बीड — जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आणि उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळा 23 जून 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांनी याबाबत आदेश काढून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळेची वेळ सकाळी 8 वाजेपासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात यंदा पावसाला झालेला विलंब, तसेच ‘अल निनो’च्या प्रभावामुळे वातावरणातील बदल अधिक तीव्र झाले आहेत. परिणामी तापमानात वाढ झाली असून विद्यार्थ्यांना उष्णतेमुळे त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना आणि प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडूनही शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील संबंधित शाळांनी सकाळच्या वेळेतच नियमित कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

