आणंद (गुजरात) — इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतात महागाईचा दबाव वाढत असून पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देशातील सर्वात मोठी दुग्धसंस्था असलेल्या अमूल ( Amul) ने दूधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, अमूल दूधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 14 मे 2026 पासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
पशुखाद्य, वाहतूक, पॅकेजिंग आणि दूध संकलनाचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
अमूल दूधाचे नवे दर
अमूल गोल्ड (फुल क्रीम)
500 मिली : 35 रुपये
1 लिटर : 67 रुपये
अमूल ताजा (टोन्ड दूध)
500 मिली : 30 रुपये
1 लिटर : 58 रुपये
अमूल गाईचे दूध
500 मिली : 31 रुपये
अमूल म्हशीचे दूध
500 मिली : 38 रुपये
2.5 ते 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ
GCMMF च्या माहितीनुसार, ही दरवाढ प्रमुख दूध पॅकेट्सवर लागू करण्यात आली असून वाढीचे प्रमाण साधारण 2.5 ते 3.5 टक्क्यांदरम्यान आहे.
महागाईचा सर्वसामान्यांवर वाढता ताण
देशात आधीच इंधन, खाद्यपदार्थ आणि सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील उत्पादन खर्च वाढल्याने अनेक वस्तू महाग होत आहेत. अशा परिस्थितीत दूधाच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे.




