पडक्या शाळा,एसपींच्या घराच्या दुरुस्तीवरून वादळ…! दुसरीकडे शाळाच जमीनदोस्त केली

बीड — एकीकडे पडक्या शाळा मधून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असताना पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 93 लाखाचा खर्च झाल्यामुळे जिल्ह्यात वादळ उठलेले आहे. पडक्या शाळांना बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलनही केले जात आहे. दुसरीकडे मात्र आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गांधणवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी पहाटेच्या सुमारास शाळेची इमारत जमीनदोस्त केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सुमारे ४० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही शाळा दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, रस्त्याला अडथळा होत असल्याचे कारण पुढे करत काही व्यक्तींनी पहाटेच्या वेळी इमारत पाडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शाळेची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेत शालेय पोषण आहारासाठी साठवून ठेवलेल्या धान्यावर माती आणि ढिगारा पडल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

घटनेची माहिती शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाला देण्यात आली असून, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या वर्गखोल्यांची त्वरित व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधित विभागाकडून चौकशी होण्याची शक्यता असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles