बीड: आदित्य फार्मसी कॉलेजचा नवा लफडा; मूळ शैक्षणिक कागदपत्रे रोखल्याची विद्यार्थ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बीड —  प्रत्येक वर्षी सारडा यांच्या आदित्य शिक्षण संस्थेचे नवनवे कारनामे उघड होताना पाहायला मिळते. राज्यातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची छळवणूक कशी करायची यामध्ये या संस्थेचा हात कोणीही धरू शकत नाही. याचं एक मोठे उदाहरण पुन्हा एकदा समोर आला आहे.आदित्य फार्मसी कॉलेज बीड महाविद्यालयाने आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे परत न केल्याचा आरोप करत विद्यार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. चक्रे अर्जुन अप्पासाहेब (रा. कुक्कडगाव, ता. जि. बीड) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज देत महाविद्यालयाच्या कारभाराची चौकशी करून कागदपत्रे तात्काळ परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांना डी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. मात्र महाविद्यालयाच्या चुकीमुळे त्यांचा प्रवेश बी. फार्मसी विभागात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित अभ्यासक्रमात रस नसल्याने त्यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी महाविद्यालयाकडे अर्ज केला होता. मात्र चार महिने उलटून गेले तरीही प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रवेशावेळी पडताळणीसाठी जमा केलेली १० वी, १२ वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र यासह इतर मूळ कागदपत्रे महाविद्यालयाकडे जमा केली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही ही कागदपत्रे परत देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मूळ कागदपत्रे रोखण्याचा अधिकार नाही” — विद्यार्थ्याचा दावा

तक्रारदाराने आपल्या अर्जात विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या नियमांचा दाखला देत विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे महाविद्यालयाने स्वतःकडे ठेवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच विश्वासाने दिलेली कागदपत्रे परत न करणे हे कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब असल्याचा दावा देखील केला आहे.

या प्रकारामुळे पुढील शिक्षण, शासकीय योजना आणि आवश्यक प्रशासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे विद्यार्थ्याने नमूद केले आहे.

स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप

महाविद्यालयाच्या कारभारामुळे आपण महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोपही विद्यार्थ्याने केला आहे. झालेल्या आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीची भरपाई मिळावी तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे.

विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच पोलीस अधीक्षक  आणि शिक्षण विभागाकडेही तक्रारीची प्रत दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles