महाराष्ट्र दहावी निकाल 2026 मध्ये सोलापूरच्या निकिता अमोल कुचेकर हिने प्रत्येक विषयात नेमके 35 गुण मिळवत अनोखी कामगिरी केली आहे. ‘Perfect 35’ निकालाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सोलापूर — (Maharashtra) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये सोलापूर ( Solapur) जिल्ह्यातील ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने एक अनोखी नोंद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
निकिताला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्व विषयांमध्ये प्रत्येकी 35 गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विषयात समान गुण मिळाल्याने तिचा निकाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत नेमके 35 गुण मिळणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते. त्यामुळे अनेक जण या निकालाला “Perfect 35” किंवा “काठावर पास” असे संबोधत आहेत. विद्यार्थिनीच्या या वेगळ्या निकालाचे शिक्षक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
(Bale ) बाळे परिसरात निकिताच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या गुणपत्रिकेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी हा निकाल “नशिबाचा योगायोग” तर काहींनी “परफेक्ट बॅलन्स” असे म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, यंदाच्या दहावी निकालात राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असताना सोलापूरच्या निकिताच्या ‘परफेक्ट 35’ निकालाने वेगळेच आकर्षण निर्माण केले आहे.

