Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

लोखंडवाडीत बिबट्या अखेर ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी परिसरात गायीवर हल्ला करून…
बीड — आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी परिसरात गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडणारा वन्यप्राणी अखेर बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. गायीला तब्बल दोनशे मीटर अंतरापर्यंत ओढत नेल्याने हा हल्ला वाघाने केला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, वनविभागाने घटनास्थळी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या सुमारे ७० किलो वजनाचा आणि आठ वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी येथील रावसाहेब साधू पिंपळे हे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या गायरान क्षेत्रातील सर्वे क्रमांक २७ मध्ये जनावरे चारत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने अचानक एका गायीवर झडप घातली. हल्ल्यानंतर त्याने गायीला सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत ओढत नेले आणि तिचा फडशा पाडला.
गायीवर झालेल्या या हल्ल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गायीला एवढ्या लांबपर्यंत ओढून नेल्याने हल्लेखोर प्राणी वाघ असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. विशेषतः गायरान परिसरात जनावरे चारणारे शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच आष्टी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हल्ला झालेल्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मात्र, हल्लेखोर प्राणी नेमका कोणता आहे, याची खात्री करण्यासाठी वनविभागाने शुक्रवारी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावला.
शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सकाळी वनविभागाच्या पथकाने कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या स्पष्टपणे कैद झाल्याचे दिसून आले. सुमारे ७० किलो वजनाचा आणि आठ वर्षांचा हा बिबट्या असल्याचे वनविभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले. त्यामुळे लोखंडवाडी परिसरात वाघ आल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
हे देखील वाचा :
आले सोमनाथाच्या मना; तिथे सर्वोच्च न्यायालयाचे ही चालेना; रेड्यांच्या टकरीत कायदा गारद
वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल लक्ष्मण तागड, वनरक्षक कल्पना विधाते, बन्सी तांदळे, गोरख पवार, दत्तू भूकन आणि जयसिंग मोहिते यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन ट्रॅप कॅमेऱ्याची पाहणी केली.
दरम्यान, लोखंडवाडी परिसरात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने शेतकरी आणि पशुपालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सायंकाळनंतर शेतात किंवा गायरान क्षेत्रात एकट्याने जाणे टाळावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि परिसरात बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वाघाच्या चर्चेमुळे आधीच धास्तावलेल्या लोखंडवाडी परिसरातील नागरिकांसमोर आता बिबट्याच्या वावराचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पुढील काळात काय उपाययोजना कराव्यात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोखंडवाडीत बिबट्या आढळल्याने वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात, गायरानात किंवा अंधाऱ्या ठिकाणी एकट्याने जाणे टाळावे.
पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जनावरे रात्री सुरक्षित गोठ्यात बांधावीत. गोठ्याभोवती प्रकाशाची व्यवस्था करावी. लहान वासरे, शेळ्या-मेंढ्या उघड्यावर बांधू नयेत.
परिसरात बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वनविभागाला किंवा गावातील सरपंच, पोलीस पाटील यांना माहिती द्यावी.
लहान मुलांना सायंकाळनंतर घराबाहेर एकटे सोडू नये. शेतात जाताना सोबत टॉर्च, काठी घेऊन जावी आणि गटाने जावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
🌿 वनविभाग – अधिकृत माहिती
बिबट्या दिसल्यास घाबरू नका, त्याला त्रास देऊ नका. तात्काळ वनविभागाशी संपर्क साधा. वन्यप्राण्यांबाबत अधिकृत माहिती आणि हेल्पलाईनसाठी खालील बटणावर क्लिक करा.
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?
बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री
WhatsApp चॅनल Follow करा →✓ 100% फ्री • ✓ रोज अपडेट • ✓ कधीही Unfollow करू शकता