Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड रेड्यांच्या टकरी प्रकरणाला पी आय सोमनाथ जाधव यांनी समर्थन देत प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा धाब्यावर बसवत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील पायदळी तुडवला आहे.
बीड — सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असो किंवा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. मात्र, बीड शहरालगत इमामपूर येथील ज्योतिबा मंदिर परिसरात शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) खुलेआम रेड्यांच्या टकरी सुरू असताना बीड ग्रामीण पोलिसांना याचे काहीच देणेघेणे नव्हते का? विशेष म्हणजे, टकरी होणार असल्याची माहिती, फोटो आणि बॅनर एक दिवस आधीच पोलिसांपर्यंत पोहोचले होते. तरीही पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी या टकरी रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आयोजकांना अभय पीआय सोमनाथ जाधव देत आहेत का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
बार्शी नाका आणि बीड शहरातील काही युवा नेत्यांनी या टकरींचे आयोजन केल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ज्योतिबा मंदिर परिसरात रेड्यांच्या झुंजी लावण्यात आल्या. या झुंजींमध्ये अनेक जनावरे जखमी झाली. काहींच्या अंगावर रक्त दिसत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. मुक्या जनावरांना एकमेकांसमोर उभे करून त्यांच्यात झुंजी लावल्या जात असताना उपस्थितांची गर्दी मात्र हा तमाशा पाहत होती.
खरा प्रश्न आयोजकांनी टकरी का लावल्या, एवढाच नाही. तर पोलिसांना याची आधीच माहिती असताना त्यांनी त्या होऊच कशा दिल्या, हा आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यावर हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती. रेड्यांच्या टकरी होणार असल्याची माहिती एक दिवस आधीच पोलिसांना मिळाली होती. फोटो, बॅनर आणि कार्यक्रमाची माहितीही पोहोचविण्यात आली होती. मग आयोजकांना वेळीच रोखण्याची जबाबदारी कोणी पार पाडायची होती?
माहिती मिळाल्यानंतरही कार्यक्रमस्थळी टकरी पार पडल्या. जनावरे जखमी झाली. व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. मग पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी नेमकी कोणती कारवाई केली? आयोजकांना रोखण्यासाठी साधी नोटीस तरी बजावली होती का? की माहिती असूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले?
नापास करण्याची धमकी देत ११ महिने लैंगिक छळ! बीडमध्ये प्राध्यापकाचे संतापजनक कृत्य उघड
ठाणेप्रमुखांना आधीच माहिती मिळालेली असताना बेकायदेशीर टकरी पार पडणे, ही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्याऐवजी त्यांना मोकळे रान मिळत असेल, तर पोलिसांच्या जबाबदारीचे काय?
प्राण्यांना एकमेकांशी झुंजविणे आणि त्यांच्यावर क्रूरता करणे याविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात तरतुदी आहेत. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही प्राण्यांच्या संरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींसाठी असलेल्या विशिष्ट कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन रेड्यांच्या टकरींचे समर्थन करता येत नाही.
असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच या प्रकाराकडे दुर्लक्ष करावे, हे गंभीर आहे. सोमनाथ जाधव यांना कायद्याची माहिती नव्हती की माहिती असूनही कारवाई करायची नव्हती, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.
या प्रकरणात आता पोलीस अधीक्षकांनी थेट हस्तक्षेप करण्याची गरज आहे. सोमनाथ जाधव यांना पूर्वसूचना मिळाली होती का, मिळाली असेल तर त्यांनी कारवाई का केली नाही आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काय पावले उचलली, याची चौकशी झाली पाहिजे.

पोलीस ठाण्याच्या प्रमुखाकडे तक्रार करूनही इतकेच काय तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना पेट शेल्टर फाउंडेशनने टकरीच्या आयोजनापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते. कदाचित पोलीस अधीक्षकांना यावर कारवाई करावी यासाठी वेळ मिळाला नसेल किंवा आवश्यकता देखील वाटली नसेल असं म्हणायला हरकत नसल्याचा दिसत आहे.
निवेदन देऊन कारवाई होत नसेल आणि त्याच अधिकाऱ्याच्या भूमिकेची पोलीस अधीक्षकांनीही दखल घेतली नाही, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागण्यासाठी कोणाच्या दारात जायचे? कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच संरक्षण मिळणार असेल, तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास कसा टिकणार?
इमामपूरमध्ये रेड्यांच्या अंगावरचे रक्त व्हायरल व्हिडिओतून दिसत आहे. पोलिसांना पूर्वसूचना दिल्याची माहितीही समोर आली आहे. आता पोलीस अधीक्षक या प्रकरणात सोमनाथ जाधव यांची जबाबदारी निश्चित करतात की नेहमीप्रमाणे या प्रकरणावरही पडदा पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीड रेड्यांच्या टकरी या प्रकरणावर आता सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत पोलीस अधीक्षकांसह पीआय सोमनाथ जाधव यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बीड रेड्यांच्या टकरी रोखण्यासाठी पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती तर मुक्या जनावरांना त्रास झाला नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता पोलीस अधीक्षक या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करतात का ? कर्तव्यदक्षतेचा डांगोरा वाजवणारे पोलीस अधीक्षक देखील कायदा पायदळी तुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीड रेड्यांच्या टकरी प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी प्राणीप्रेमी संघटना आता पुढे सरसावल्या आहेत.
प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?
बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री
WhatsApp चॅनल Follow करा →✓ 100% फ्री • ✓ रोज अपडेट • ✓ कधीही Unfollow करू शकता