. न्यायालयाने कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड, कलम 307 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा व 2 हजार रुपये दंड, तर कलम 326 अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा व 10 हजार रुपये दंड सुनावला.
दरम्यान, आरोपीचे आई-वडील विठ्ठल आणि कौसाबाई यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

खटल्यात विशेष सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची

या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघीरकर यांना अॅड. संदीप जोगदंड, अॅड. सोंडगे, विधी विद्यार्थी अभिषेक अवताडे आणि पैरवी अधिकारी गव्हाणे यांचे सहकार्य लाभले.

बीडमध्ये महिलेवर अत्याचार करून ब्लॅकमेलिंग; आरोपी अमर बांगरचा पोलिसांकडून शोध

0

बीड —  जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच बीड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३१ वर्षीय महिलेला लक्ष्य करत आरोपीने तिच्यावर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसारखे गंभीर प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपी अमर बांगर याने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीने पीडितेला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत पाशवी अत्याचार केले.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना बदनामीची धमकी देत मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली. कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मोठी रक्कम दिली, मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणातील अत्याचाराच्या घटना 23 एप्रिल 2025 रोजी बीड येथे तसेच 15 सप्टेंबर 2025 रोजी नंदुरबार येथे घडल्याचे समोर आले आहे. अखेर पीडित महिलेनं धाडस दाखवत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून आरोपी अमर बांगरचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, आरोपी अमर बांगर हा काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असल्याची चर्चा असून त्याचे नाव वाल्मिक कराड गँगशी जोडले जात असल्याचेही बोलले जात आहे. तसेच आरोपीचे वडील किरण बांगर हे पंचायत समितीचे माजी सभापती राहिले असून त्यांचे राजकीय क्षेत्राशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या आरोपी फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम:2.51 कोटींचा घोटाळा उघड; बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई, 81 लाखांची रक्कम फ्रिज

0

बीड  — मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेअंतर्गत तब्बल 2 कोटी 51 लाख 51 हजार 692 रुपयांच्या कर्ज अनुदान रकमेच्या अपहारप्रकरणी बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून बँकेच्या पोर्टल लॉगिनचा गैरवापर करत शासनाच्या अनुदानावर डल्ला मारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.


या प्रकरणी उद्योग सहसंचालक विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी बाळासाहेब त्रिबंक यशवंते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास सायबर पोलीस ठाणे बीडकडे वर्ग करण्यात आला.
गुन्हा क्रमांक 139/2024 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 409, 34 तसेच आयटी अॅक्टच्या कलम 66(D) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. या प्रकरणात अपहार झालेल्या रकमेपैकी आतापर्यंत 81 लाख 78 हजार 289 रुपये फ्रिज करण्यात तसेच रक्कम आरोपींकडून वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदीप आराक, पोउपनि स्वाती लहाने तसेच सायबर पोलीस ठाण्यातील पथकाने केली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी लिंक, APK फाइल्स, संशयास्पद SMS किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवू नये, OTP शेअर करू नये तसेच सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रार

नोंदवण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महापारेषणमधील नोकरीचे आमिष; तरुणाची ८ लाखांची फसवणूक, जालना जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा

0

परळी —  सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, परळी तालुक्यातील एका तरुणाची तब्बल ८ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत जालना जिल्ह्यातील दोघांनी ही फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तळेगाव (ता. परळी) येथील प्रतीप पांडुरंग मुंडे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बी.ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जालना जिल्ह्यातील ऋषिकेश सुनील खराटे याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही दोघांमध्ये संपर्क कायम होता. दरम्यान, ऋषिकेश खराटे याने महापारेषण विभागात ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवून देतो, असे सांगत पैशांची मागणी केली.
फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर २०२४ रोजी सहाय्यक अभियंता पदाची परीक्षा दिल्यानंतर आरोपीने संपर्क साधत इतर उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. मात्र मैत्री असल्याने १५ लाखांत काम करून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील आरोपींच्या कार्यालयात भेट घेतली. चर्चेनंतर ८ लाख रुपये आगाऊ देण्याचे ठरले. त्यानुसार रोख रक्कम तसेच बँक व्यवहाराद्वारे आरोपींना पैसे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपींनी बनावट निकाल यादी दाखवत फिर्यादीचे नाव निवड यादीत असल्याचा दावा केला. तसेच “पार्टी”साठी आणखी दोन हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचाही आरोप आहे. मात्र अधिकृत निकालात नाव नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली असता “वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल” असे सांगत वेळकाढूपणा करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऋषिकेश सुनील खराटे (वय २८) आणि सुनील वायुराव खराटे (वय ५०, रा. एकलहरा, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २३) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पीएसआयला लग्नास नकार देत वर्दी उतरवण्याची धमकी;२५ लाखाची मागणी

