Home क्राईम पुरुषोत्तमपुरीत 50 भाविकांनी भरलेली बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

पुरुषोत्तमपुरीत 50 भाविकांनी भरलेली बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

0
18

माजलगाव —  बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एका महिलेचा पाण्यात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. एका अल्पवयीन मुलाचा अद्याप शोध लागलेला नसून बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.


देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमासानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान नदी पार करण्यासाठी निघालेली भाविकांनी भरलेली बोट मध्यप्रवाहात असताना अचानक असंतुलित होऊन उलटली.

बोटीत 40 ते 50 भाविक

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बोटीत सुमारे 40 ते 50 भाविक प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. बोट उलटताच सर्व प्रवासी नदीत पडल्याने काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अनेक भाविकांनी स्वतः पोहून किनारा गाठला, तर स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, मच्छीमार आणि प्रशासनाच्या पथकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत अनेकांना सुरक्षित बाहेर काढले.

दोन महिलांचा मृत्यू

या दुर्घटनेत कांताबाई ज्ञानदेव आंधळे ( वय 68 वर्ष ,रा. कुंबेफळ,ता.सिंदखेड ),प्रणिला शेषेराव राठोड (वय 55, रा. लोणार) यांचा मृत्यू झाला. तर सिंधूबाई अर्जुन मवाळ (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर जखमी भाविकांवर माजलगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

अल्पवयीन मुलाचा शोध सुरू

दुर्घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, एका अल्पवयीन मुलाचा अद्याप शोध लागलेला नसून नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

घटनेनंतर भाविक आणि स्थानिक नागरिकांनी यात्रेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बोटीतून प्रवास करणाऱ्या भाविकांना लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते, तसेच प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येत असताना बोट वाहतुकीसाठी पुरेशा सुरक्षाव्यवस्था का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चौकशी आणि कारवाईची मागणी

दुर्घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here