बीड — बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी बीड जिल्ह्यातील तीन साखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी पायी जात असताना दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून फरार झाले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026 दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी आष्टी परिसरात अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी 25 हून अधिक गुन्हेगार वस्त्यांमध्ये चौकशी केली, हिस्ट्रीशीटरांची पडताळणी केली तसेच 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना विकास गडया भोसले (वय 22, रा. चिखली ता. आष्टी) याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार अरुण बप्पा काळे (वय 23, रा. बोलेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत केल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड जिल्ह्यातील तीन साखळी चोरीचे गुन्हे केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे व पोलीस ठाणे आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक शिंदे, प्रविण क्षीरसागर, सत्यवान वाणी, तागड, तांबे चालक सिध्देश्वर मांजरे यांनी केली आहे.

