केज (बीड ) — तालुक्यातील काळेगाव घाट येथे मंगळवारी सायंकाळी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 12 मे रोजी सायंकाळी 5:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित बालिकेची आई कामावर गेली होती, तर वडील घरी आजारी होते. त्यावेळी चिमुकली आणि तिचा पाच वर्षांचा भाऊ घराबाहेर खेळत होते.
आरोपीने संधी साधून चिमुकलीच्या भावाला खाऊ आणण्याच्या बहाण्याने दुकानावर पाठवले. त्यानंतर त्याने बालिकेला स्वतःच्या घरात बोलावून दरवाजाची कडी आतून लावून घेतली. मुलगा परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने वडिलांना सांगितले. वडिलांनी शोध घेतला असता आरोपीचे घर आतून बंद दिसले. संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडायला लावला असता पीडित मुलगी आणि आरोपी घरात आढळून आले.
प्राथमिक तपासात मुलीचे अंतर्वस्त्र फाटलेल्या अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.घटनेमुळे काळेगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




