माजलगाव शहरातील काही कॅफेंमध्ये नियमबाह्य प्रकार सुरू असल्याच्या तक्रारींवरून नागरिक संतप्त झाले आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

माजलगाव कॅफे प्रकरण : बेकायदेशीर कॅफेंवर कारवाईची मागणी – आ. प्रकाश सोळंके
माजलगाव — शहरातील काही कॅफेंमध्ये अश्लील व बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke )यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही कॅफे आवश्यक परवान्यांशिवाय सुरू असून अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींची संशयास्पद ये-जा वाढल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेनंतरही अपेक्षित स्वरूपाची कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कॅफेंच्या नावाखाली सुरू असलेल्या नियमबाह्य प्रकारांमुळे शहरातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कॅफेंवर तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि समाजात अशा प्रकारांना थारा मिळू नये यासाठी प्रशासनाने त्वरित व प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




