Home Blog Page 25

केज तालुक्यात दुर्दैवी घटना: विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, सांगवी शिवार हादरले

0

केज (बीड) — तालुक्यातील सांगवी शिवारात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. विहिरीत बुडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पिंपळगाव (ता. केज) येथील विराज विशाल शिंगारे (वय १४) हा आपल्या मित्रांसोबत पोहायला शिकण्यासाठी सांगवी शिवारातील बाळासाहेब केदार यांच्या शेतातील विहिरीवर गेला होता. पोहण्यासाठी त्याने कमरेला थर्माकोल बांधून विहिरीत उडी मारली. मात्र, थर्माकोल तुटल्याने तो सुमारे ३५ फूट खोल पाण्यात बुडाला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक फौजदार पी. टी. चव्हाण, कर्मचारी शंभू दराडे व होमगार्ड सुरज भैरट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला स्थानिक पातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र यश न आल्याने बाहेरील बचाव पथकाची मदत घेण्यात आली.
पैठण येथील बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून सखोल शोधमोहीम राबवली आणि सायंकाळी सुमारे ६.३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

सेवानिवृत्त शिक्षक दिलीप बोराडे यांचा चौसाळ्यात सत्कार; 35 वर्षांच्या सेवेला सलाम

0

बीड — तालुक्यातील चौसाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दिलीप बोराडे गुरुवारी (दि.३०) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनिमित्त शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मजा हम्पे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद (बाबूशेठ) लोढा तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा बीड शहर अध्यक्ष अशोक लोढा उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबूशेठ लोढा म्हणाले की, “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो. दिलीप बोराडे यांनी 30-35 वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत.”
त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तळमळीने केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.


अध्यक्षीय भाषणात पद्मजा हम्पे यांनी बोराडे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी हिंगणी (बु.) ग्रामस्थांच्या वतीने बबनदास वैष्णव, सुरज वैष्णव, शमशाद सय्यद,अ‍ॅड. चंद्रकांत गोरे अंकुश नाईकवाडे, मिलिंद कुलकर्णी, शहाजी सुरवसे आणि बाबासाहेब बोराडे आदींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल “या” दिवशी

0

मुंबई — राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा (HSC Results) निकाल शनिवार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन वेबसाटईवर पाहाता येणार आहे
काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर, राज्यातील 12 बोर्ड परिक्षेच्या निकालाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदर निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला आसन क्रमांक व इतर आवश्यक तपशीलांच्या आधारे निकाल पाहता येईल. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. बारावीचा निकाल शनिवारी जाहीर होणार असून सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये, राज्याचा निकाल, कोणत्या विभागात किती निकाला आणि एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निकाला जाहीर होईल. त्यानंतर, दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

अहमदपूर – अहिल्यानगर महामार्गाचा विकास भेगाळला; कंत्राटदाराचे डांबरी ठिगळ प्रवाशांना मरण जवळ

0

बीड — बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (NH-548D) ची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भगळी,खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सुमारे १७० किमी लांबीचा आणि ८७८ कोटी खर्चाचा हा महामार्गावर प्रवाशांना मरण स्वस्त झाले आहे.अशी प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.


विशेषतः मांजरसुंभा ते पाटोदा या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा, तडे आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केवळ मलमपट्टी; कायमस्वरूपी उपाय नाही

संबंधित कंत्राटदार एचसीपीएल (HCPL) कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे तात्पुरते काम केले जात आहे. मात्र ही दुरुस्ती टिकाऊ नसून काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब होत असल्याचे दिसून येत आहे.

अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त

दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम (HPM) कंपनीकडील कामही रखडलेले आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि नाले यांची कामे अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशासन निष्क्रिय

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यामुळे ठेकेदारांचा बेजबाबदारपणा वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

कायमस्वरूपी उपायांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सिमेंट ब्लॉक कट पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी
अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश
देण्याची मागणी केली आहे

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या! 21 अधिकाऱ्यांचे तात्काळ बदली आदेश

0

मुंबई —  राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा प्रशासकीय निर्णय घेत 21 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून अलीकडच्या काळात पोलीस विभागात सातत्याने बदल्या होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक (SP), उप आयुक्त (DCP) तसेच अपर पोलीस महासंचालक (ADG) स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 बदली झालेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची यादी

