दुष्काळात तेरावा महिना शेतकऱ्याचे १ लाख ४० हजार रुपये हिसकावून‌ चोरटे पसार

Spread the love

माजलगावात शेतकरी लुटला

माजलगावात शेतकरी लुटला; उसाचे बिल काढून सोन्यावरील कर्ज फेडण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला..

माजलगाव – उसाचे बिल काढून सोन्यावरील कर्ज फेडण्यासाठी निघालेल्या ६० वर्षीय शेतकऱ्याला चार चोरट्यांनी भरदिवसा लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास माजलगाव शहरात घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या चार चोरट्यांनी शेतकऱ्याच्या हातातील पैशांची रक्कम हिसकावून घेतली आणि काही क्षणांतच घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मदनराव बाबुराव ताकट (वय ६०, रा. रोषनपुरी) असे लुटण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ताकट यांचे उसाचे बिल माजलगाव येथील पूर्णवादी बँकेच्या खात्यात जमा झाले होते. शुक्रवारी दुपारी ते बँकेत गेले आणि खात्यातून १ लाख ४१ हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी रुमालात बांधून ठेवली होती. तुळजाभवानी बँकेत असलेले सोन्यावरील कर्ज फेडण्यासाठी ते निघाले होते.

दरम्यान, मुख्य रस्त्यावरून जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या हातातील पैशांची रक्कम झटका मारून हिसकावून घेतली. त्यानंतर चौघेही दुचाकींवरून वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मदनराव ताकट यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर मदनराव ताकट यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. चोरटे दोन दुचाकींवरून आले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

माजलगावात शेतकरी लुटला; नातेवाईकांचा बँकेवर आरोप

या घटनेनंतर शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पूर्णवादी बँकेच्या व्यवहार पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. बँकेतून पैसे काढल्यानंतर वृद्ध शेतकऱ्याला सुट्ट्या नोटांच्या स्वरूपात रक्कम देण्यात आल्याने चोरट्यांना ही रक्कम सहज हिसकावून नेणे शक्य झाले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेतली जाते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

उसाच्या कष्टाचे पैसे घेऊन सोन्यावरील कर्ज फेडण्यासाठी निघालेल्या वृद्ध शेतकऱ्याला वाटेतच लुटले गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा : आले सोमनाथाच्या मना; तिथे सर्वोच्च न्यायालयाचे ही चालेना; रेड्यांच्या टकरीत कायदा गारद

अधिकृत माहितीसाठी :
महाराष्ट्र पोलीस – अधिकृत वेबसाईट

📲

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?

बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री

WhatsApp चॅनल Follow करा →

✓ 100% फ्री   •   ✓ रोज अपडेट   •   ✓ कधीही Unfollow करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *