दहिवंडीत भेसळयुक्त मिठाईवर अन्न भेसळ चा धडक छापा; 35 हजारांचा साठा नष्ट

शिरूर (का) —  तालुक्यातील दहिवंडी येथे भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली. संयुक्त छाप्यात सुमारे 35 हजार 536 रुपयांचा संशयित मिठाईचा साठा जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला, तर भेसळीसाठी वापरला जाणारा संशयित ‘सेफोलाइट’ पदार्थ आढळल्याने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 1 जुलै रोजी बीड अन्न व औषध प्रशासन आणि शिरूर कासार पोलिसांच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ‘जय श्री कृष्णा केक अॅण्ड बर्फी’ या आस्थापनेवर छापा टाकला.
तपासणीदरम्यान मिल्क केक, ब्राऊन बर्फी, खवा, रवा, रिफाइंड पामोलीन तेल, मोतीचूर दाणा तसेच ‘सेफोलाइट’ या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
छाप्यात मिठाई अत्यंत अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक वातावरणात तयार होत असल्याचे आढळून आले. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण संशयित साठा जागेवरच खड्डा करून नष्ट करण्यात आला. तसेच आवश्यक त्रुटी दूर होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अभिजित गाढे यांनी कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित (वय 22, रा. दहिवंडी) यांच्याविरुद्ध शिरूर कासार पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे, सहाय्यक आयुक्त नि. सु. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सी. एस. खंदारे, अ. दि. नरवाडे तसेच शिरूर कासार पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles