बीड — जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका दाम्पत्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हे जोडपे आपल्या १६ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे मारत आहे. मात्र अद्याप मुलीचा शोध लागला नसल्याने हताश झालेल्या आई-वडिलांनी अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.

माहितीनुसार, सात महिन्यांपूर्वी एका तरुणाने या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. परंतु इतका कालावधी उलटूनही मुलगी सापडलेली नाही. यामुळे संतप्त आणि निराश झालेल्या पालकांनी वारंवार पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शुक्रवारी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात या दाम्पत्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून बेपत्ता मुलीचा शोध नेमका कधी लागणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