0

बीड  — जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक आणि खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखरपुडा झाल्यानंतर मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर संबंधित पीएसआयला “२५ लाख रुपये द्या, नाहीतर वर्दी उतरवू आणि हातपाय तोडू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चकलांबा येथील अंगद शाहूराव निंबाळकर (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे भाऊ पवन निंबाळकर हे बीड येथे पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. मातोरी (ता. शिरूर कासार) येथील गीतांजली जरांगे हिच्याशी त्यांचा विवाह ठरवण्यात आला होता. १४ डिसेंबर २०२५ रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला.
फिर्यादीनुसार, साखरपुड्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि कपड्यांवर सुमारे ४ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, १५ मार्च २०२६ रोजी गीतांजली हिने पवन निंबाळकर यांना फोन करून “माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न ठरवण्यात आले असून माझ्या मनात कोणत्याही भावना नाहीत,” असे स्पष्ट सांगितले.
यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये चकलांबा येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत गीतांजली हिने सर्वांसमोर लग्नास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी काही नातेवाईकांनी पीएसआय पवन निंबाळकर यांना धमकावून २५ लाख रुपयांची मागणी केली. “रस्त्यात गाठून हातपाय तोडू, ड्युटी करू देणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, साखरपुडा आणि लग्नाच्या नावाखाली एकूण १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी सरसराम जरांगे, आसाराम जरांगे, रामप्रसाद जरांगे, प्रकाश जरांगे, ज्ञानेश्वर जरांगे, तात्याराम जरांगे, गीतांजली जरांगे, मीना जरांगे, रुक्मिणी जरांगे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बीडमध्ये मोठी कारवाई! स्कॉर्पिओतून गोवंश चोरी करणारी टोळी जेरबंद; ३ लाखांचे वाहन जप्त

0

बीड —  शहरातील पेठ बीड परिसरातून गोवंश जातीच्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. तब्बल 190 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही आणि टोल नाक्यांची तपासणी करत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पोलिसांनी जप्त केली असून आरोपींकडून महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.


दिनांक 6 मे 2026 रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात गोवंश चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान बीड शहरातील 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयित स्कॉर्पिओ वाहन आढळून आले मात्र नंबर प्लेट वारंवार बदलल्यामुळे आरोपींचा माग काढणे आव्हानात्मक ठरत होते.
तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि टोल नाक्यांच्या मदतीने पोलिसांनी संशयित वाहनाचा माग घेत मालेगावमार्गे सिल्लोडपर्यंत धडक मोहीम राबवली. पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी बीडमधून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात इम्रान शेख , वय 34 वर्ष, रा. अब्दालशहा नगर, सिल्लोड हे.मू. दरेगाव तालुका मालेगाव जि. नाशिक,शेख तय्यब शेख शफीक वय 40 वर्ष,रा.. मोघपुरा सिल्लोडआणि सलमान सय्यद रा . बापू नगर सिल्लोड यांची नावे समोर आली असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. तपासात या टोळीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शाळार्थ आयडी घोटाळा: भ्रष्टाचाराच्या “चंद्र” कलेची पाळे “मुळे” उखडणार; शाळा संचालकांची मालमत्ता जप्त होणार !

0

बीड — राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात अनेकांनी आपल्या “चंद्र” कला दाखवत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवली अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनियमितता करत गडगंज संपत्ती कमावली अशा शाळा संचालकांच्या संपूर्ण मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


