बीड — गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे गांजाची बेकायदेशीर साठवण व विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि तलवडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना सिरसदेवी येथे गांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ छापा टाकण्यात आला या छाप्यात शेख रईस शेख युसूफ (वय २५, रा. सिरसदेवी) याच्या घराची झडती घेतली असता, दोन लाख 66 हजार 640 रुपये किमतीचा आठ किलो 888 ग्रॅम गाजा यावेळी जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत नायब तहसीलदार गजानन मोरे, सपोनि संतोष जंजाळ, पोउनि सुशांत सुतळे, तसेच पोलीस कर्मचारी आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे, सुधीर जोशी यांचा सहभाग होता.