🏀 जय के. बन्सल → सायबर सुरक्षा, महाराष्ट्र
🏀 ससगुरी विशाल आनंद → धुळे
🏀 बाळासाहेब पाटील → DCP, मुंबई
🏀 सोमनाथ घागे → पोलीस महासंचालक कार्यालय
🏀 रविंद्रसिंह परदेशी → राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
🏀 संदीप घुगे → DCP, मुंबई
🏀 श्रवण दत्त → ADG विशेष कृती (स्टाफ ऑफिसर)
🏀 मुम्मका सुदर्शन → अहिल्यानगर
🏀 बोडोंपत स्वामी → नाशिक ग्रामीण
🏀 अनुज तारे → अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
🏀 अनुराग जैन → DCP, मुंबई
🏀.  अश्विनी सानप → नंदुरबार
🏀. तेगबीर संधू → जालना
🏀. राजकुमार शिंदे → लोहमार्ग, पुणे
🏀. निखिल खाटमोडे → वाशिम
🏀 आयुष नोपानी → चंद्रपूर
🏀 पंकज कुमावत → परभणी
🕳️. नितीन कदम → अमरावती ग्रामीण
🕳️. सूरज गुंजाळ → मालेगाव
🏀.  गजानन राजमाने → DCP, मुंबई
🕳️.  दत्ता तोटेवाड → अमरावती

 तात्काळ पदभार घेण्याचे आदेश

सरकारने सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या पदावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बदल्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

खत तुटवड्यावर मोठा निर्णय! अ‍ॅग्रीस्टॅक नंबर शिवाय खत मिळणार नाही; 20 मे अंतिम मुदत

0

मुंबई — युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खतांची अवाजवी खरेदी रोखण्यासाठी आता खतांचे रेशनिंग करण्यात येणार असून, त्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) बंधनकारक करण्यात आला आहे.
राज्यात सध्या सुमारे ३० लाख शेतकऱ्यांकडे अजूनही ओळख क्रमांक नाही, त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्याने केली जाणार आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, 20 मे 2026 पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक काढणे आवश्यक आहे.

 काय आहे नवीन नियम?

खत खरेदीसाठी अ‍ॅग्रीस्टॅक Farmer ID आवश्यक करण्यात आला आहे.पिकांची नोंद (Crop Registration) बंधनकारक करण्यात येऊन लागवड क्षेत्रानुसारच खतांचे वितरण करण्यात येणार असल्याने अवाजवी खत  खरेदीवर नियंत्रण येणार आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारला दुप्पट दराने खत खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा जाणवत आहे.

 सरकारची कारवाई

खत विक्रीवर नियंत्रणासाठी फिरती पथके सक्रिय करण्यात आली आहेत. परिणामी
अनेक खत विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे.
काही शेतकरी जास्त प्रमाणात खत खरेदी करत असल्याचे तपासणीतून उघड झाले आहे.त्यामुळे या दोन्ही बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने खतांचे रेशनिंग करण्याचे ठरविले आहे.

अ‍ॅग्रीस्टॅक योजना काय आहे?

अ‍ॅग्रीस्टॅक योजना 14 नोव्हेंबर 2024 पासून राज्यात लागू झाली असून, प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Farmer ID) दिला जातो. याच्या माध्यमातून शेती, पिके आणि अनुदान व्यवस्थापन अधिक पारदर्शक होणार आहे.
कृषी विभागाने सुरू केलेल्या रेशनिंग मुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID )नाही त्यांनी 20 मेपूर्वी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात खत खरेदीत अडचणी येऊ शकतात

एस पी साहेब..! बीडचे नावलौकिक वाढवावे, न्यायासाठी पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकू द्यावे ?

0

बीड — महाराष्ट्र त्यातल्या त्यात बीड  “दीन” किती झालेला आहे हे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांना दाखवलेच पाहिजे.बीडचा नावलौकिक स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणाऱ्या एस पीं  च्या यंत्रणेने  वाढवायचा नाही तर मग उपयोग काय? एस पी साहेब..!अडीच महिन्यापासून चौसाळा शेजारील गावातील 14 वर्षाची मुलगी फूस लावून पळवली गुन्हा नोंद झाला. तुमच्या शिलेदारांनी आरोपी पाठीशी घातला हतबल झालेल्या मुलीच्या पालकाला मुलगी मिळावी न्याय मिळावा यासाठी पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकण्याचा इशारा द्यावा लागला. बीडची कायदा सुव्यवस्था किती दीन अन् लाचार झाली आहे खरंच ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे?

महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री तथा बीडची पालकमंत्री महिलाच आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील होणार आहे. महाराष्ट्र स्थापनेला 67 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचा हा कौतुकाचा सोहळा आहे. अशा स्थितीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र किती “दीन” दुबळा करून ठेवला आहे. याच प्रात्यक्षिकही एक मे रोजी दाखवण्याचा मानस पोलीस यंत्रणेने ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

चौसाळा शहराजवळील एका गावातील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी सुरज पंजाब झोडगे याने पळवून नेली. याप्रकरणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी एफ आय आर क्र. 0054/26 नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात दोन अडीच महिन्याचा कालावधी उलटला असला तरी संबंधित मुलगी पोलिसांना सापडली नाही. शेवटी हतबल झालेल्या मुलीच्या पालकांनी एक मे रोजी आंदोलनाचा इशारा दिला. इशारा देऊनही काहीच फरक पडला नाही. फरक कसा पडेल ? या प्रकरणात नेकनूर पोलीस ठाण्याचे फौजदार चंद्रकांत गोसावी आणि जमादार सचिन मुरूमकर यांनी आरोपी सुरज झोडगे च्या नातेवाईकांकडून पैसे खाऊन पाठीशी घातल्याचा आरोप पीडित कुटुंबाने निवेदनात केला आहे. कमीत कमी महिला पालकमंत्री असताना महाराष्ट्र दिनासारखा आनंदोत्सवाचा सोहळा असताना न्याय मिळेल अशी भाबडी आशा पालकांना आहे. पण सध्याची नेकनुर पोलिसांची भूमिका “खलरक्षणाय सद् निग्रहणाय”असताना कारवाई होणार कशी शेवटी “मेहुणी बायको मिंधा संसार” ही म्हण उगाच प्रचलित झाली नाही. पालकांनी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात चंद्रकांत गोसावी मुरूमकर यांना निलंबित करण्यात यावे अशी  मागणी देखील केली आहे. मात्र पोलीस अधीक्षकांच्या लाडक्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार कशी असा प्रश्न देखील जनतेतून विचारला जात आहे.

काहीही असो निवेदन देऊनही पोलीस यंत्रणेला घाम फुटला नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर तेही नवनियुक्त झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या तथा बीडच्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर नासके टमाटे फेकूच द्यायचे बीडचा नावलौकिक करायचाच असा चंग नेकनूरच्या  पोलीस यंत्रणेने बांधल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.

डोळे उघडा, बघा नीट; फसव्या रेकॉर्डचा बीडकरांना  वीट ! ९० टक्के निपटारा दाव्यावर प्रश्नचिन्ह

0

बीड —  न्यायासाठी उपोषणार्थी आणि आंदोलनकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभर रेलचेल सुरू असताना, दुसरीकडे ९० टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा झाल्याबद्दल मिळणारे पुरस्कार हे वास्तवाशी विसंगत असल्याची तीव्र प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी व्यक्त केली आहे. “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” या म्हणीचा प्रत्यय बीडकरांना येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा २८ एप्रिल २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला. या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासनाच्या विविध विभागांकडून मिळणाऱ्या सेवा पारदर्शक, जलद आणि ठरलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करून देणे हा आहे. या अंतर्गत आतापर्यंत ४८६ पेक्षा अधिक सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

या कायद्यानुसार अर्ज केल्यानंतर ठराविक वेळेत सेवा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. विलंब झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास प्रथम व द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे. महसूल विभागातील उत्पन्न, अधिवास, वय, राष्ट्रीयत्व, जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा; पोलिस विभागातील चारित्र्य प्रमाणपत्र व परवाना सेवा; अन्न व नागरी पुरवठा विभागातील रेशनकार्ड; तसेच शिक्षण विभागातील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती सेवा अशा विविध सेवांचा यात समावेश आहे.

मात्र प्रत्यक्षात नागरिकांना सेवा मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत, दाखविण्यात येणारे ‘रेकॉर्ड’ आणि वास्तव यामध्ये मोठी दरी असल्याचे ढवळे यांनी नमूद केले. नागरिकांच्या तक्रारींचा प्रामाणिक निपटारा करूनच प्रशासनाने पुरस्कारांचा दावा करावा, अशी मागणीही त्यांनी केल

परळीतील  तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. धनंजय मुंडेंचे एकहाती वर्चस्व!