बीडमध्ये देखील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करून चौकशीत दोषी आढळल्या प्रकरणी बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी तसेच तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या भ्रष्ट जोडगोळीचं निलंबन 19 नोव्हेंबर 2025 रोजी.करण्यात आलं. याच शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेकांनी आपल्या “चंद्र”कला दाखवत भ्रष्टाचाराचे “कांत”आपणच आहोत असं म्हणत भ्रष्टाचाराची पाळे “मुळे” खोलवर रुजवली आशा भ्रष्ट संचालकांची मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल शासनाने उचलले आहे.
माजी विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.शिक्षण आयुक्तालयाने 20 मे रोजी जारी केलेल्या पत्रानुसार,शालार्थ आयडी प्रक्रियेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून, संबंधित भ्रष्ट शिक्षण संस्था संचालक, संबंधित कर्मचारी  आणि प्रशासकीय शिक्षण अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संच मान्यता प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधित व्यवस्थापनावर थेट जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी राज्यभर एकसमान कार्यपद्धती (SOP) लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिक्षण सहसंचालक हारून इस्माईल अत्तार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले हे पत्र सध्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कारवाईमुळे राज्यातील अनेक संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यात खळबळ माजली असून ते धास्तावले आहेत.

शिक्षणअधिकारी आणि संस्था यांच्या नियुक्ती आदेशानुसार काढलेल्या आदेशाचे निरीक्षण व परीक्षण करणे गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. बऱ्याच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आजतागायत आदेश दिले गेले नाहीत ते आदेश संस्था चालक दलालांनी लपवण्यासाठी का खटाटोप केला आहे हे मात्र
अनभिज्ञ आहे . याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

वृध्द भाजी विक्रेती महिलेच्या मदतीस उपनगराध्यक्ष धावले;पालिका पदाधिकाऱ्यांकडून साडी-चोळी देऊन  सन्मान

0

बीड — शहरात भाजी विक्रेती महिलेबाबत घडलेल्या घटनेची आ. विजयसिंह पंडित यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला, गरीब, कष्टकरी आणि सामान्य नागरीकांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा कडक इशारा दिला. यानंतर पालिका प्रशासनाने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. आ. विजयसिंह पंडित यांच्या सूचनेवरून उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी संबंधित महिलेची भेट घेऊन तिला आर्थिक मदत व साडी-चोळी देत तिचा सन्मान केला व यापुढे कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही दिली.

बीड शहरातील भाजी मंडई समोर बुधवार, दि.२० मे रोजी अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये एका वयोवृध्द महिला भाजी विक्रेतीचा भाजीपाला फेकून दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याची आ. विजयसिंह पंडित यांनी मुंबई मध्ये मंत्रालयीन कामात व्यस्त असतानाही या गंभीर प्रकरणाची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, गटनेते फारुक पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मधील प्रकाराच्या अनुषंगाने अशा प्रकारे भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला फेकून देणे अथवा उचलून घेऊन येण्याच्या कोणत्याही सूचना पालिका प्रशासनाने संबंधितांना दिल्या नसल्याची बाब यामध्ये उघडकीस आली. विशेष म्हणजे सदर अतिक्रमण विरोधी कारवाई होताना स्वच्छता निरीक्षक या घटनेच्या वेळी तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे नगर परिषदेने या कारवाईचे समर्थन केले नाही. मात्र अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत या बाबत उपाययोजना करण्याचे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी दिले होते.

यानंतर शुक्रवार, दि.२२ मे रोजी आ. विजयसिंह पंडित यांच्या सूचनेवरून बीड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी सदर महिलेची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सदर महिलेच्या व नातेवाईकांच्या भावना समजावून घेतल्या, पालिका प्रशासनातील ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाजीपाला उचलून ट्रॅक्टरमध्ये फेकला त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या असून पुढील कारवाई देखील लवकरच करण्यात येईल असे सांगितले. गरीबांच्या, सामान्य नागरीकांच्या डोळ्यात अश्रू नव्हे तर चेहऱ्यावर हसू दिसले पाहिजे असे सांगत बीड शहराच्या विकासासाठी कणखर, सकारात्मक आणि विकासात्मक भुमिका घेणारे आ. विजयसिंह पंडित आपल्या कुटूंबाच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सदर महिलेला आर्थिक मदत करून साडी-चोळी देत तिचा सन्मान करण्यात आला, भविष्यात यापुढे कोणताही त्रास होणार नाही अशी ग्वाही नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे व पालिका प्रशासनाच्या वतीने उपनगराध्यक्ष विनोद मुळूक व नगरसेवक महेश धांडे यांनी दिली आहे. यावेळी वृध्द महिलेचा मुलगा परशुराम दळवी उपस्थित होता.