0

सिरसाळा पुन्हा ताब्यात, तर जळगव्हाण आणि मरळवाडी सहज राखली

परळी — महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत तीनही ग्रामपंचायती वरती धनंजय मुंडे यांचे एकेरी वर्चस्व सिद्ध केले आहे.

या पोटनिवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा या मोठ्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेख नसीब यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या समवेत आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात जाऊन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शेख नसीब शेख रहीम, माजी सरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख नय्युम, शेख रफिक, अक्रम पठाण, सलमान पठाण, माजी सरपंच इम्रान पठाण, उपसरपंच सुलतान पठाण, मोहम्मद इनामदार, गुड्डू पठाण, मुस्लिम संघाचे जिल्हाध्यक्ष शिराज देशमुख, सिरसाळा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन नदीम भाई, जावेद पत्रकार, अशोक गलांडे, तंटामुक्त अध्यक्ष गाव समिती सिरसाळा अयोसोद्दीन इनामदार, विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष शेख राजू, इरफान बॉस, रफिक बागवान आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर जळगव्हाण येथील नवनिर्वाचित सरपंच संदीप वसंतराव चव्हाण यांसह राजाभाऊ सपकाळ, सुभाष जाधव, अमोल जाधव, उद्धवराव जाधव, कैलास क्षीरसागर, प्रल्हाद पंडित, शिवाजी राठोड, लक्ष्मण चव्हाण, प्रकाश चव्हाण, रामजी चव्हाण, लक्ष्मण राठोड, विश्वनाथ आडे, उद्धव सोळंके यांसह आदी उपस्थित होते.

मरळवाडी चे मयत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी व नवनिर्वाचित सरपंच श्रीमती दीपाली बापुराव आंधळे यांच्या सह उपसरपंच वाल्मीक आघाव, चेअरमन हनुमान आंधळे, त्र्यंबक फड, विष्णू आंधळे, बाळासाहेब फड, संतराम आंधळे, परमेश्वर फड, बापुराव फड, अश्रूबा आघाव, तुकाराम व्हावळे, शिवाजी फड यांसह पदाधिकारी आदींनी जगमित्र कार्यालयात उपस्थित राहून विजयाचा जल्लोष साजरा केला.

बीडमध्ये मोबाईल दुकान फोडून लाखोंची चोरी; सराईत गुन्हेगार ठाणेतून अटक

0

बीड — शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या श्री साई मोबाईल शॉपी येथे 19 एप्रिल रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने सेंटर लॉक व शटरचे कोंडे तोडून दुकानात प्रवेश करत विविध कंपनीचे महागडे मोबाईल फोन चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती.
या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 84/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 305 (ए), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही ( CCTV )आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध

स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुप्त माहिती मिळवली. त्यानुसार हा गुन्हा कल्याण येथील सराईत गुन्हेगार रामनिवास मंजु गुप्ता (वय 37) याने केल्याचे समोर आले.

 50 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा इतिहास

तपासादरम्यान आरोपीविरुद्ध महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

ठाणे, मुंबई, गोवा, गुजरातमध्ये शोधमोहीम

स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने ठाणे, मुंबई, गोवा आणि गुजरात येथे शोधमोहीम राबवली. अखेर आरोपी ठाणे जिल्ह्यातील दिवा पूर्व येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चोरीची कबुली, इतर गुन्ह्यांचाही खुलासा

चौकशीदरम्यान आरोपीने बीडमधील साई मोबाईल शॉपी मध्ये केलेल्या चोरीची कबुली दिली असून चोरी केलेले मोबाईल फोन इतर व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. पुढील तपासात त्याने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जिओमार्ट डिजिटल आणि मधु वाईन, तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर येथील एस.एस. मोबाईल शॉपी येथेही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

 पुढील तपास सुरू

सदर गुन्ह्याचा पुढील तपास बीड शहर पोलीस करत असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 एलसीबी  पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे ,पो.ह. सोमनाथ गायकवाड, मारूती कांबळे, अर्जुन यादव, बाळु सानप, मनोज परजणे, अशफाक सय्यद, विकी सुरवसे व चालक अतुळ हराळे, सिध्देश्वर मांजरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.